Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अपंग संस्था महासंघाचा शासनाला इशारा
कोल्हापूर, ६ मार्च / प्रतिनिधी

 

अपंगांसाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्थांच्याकरिता लागू करण्यात आलेल्या आकृतिबंधामध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या दुरूस्त करून नव्याने सादर करण्यात आलेला आकृतिबंधाचा नवा मसुदा शासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. याबद्दल शासनाशी संघर्ष करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अपंग संस्था महासंघाच्या वतीने घेण्यात आला आहे.
राज्यातील अपंगांच्यावर सतत अन्याय होतो आहे. नोकरीतील तीन टक्के आरक्षण भरले जात नाही. कृत्रिम साधने, सोयी सुविधांचा अभाव आहे. याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपंगांच्या संदर्भात महत्त्वाचे सात निर्णय घेण्यात आले. पण आजतागायत ते शासन निर्णय म्हणून नियमित झालेल नाहीत. नवा आकृतिबंधही धूळ खात पडून आहे. शासनाच्या या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी दिनांक १४ मार्च पासून महासंघाच्या वतीने मंत्रालयासमोर धरणे व आमरण उपोषण करण्यात येणार आहे. महासंघाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष पवन खेबूडकर, सचिव साताप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.