Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तक्रारीची दखल न घेतल्याने सांगलीत आत्मदहनाचा प्रयत्न
सांगली, ६ मार्च/प्रतिनिधी

 

शासकीय यंत्रणेकडे वारंवार न्यायाची मागणी करूनही त्याची साधी दखलही घेतली जात नसल्याच्या कारणावरून मिरज तालुक्यातील बेळंकी येथील गोरख बनाप्पा केंगार (वय ५०) यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
गोरख केंगार यांनी डफळापूर येथील आरोग्य केंद्रात आपल्या मुलीला प्रसूतीसाठी दाखल केले होते. पण तिची परिस्थिती पाहून आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी तिला कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार केंगार यांनी मुलीला कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तेथील वैद्यकीय अधिकारी विनायक मोरे यांनी तिला दाखल करून घेण्यास नकार देत खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यास केंगार यांनी नकार देताच त्यांना डॉ. मोरे यांनी मारहाणही केली होती.
याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून केंगार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. पण त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, तसेच या प्रकरणाची साधी चौकशी करण्याचेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या केंगार यांनी शुक्रवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास केंगार हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने शहर पोलिसांनी कार्यालयाबाहेर बंदोबस्तही ठेवला होता. पण बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नजर चुकवून केंगार यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले.
याच सुमारास जिल्हा न्यायालयात बंदोबस्तासाठी असलेल्या दत्तात्रय बागणकर हे पोलीस कर्मचारी कामानिमित्त जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे निघाले होते. त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन केंगार यांना अडविले, तसेच त्यांच्या हातातील काडीपेटीही हिसकावून घेतली.
तोपर्यंत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनीही केंगार यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.