Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

इतर गुंतवणूक क्षेत्रातील अस्थिरतेने सोने महागले - सोढा
सांगली, ६ मार्च / प्रतिनिधी

 

शेअर मार्केट व मालमत्ता आदी गुंतवणुकीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या गुंतवणुकीत २२ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोने दरात वाढ झाली आहे, अशी माहिती जागतिक सोने परिषदेचे संचालक धर्मेश सोढा यांनी दिली.
सांगली शहरातील सराफ व्यवसायाशी संबंधित विविध प्रश्नांवर आयोजित केलेल्या बैठकीसाठी श्री. सोढा हे सांगलीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक बाजारपेठेतील आर्थिक मंदी, शेअर बाजार व डॉलरच्या विनिमय मूल्यात झालेली घसरण आदीमुळे सोन्याला मागणी वाढली आहे. मात्र वीज टंचाई व अन्य सुविधांच्या कमतरतेमुळे दक्षिण आफ्रिकेत सोन्याच्या खाणी असूनही सोन्याचे उत्पादन १५ टक्क्य़ांनी घटले आहे. एक टन खोदकाम केल्यानंतर केवळ तीन ग्रॅम सोने मिळते. जागतिक पातळीवर सोन्याचे उत्पादन घटल्यामुळे सोने प्रतिदहा ग्रॅम १६ हजार रुपयांपर्यंत जाईल, अशी शक्यताही श्री. सोढा यांनी बोलून दाखवली.
जगाच्या तुलनेत भारतात सोन्याची गुंतवणूक २० टक्के आहे. सोने गुंतवणुकीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. अमेरिका व युरोप आदी देशात सोने हे केवळ फॅशन म्हणून वापरले जाते. परंतु शेअर बाजार व मालमत्ता आदी गुंतवणुकीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्थिरपणामुळे सोन्यातील गुंतवणुकीला मागणी वाढली आहे. सोन्यातील गुंतवणूक ही कायमस्वरूपी सुरक्षेची गुंतवणूक मानली जाते. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण हा एक सोने दरवाढीसाठी कारणीभूत घटक आहे. गेल्या वर्षभरात सोन्याचे दर वाढल्याने भारतातील मागणीत १५ टक्के कपात झाली आहे. भारतात सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी ८०० टन सोन्याची आवक होते, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर लंडन येथे ठरविले जातात. हे दर सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात प्रमुख व्यापाऱ्यांच्या बैठकीत ठरविले जातात. सर्वसाधारणपणे उत्पादन व मागणीनुसार दररोज सोन्याचे दर बदलतात. सोन्याची शुध्दता तपासण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड डिपार्टमेंटच्या वतीने काही खासगी प्रयोगशाळांना परवाना देण्यात आला आहे. काही ठराविक शहरातच अशा प्रयोगशाळा आहेत. अशा पध्दतीची शासकीय प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्य़ात असावी, अशी सराफ व्यावसायिकांची मागणी आहे, असेही श्री. सोढा म्हणाले. यावेळी सराफ महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष किशोर पंडित, जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष बाबूराव जोग, सराफ समितीचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पेंडुरकर व सचिव पंढरीनाथ माने आदी उपस्थित होते.