Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वाईत एकाचवेळी तीन चित्रपट व दोन जाहिरातपटांचे चित्रीकरण
वाई, ६ मार्च/वार्ताहर

 

हिंदी, मराठी चित्रपट, दूरदर्शन मालिका, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जाहिरातींच्या चित्रीकरणाचं नव केंद्र म्हणून वाई आता पुढे येत आहे. या परिसरात चित्रीकरणाची लगबग आता नित्याची बाबच ठरली आहे.
हिंदी, मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाचा गेल्या रविवारी विक्रम झाला. एकाच वेळी तीन चित्रपटांचे चित्रीकरण याठिकाणी झाले.यामध्ये श्रेया क्रियेशनच्या ‘भाग्यविधाता’ ‘वळू’ या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांचा नवा चित्रपट ‘विहीर’, स्वस्तिक पिक्चर प्रॉडक्शनचा ‘अगले जनम में हमे बिटिया ही बनाओ?’ याचा समावेश आहे. समाजवादी पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहिरातीचे चित्रीकरण पसरणीमध्ये झालं. तसेच एका आंतरराष्ट्रीय जाहिरातीचं चित्रीकरण सुरू होतं. एकदम पाच चित्रीकरण सुरू असल्याने वाईतील सर्व लॉज, मंगल कार्यालये केटर्स, रोजंदारीचे कामगार यांची तर चलतीच झाली.
चित्रीकरण बघायला पूर्वी महाबळेश्वर, पाचगणी, मुंबई, कोल्हापूरला जावं लागायचं, नाहीतर हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीची टूर नक्की केली की चित्रीकरणाच्या पद्धतीची थोडीफार माहिती होत असतेच. गेल्या काही वर्षांत मात्र महाबळेश्वर, पाचगणीच्या बरोबरीने वाई तालुका परिसराला निर्माता-दिग्दर्शकांची पसंती मिळत आहे. वाई-मेणवली येथील नदीकाठचे दगडी घाट काशी, मथुरा, वाराणसी येथील घाटांची आठवण करून देतात. तालुका परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे, राहण्याची उत्तम व्यवस्था असलेली हॉटेल्स, जेवणाची व्यवस्था करणारे केटर्स, दुय्यम व सहायक कलाकारांची उपलब्धता आहे. चित्रीकरण सुरू असेल तर नागरी सहकार्यही उपलब्ध होते. चित्रीकरणात गर्दीचा अडसर येत नाही. चित्रीकरण ही आता रोजचीच बाब असल्यामुळे कितीही मोठा कलाकार आला असेल तरी त्याला पाहायला गर्दी होत नाही.
वाई शहराला व तालुका परिसराला फार पूर्वीपासून चित्रीकरणाचा वारसा आहे. सुनील दत्त यांचा ‘मदर इंडिया’ तसेच राजेंद्रकुमार यांच्या ‘गुंज उठी शहनाई’चे चित्रीकरण वाईत झाले होते. राज कपूर यांनी आपल्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे केले. देव आनंद यांनी ‘बनारसी बाबू’ जितेंद्रचा ‘उधार की जिंदगी’, ओम पुरीचे आयुष्य बदलवून टाकणारा ‘अर्धसत्य’, ऋषी कपूर, जयाप्रदाचा ‘सरगम’, इरफान खानचा ‘पुरुष’, गोविंदाचा ‘जिस देश में गंगा रहता है’, शाहरूख खानचा ‘स्वदेस’ या चित्रपटांतील काही भागाचे चित्रिकरण येथे झाले. प्रकाश झा तर वाईचे रहिवासी असल्यासारखेच आहेत त्याचा गंगाजल, मृत्युदंड, बंदिश या चित्रपटांचे चित्रीकरण वाईत झाले. महेश मांजरेकरांचा ‘पिता’, विशाल भारद्वजचा ‘ओमकारा’, अशी कितीतरी नावं सांगता येतील की त्यांचे चित्रीकरण वाईत झाले. त्यासाठी संजय दत्त, सलमान खान, अमीर खान, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सैफ अली, करिना कपूर, नाना पाटेकर, रती अग्निहोत्री आदी अनेक कलाकारांनी येथे हजेरी लावली. वाईचा गणपती घाट, मेणवली घाट, मोती बाग, नाना फडणिसांचा वाडा आदी अनेक ठिकाणी चित्रीकरण होते. स्वदेशच्या चित्रीकरणासाठी तर संपूर्ण मेणवली गावाने शाहरूख खानला सहकार्य केले.
केदार शिंदे वाईचेच असल्याने त्यांनीही प्रत्येक चित्रपटात वाई,पसरणी भागाला, येथील स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिले. वाईला होणाऱ्या चित्रीकरणामुळे तर आता चित्रीकरणासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक लाईट, जनरेटर व्हॅन आदीची व्यवसायाला सुरवात झाली आहे.