Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

माढा मतदारसंघात पवार यांच्या उमेदवारीचे स्वागतच
सांगोला, ६ मार्च/वार्ताहर

 

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील भाजप सोडून सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्वागत करून पाठिंबा जाहीर केला आहे. सर्वसामान्य मतदारांतूनही उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे.
लोकसभेच्या या निवडणुकीत पंढरपूर व राखीव ही दोन्हीही नावे नाहिशी झाली व माढा मतदारसंघ हे नवे नाव जाहीर झाल्याने मतदारांत उत्साह होता. या मतदारसंघात मोहिते-पाटील वि. सुभाष देशमुख अशी लढत होईल, असे वाटत असतानाच अचानक पंतप्रधानपदाचे दावेदार शरद पवार यांचेच नाव जाहीर झाल्याने सर्वच पक्षांतील (भाजप सोडून) नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेषत: देशात आजपर्यंतचा सर्वाधिक मतांचा इतर नेत्यांचा उच्चांक मोडून काढू, अशा प्रकारची स्पर्धा लागली आहे.
शरद पवार यांच्याबाबत लहान, लहान मुलांमध्येसुद्धा अभिमान वाटतो. महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
सांगोला शहर व तालुक्यात पानटपरीवाले, चहाटपरीवाले, चप्पल दुकानदार, सर्वसामान्य शेतमजूर, शेतकरी, विद्यार्थी यांनीही सांगितले की, आता आपल्या तालुक्याचा विकास होणार. शेतकरीवर्गाच्या मते टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्याचे पाणी येईल. सुशिक्षित रोजगार कारखानदारी वाढेल. डाळिंबाच्या बागांबरोबर इतर फळबागांची लागवड तसेच त्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी येईल. सर्वच क्षेत्रात विकास साधला की आमच्या व्यवसायात वाढ होईल, अशी व्यावसायांची प्रतिक्रिया आहे.
सांगोला तालुक्यात मुख्यत: शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. (आठवले गट) हेच पक्ष आहेत. याच पक्षाच्या विचारांचे ९९ टक्के कार्यकर्ते व मतदार आहेत. त्यामुळे सांगोला तालुक्यातून पवार यांना भरघोस मतदान मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
डाव्या आघाडीचे शेकापचे नेते गणपतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शरद पवार व गणपतराव देशमुख यांचे पक्ष सोडून वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे पर्यायाने सांगोला तालुक्याची मोठी जबाबदारी देशमुख यांच्यावर येणार आहे.
तालुक्यात दुसरी ताकद माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची होय. त्यांनी सुरुवातीपासून माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. त्यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपतर्फे लोकमंगलचे प्रमुख सुभाष देशमुख हे निवडणूक लढविण्याचे निश्चित असल्याचे दिसत आहे.