Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘शिवसैनिकांनी निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी’
कोल्हापूर, ६ मार्च / विशेष प्रतिनिधी

 

सन २००९ हे शिवसेनेचे लोकसभा आणि विधानसभेवर भगवा फडकविण्याचे ‘मिशन वर्ष’ आहे. शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केलेल्या या घोषणेचा स्वीकार करून प्रत्येक शिवसैनिकाने त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे, असे आवाहन सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी येथे केले.
येथील इंदिरा सागर सभागृहात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली. माजी जिल्हा उपप्रमुख रवी चौगुले, जिल्हा विद्यार्थी संघटक नितीन पाटील, रिक्षा संघटक प्रमुख राजू जाधव, अपंग संघटक प्रमुख सुधीर काशिद यांच्यासह सर्व जिल्हा उपप्रमुख, तालुका प्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा प्रमुख विजय कुलकर्णी होते.
मेळाव्यात संजय पवार यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना प्रमुख जो उमेदवार देतील त्याला विजयी करण्याचा निर्धार सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे असे आवाहन केले. ते म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सेनेचा उमेदवार तगडा असणार आहे. त्याला जनताही साथ दिल्याशिवाय राहणार नाही. अशा उमेदवाराला विजयी करून शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करावे. मेळाव्याचे आभार प्रदर्शन जिल्हा महिला संघटक शुभांगी साळोखे यांनी केले.