Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

हकीम समितीच्या शिफारशींविरुद्ध माध्यमिक शिक्षकांचा २१ ला मोर्चा
गडिहग्लज, ६ मार्च / वार्ताहर

 

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या. आता शिक्षकही मालमाल अशा ठळक बातम्या झळकल्या. पण हा वेतन आयोग लागू करताना महाराष्ट्र शासनाने सर्वच शिक्षकांची घोर निराशा केली असून हकीम समितीच्या शिफारशींविरूध्द माध्यमिक शिक्षकही निषेधात्मक आंदोलन छेडणार आहेत. २१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून सर्व शिक्षकांची प्रचंड संख्येने मोर्चात सहभागी होऊन शासनाचा निषेध करावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या बैठकीत करण्यात आले.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निवृत्त सनदी अधिकारी पी.एम.ए.हकीम यांच्या अध्यक्षतेखाली वेतन सुधारणा समिती गठित केली गेली. त्या समितीने दिलेल्या शिफारशींच्या आधारे सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे. हकीम यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने सहावा वेतन आयोग लागू केला. पण या शिफारशी शिक्षकी पेशाचा घोर अपमान करणाऱ्या आहेत. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्के असल्याच्या सबबीखाली त्यांना उच्च वेतन श्रेणीपासून वंचित ठेवले आहे.
हकीम समितीच्या अहवालाने राज्याच्या सर्वच शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कुचेष्टा केली आहे. म्हणूनच महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाने हा अहवाल फेटाळण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकीय पदांना पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करावा. शिक्षण सेवकांना सुधारित मानधन द्यावे, विनाअट वरिष्ठ व निवडश्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी आता माध्यमिक शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या संदर्भात कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची कोल्हापूर येथे बैठक झाली. अध्यक्ष बी.डी.पाटील, कार्यवाह वाय.बी.बांदेकर, राम पाटील आदींनी बैठकीत मार्गदर्शन केले. तालुकास्तरावरही आंदोलन छेडून २१ मार्च रोजी कोल्हापूर येथे मोर्चासाठी शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.