Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पवार यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आज बैठक
माळशिरस, ६ मार्च/वार्ताहर

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा माढा मतदारसंघातील उमेदवारीच्या प्रचाराच्या नियोजनाच्या दृष्टीने अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर शनिवारी सायंकाळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यापासून प्रथमच त्यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना त्यांनी राज्यसभेतून संसदेत जाणे उचित वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून जाण्याच्या दृष्टीने माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मी त्यांना विनंती केली. त्या निमित्ताने पंतप्रधानांना मतदान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. शिवाय त्यांचे मूळ गाव याच मतदारसंघात येते. मी सुरुवातीपासूनच खासदारकीची निवडणूक लढविण्यास नकार दिला असल्याने अखेर पवार यांनी माढय़ातून ही निवडणूक लढविण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता कामाला लागले पाहिजे. प्रचाराची दिशा निश्चित केली पाहिजे.
या मतदारसंघात अकलूज केंद्रस्थानी येत असल्याने अकलूजला बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीसाठी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, दूध संघाचे, साखर कारखान्याचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य, नगराध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य, वाहतूक संघाचे पदाधिकारी, राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी आदींना निमंत्रित केले असून, शनिवारी दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. ही बैठक होईल, असे ते म्हणाले.
त्याचवेळी त्यांनी पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नियोजित बैठकीची कल्पना दिली. त्यावेळी माळशिरस पंचायत समिती सभापती धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे उपस्थित होते. पवार यांना देशात सर्वाधिक मतांनी विजयी करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.