Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लग्नाच्या आमिषाने १५ वर्षे अत्याचार केल्याची तक्रार
मिरज, ६ मार्च / वार्ताहर

 

पत्नी म्हणून सांभाळण्याचे आमिष दाखवून तथाकथित संघटनेच्या अध्यक्षाने गेली १५ वर्षे लैंगिक शोषण केल्याची तक्रार परित्यक्ता महिलेने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. बहुजन समाज जागृती मंचचे अध्यक्ष गोविंद खटावकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सुभाषनगर येथे राहणारा गोविंद खटावकर हा शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता त्यातून परिचय वाढवून परित्यक्ता राहत असलेल्या घरी येऊन लैंगिक अत्याचार केले. जीवे मारण्याची धमकी देऊन असा प्रकार वारंवार केला. समाजात बदनाम करण्याची भीती घालून शारिरीक व मानसिक त्रासही दिला. याशिवाय या महिलेच्या बहिणीकडेही शरीरसुखाची मागणी केली. या तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गोविंद खटावकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही शासकीय अधिकाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याच्या तक्रारी त्याच्याविरोधात झाल्या होत्या. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती अभियंता संघटनेने राज्यपालांनाही निवेदन दिले आहे. या प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी सुरू आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल होताच गोविंद खटावकर हा बेपत्ता झाला असून अटकपूर्व जामीन मिळविण्याचे त्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.