Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

हातकणंगलेतून काँग्रेसचे नानासाहेब महाडिक बंडखोरीच्या पवित्र्यात?
आष्टा, ६ मार्च / शीतल पाटील

 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सांगली जिल्हा काँग्रेसचे खजिनदार नानासाहेब महाडिक हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. मात्र महाडिक यांची बंडखोरी ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर अवलंबून असून कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास नानासाहेब महाडिक यांची बंडखोरी निश्चित असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेत सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर व शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी हे दोन मतदारसंघ कराड लोकसभा मतदारसंघात होते. सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गृहमंत्री जयंत पाटील हे करीत आहेत, तर शिराळा मतदारसंघ काँग्रेसचे सहयोगी आमदार शिवाजीराव नाईक यांच्याकडे आहे. या दोन मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुल्यबळ आहे. हातकणंगले मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून विद्यमान खासदार श्रीमती निवेदिता माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. अशातच आता नानासाहेब महाडिक यांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. पण त्यांची उमेदवारी ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य राजकीय समीकरणावरच अवलंबून आहे. कोल्हापुरातून नानासाहेब महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास नानासाहेब महाडिक हे हातकणंगले मतदारसंघातून बंडखोरी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यादृष्टीने त्यांच्या समर्थकांनी आतापासूनच इस्लामपूर व शिराळा या विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.
नानासाहेब महाडिक यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यात काँग्रेसने गृहमंत्री जयंत पाटील यांच्याशी राजकीय संघर्ष केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अथवा ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने काँग्रेसने यश मिळविले आहे. या विधानसभा मतदारसंघात नव्याने समाविष्ट केलेल्या सांगली विधानसभा मतदारसंघातील नऊ गावावर महाडिक यांचे नातेवाईक असलेल्या रोहयो मंत्री मदन पाटील यांचे वर्चस्व आहे.
तसेच शिराळा तालुक्यातही महाडिक यांना मानणारा एक मोठा गट आहे. इचलकरंजी, शिरोळ व वडगाव या परिसरात धनंजय महाडिक युवाशक्तीच्या माध्यमातूनही महाडिक यांना ताकद देण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो, अशी राजकीय गणिते मांडली जात आहेत.
आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत वाळवा व शिराळा तालुक्याला प्रतिनिधित्व दिले गेले नाही. यापूर्वी कराड लोकसभा मतदारसंघातही या दोन तालुक्याची ताकद मोठी असतानाही नेहमीच येथील कार्यकर्त्यांना डावलले गेले आहे. आता हातकणंगले मतदारसंघातही अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याची भावना कार्यकर्त्यांत झाली आहे. जिल्ह्य़ाच्या राजकारणातही काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीच या दोन तालुक्यांकडे दुर्लक्षच केले आहे. यामुळे जिल्हा नेतृत्वाबाबतही या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या पश्चिम विभागीय कार्यकर्ता शिबिरातील नानासाहेब महाडिक व त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांच्या अनुपस्थितबाबत राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा झाली होती.
धनंजय महाडिक यांनीही आपल्या उमेदवारीसाठी गृहमंत्री जयंत पाटील यांच्यामार्फतच पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरल्याची चर्चा आहे. ही सारी राजकीय समीकरणे व नानासाहेब महाडिक यांची बंडखोरी ही कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवारीवरच अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
या बंडखोरीबाबत त्यांच्या निकटवर्तीयांकडूनही दुजोरा मिळत आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येत्या १५ दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असून आगामी घडामोडींकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.