Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘श्रमाला प्रतिष्ठा देणे हीच कार्यसंस्कृतीची ओळख’
सोलापूर, ६ मार्च/प्रतिनिधी

 

देशाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी श्रमाला प्रतिष्ठा मिळणे महत्त्वाचे असून त्यातूनच कार्यसंस्कृतीची ओळख होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
पुणे महामार्गावरील चिंचोळी एमआयडीसीमध्ये प्रिसीजन कॅमशाफ्ट्स कंपनीने तयार केलेल्या ‘कार्यसंस्कृतीची ओळख’ ही पुस्तिका व सीडीचे प्रकाशन डॉ. पाटील यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी कौटुंबिक जिव्हाळ्य़ाच्या वातावरणात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, शांतकुमार मोरे, प्रा.विलास बेत यांची प्रमुख उपस्थिती होती. कंपनीचे संस्थापक सुभाष शहा यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान केला. तर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कॅमशाफ्ट्सच्या बाजारपेठेत देशातील ८५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील १५ टक्के वाटा असणाऱ्या या कंपनीच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतला.येत्या २०११ पर्यंत या उद्योग प्रकल्पातून जगभरात निर्यातीसाठी वार्षिक १० लाख कॅमशाफ्ट्सचे उत्पादन होईल एवढा आत्मविश्वास कंपनीच्या व्यवस्थापनाकडे निश्चित असल्यामुळे त्यादिशेने ही वाटचाल सुरु राहील, असा विश्वास व्यक्त करीत डॉ. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी खोरे, मोरे, प्रा. बेत यांनीही विचार मांडले.