Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘महालक्ष्मी मंदिर परिसर विकासात रहिवासी, व्यापाऱ्यांची दखल घेणार’
कोल्हापूर, ६ मार्च / विशेष प्रतिनिधी

 

कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करताना तेथील रहिवाशी, व्यापारी यांच्या भावनांची योग्य ती दखल घेतली जाईल, अशी दखल घेतल्याखेरीज विकासाचे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असे आश्वासन महापौर उदय साळोखे यांनी शुक्रवारी मंदिर परिसरातील नागरिकांच्या एका व्यापक शिष्टमंडळाशी बोलताना दिले.
कोल्हापूर महापालिकेने शहराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी एक व्यापक आराखडा केंद्र सरकारकडे पाठविला आहे. एका खासगी सल्लागार कंपनीच्या सहकार्याने बनविण्यात आलेल्या या आराखडय़ामध्ये मंदिराच्या सभोवतालची नागरी वस्ती उठविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक वृत्तपत्रात माहिती प्रसिध्द झाल्यानंतर मंदिर परिसरातील व्यापारी, रहिवाशी यांनी एक कृती समिती स्थापन केली. या समितीच्या वतीने शुक्रवारी मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. मोठय़ा संख्येने व्यापारी मोर्चाने महापालिकेवर आले होते. यावेळी महापौरांनी शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.चंद्रकांत यादव, पिटर चौधरी, भाजपचे अजित ठाणेकर, व्यापारी महासंघाचे विद्याधर कोळेकर, किरण धर्माधिकारी, चंद्रकांत सुगंधी आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर विकासाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. तथापि संबंधित आराखडा हा खासगी सल्लागाराऐवजी तज्ज्ञांकडून करण्यात यावा आणि महानगरपालिकेने मंदिर परिसरातील रहिवाशी, छोटे व्यावसायिक, व्यापारी यांच्याविषयी आपले धोरण जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोणालाच विश्वासात न घेता जर मंदिर परिसरातील वस्त्यांवर बुलडोजर फिरवले जाणार असतील तर व्यापारी आपला निकराचा लढा उभारतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
महापालिकेत महापौरांची भेट घेतल्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.