Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लाटकर पंचांग शताब्दी महोत्सव साजरा करणार
कोल्हापूर, ६ मार्च / विशेष प्रतिनिधी

 

मराठी पंचागांच्या श्रृंखलेत सलग पाचव्या पिढीच्या योगदानातून लोकप्रिय ठरलेले कोल्हापूरचे लाटकर पंचांग यंदा शंभराव्या वर्षांत पदार्पण करते आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय बहूमोल माहितीचा खजिना उपलब्ध करणाऱ्या या दस्ताऐवजाची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय शताब्दी महोत्सव समिती व सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आला आहे अशी माहिती पंचांगकर्ते मेघश्याम लाटकर, वा.रा.धर्माधिकारी व विनोद डिग्रजकर यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
येथील महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये रविवार दिनांक ८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता हा सोहळा संपन्न होतो आहे. करवीरपीठाचे शंकराचार्यांच्या उपस्थितीत दै.पुढारीचे कार्यकारी संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते १०० व्या पंचागाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
महापौर उदय साळोखे, देवस्थान समितीचे अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत हेर्लेकर, शंकराचार्य मठाचे अध्यक्ष भालचंद्र अष्टेकर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.आर.व्ही.भोसले, महालक्ष्मी बँकेचे संचालक महेश धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या समारंभाचे अध्यक्षस्थान युवराज श्रीमंत संभाजीराजे हे भूषविणार आहेत.
१६०९ साली प्रसिध्द शास्त्रज्ञ गॅलिलिओने लावलेल्या दुर्बिणीच्या शोधाला ४०० वर्षे पूर्ण होत असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने २००९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचवर्षी लाटकर पंचांगही आपली शताब्दी साजरी करीत असल्याने हा एक नवा योगायोग साधून आला असल्याचे पंचांगकर्त्यांच्या चालू पिढीचे वारसदार मेघश्याम लाटकर यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
ते म्हणाले, महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पध्दतीने उपाध्येपण करणे हा आपल्या कुटुंबाचा व्यवसाय होता. १९१० मध्ये आपले आजोबा शंकरशास्त्री गणेश लाटकर यांनी पंचांगनिर्मिती सुरू केली. यानंतर वासुदेव शंकर लाटकर आणि सिनेअभिनेते वसंत शंकर लाटकर यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांच्यानंतर या परंपरेचे उत्तरदायित्व आपल्याकडे आले. आता लाटकर कुटुंबातील पुढची पिढीही हा वारसा जपण्यासाठी सज्ज झाली आहे.