Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संजय पाटील खूनप्रकरण : फरारी प्रमुख सूत्रधार बाबा मोरेला अटक
१७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
कराड, ६ मार्च/वार्ताहर

 

महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील हत्या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बाळासाहेब ऊर्फ बाबा मोरे यास सापळा रचून अटक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पोलिसांनी आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फत्ते केली. बाबा मोरे याच्याकडून सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे ९ एमएम पिस्तुल जप्त करण्यात आले असून, त्यास न्यायालयात हजर केले असता १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कराड नजीकच्या मलकापूर येथील डीएमएस कॉम्प्लेक्समधील हॉटेल शिवदर्शनसमोर दि. १५ जानेवारी रोजी दुपारी पैलवान संजय पाटील यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, मुख्य सूत्रधार बाबा मोरे पोलिसांना वारंवार चकवा देत होता.
त्यास पकडण्यासाठी पोलिसांनी पराकाष्टा केली.
दरम्यान आज पहाटे बाबा मोरे आपल्या घरी येणार असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास कोळेवाडी ते पाचपुतेवाडी रस्त्यावर त्यास पकडले.
त्याच्याकडून पाचपुतेवाडी येथील तलावाच्या पाठीमागील बाजूच्या शेतालगत झाडाच्या बुंध्याखाली खड्डा काढून लपवलेले पिस्तूल पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केले.
फरार बाबा मोरे कराड-पाटण तालुक्यातील डोंगराळ भागात वेषांतर करून वावरत होता. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी अश्पाक संदे अद्यापही फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.