Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

यशवंत सहकारी बँकेची निवडणूक अखेर अविरोध
मिरज, ६ मार्च/वार्ताहर

 

ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी दबाव वाढविल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या यशवंत सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेवर आर्थिक र्निबध लादल्यानंतर आमदार हाफिज धत्तुरे यांच्या गटाने या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याने विद्यमान अध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ अविरोध निवडून आले.
मिरज अर्बन बँकेपाठोपाठ यशवंत बँकेची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी दबाव वाढविल्याने दैनंदिन व्यवहारही जिकिरीचे झाले होते.
बँकेची रोख तरलता सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने हस्तक्षेप केला असून, ठेवीदार अथवा अन्य खातेदारांना बँकेतून एकदाच एक हजार रुपयापर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. आर्थिक स्थिती पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी कर्जवसुलीसाठी कठोर प्रयत्नांची गरज भासणार आहे.
आर्थिक र्निबध गेल्या महिन्यात लागू झाल्यानंतर या बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली. गेल्या निवडणुकीत बँकेच्या संचालक मंडळासाठी आमदार हाफिज धत्तुरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल मैदानात उतरले होते.
मात्र या वेळी या गटाने निवडणूक प्रक्रियेतून अलिप्त राहाणे पसंत केले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. आर्थिक दुर्बल घटकासाठी एक जागा रिक्त राहिली असून, नव्याने निवड झालेल्या संचालक मंडळात दीपक शिंदे-म्हैसाळकर, ए. सी. पाटील, डॉ. महादेव म्हेत्रे, बाहुबली पाटील, अहमद शरीक मसलत, लक्ष्मण शिंदे, दादा बारगीर, हमजद निपणीकर, मुनीर अब्दुल रहिमान सतारमेकर, सुरेश काडापुरे, शिवाजी मोरे, दादासाहेब नानगुरे, श्रीमती गुलशनबी दस्तगीर पठाण, पद्मावती ऊर्फ धनुताई हेरवाडे व अब्दुल मुनाफ मौलाबक्ष अत्तार आदींचा समावेश आहे.