Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी खासगी न्यास योजनेस विरोध
सोलापूर, ६ मार्च/प्रतिनिधी

 

वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना खासगी न्यासाच्या माध्यमातून निवृत्तिवेतन देण्याच्या योजनेस एम.एस.ई.बी. वर्कर्स युनियन (पॉवर फ्रंट) चे कार्याध्यक्ष राकेश जाधव आणि सचिव सर्वसाधारण नचिकेत मोरे यांनी तीव्र विरोध करून शासनाच्या हमीशिवाय निवृत्तिवेतन न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे.
राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्तिवेतन मिळण्यासाठी पॉवर फ्रंट व सहकारी संघटनांनी प्रयत्न केले; परंतु कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन लागू करण्याबाबत शासन कुठलीही हमी देणार नसल्याचा १६ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना सरकारी निवृत्तिवेतन मिळण्याची शक्यता मावळली आहे; परंतु आयटकप्रणीत वर्कर्स फेडरेशन, बी.एम.एस. प्रणीत कामगार संघ या संघटनांनी खासगी न्यासाचा आग्रह धरला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीपैकी कंपनीचा वाटा निवृत्तीच्या वेळी न देता तो अडीच हजार कोटींचा निधी खासगी न्यासाकडे द्यावा. नंतर न्यास या पैशाच्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन देईल, अशा प्रकारची योजना राबविण्यासाठी वीज कंपन्यांकडे आग्रह धरण्यात येत आहे. वास्तविक असे खासगी न्यास बुडण्याचा धोका असून, कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या पैशाचा जुगार होईल. कामगारांची फसवणूक होईल. कारण या न्यासावर विश्वस्त म्हणून काही ठराविक संघटनांचे प्रतिनिधी राहतील, असा प्रस्ताव आहे. त्याला शासनाची हमी नसल्यामुळे या खासगी न्यास प्रस्तावाला जाधव व मोरे यांनी विरोध केल्याची माहिती पॉवर फ्रंटचे विजय जाधव यांनी दिली.