Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राजर्षी शाहू यांच्यावरील मालिकेचे चित्रीकरण एप्रिलपासून
कोल्हापूर, ६ मार्च / प्रतिनिधी

 

राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठान कोल्हापूरतर्फे निर्मिल्या जाणाऱ्या ‘लोकराजा शाहू छत्रपती’ या दूरदर्शन मालिकेच्या उर्वरित भागांचे चित्रीकरण एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माजी महापौर भिकशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीवरून या मालिकेचे ५७ भाग प्रक्षेपित करण्यात आले आहेत. तथापि शाहू महाराजांच्या उत्तर आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे अद्याप चित्रीकरण व्हावयाचे आहे. सध्या १५ भाग तयार आहेत. तथापि शासकीय अनुदानाअभावी उर्वरित भागांचे चित्रीकरण थांबले होते. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर आणि विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या पुढाकारामुळे आता ३५ लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उर्वरित भागांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.शाहू महाराजांना राजर्षी किताब प्रदान समारोह, कानपूर परिषद, शिवस्मारक भांबुर्डा कोनशिला समारंभ, प्रिन्स ऑफ वेल्स यांची भेट, राजर्षी शाहू महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना, भारताला स्वातंत्र्य मिळण्यासंबंधी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी झालेली चर्चा, बहूजन समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी केलेले प्रयत्न, सनातनांचा विरोध, राजर्षीचे आजारपण, प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी झालेली भेट, मुंबईतील पन्हाळा लॉजवर झालेले शाहू महाराजांचे महानिर्वाण आदी महत्त्वाच्या घटनांचे चित्रीकरण अखेरच्या चित्रीकरण सत्रात करण्यात येणार आहे.