Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

हाफिज धत्तुरे यांची काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी
मिरज, ६ मार्च / वार्ताहर

 

सांगली लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, अशी मागणी आमदार हाफिज धत्तुरे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. विद्यमान खासदार प्रतीक पाटील व महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांच्यात उमेदवारीसाठी संघर्ष सुरू असतानाच हाफिज धत्तुरे यांनी या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल, या हेतूने उमेदवारीसाठी आग्रह धरल्याने शहरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
मिरज विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन येथील जागा अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे हाफिज धत्तुरे यांनी दिल्लीकडे आपला मोर्चा वळविला आहे. जनमानसात ‘आम आदमी’ अशी प्रतिमा असणारे हाफिज धत्तुरे ऐनवेळी यशस्वी ठरतात, हा आजपर्यंतचा अनुभव असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत सद्यस्थितीत उत्सुकता लागून राहिली आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी अल्पसंख्याक समाजाला काही जागा देण्याचे धोरण निश्चित केले तर हाफिज धत्तुरे यांच्या नावाचा अग्रहक्काने विचार होऊ शकतो. हेच गणित मांडून हाफिज धत्तुरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जात आहे. तथापि, जिल्हा काँग्रेस समिती व प्रदेश समितीने केंद्रीय निवड समितीकडे हाफिज धत्तुरे यांच्या नावाची शिफारस केली असल्याने उमेदवारीबाबतही आशा निर्माण झाली आहे.
सांगलीचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा चिरंजीव विश्वजित याच्यासाठी आग्रह राहणार असला तरी विद्यमान खासदार
प्रतीक पाटील यांची दिल्लीतील ताकदही दुर्लक्षित होण्यासारखी नाही. ऐनवेळी डॉ. पतंगराव कदम हे आपले वजन हाफिज धत्तुरे यांच्या पारडय़ात टाकतील, असे संकेत मिळत आहेत. जिल्हास्तरावरील राजकीय डावपेच कसेही असले तरी गेली नऊ- दहा वर्षे हाफिज धत्तुरे यांचे डॉ. पतंगराव कदम यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न मानला जात आहे. कवठेमहांकाळ मतदारसंघाची पुनर्रचनेनंतर तासगावशी नाळ जोडण्यात आली आहे. त्यामुळे कवठेमहांकाळचे आमदार अजित घोरपडे हेही लोकसभेसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे उमेदवारीचा संघर्ष तिकीट वाटपापर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. हाफिज धत्तुरे यांनी काँग्रेसने संधी दिली तरच मैदानात उतरण्याची तयारी असल्याचे सांगून पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.