Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जाई-जुई मंचच्या पुढाकाराने सोलापुरात ग्रामीण सुविधा केंद्र
सोलापूर, ६ मार्च/प्रतिनिधी

 

शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती व मार्गदर्शनास सहाय्य ठरणारे ग्रामीण सुविधा केंद्र मल्टि कमॉडिटी एक्स्चेंजने (एमसीएक्स) जाई-जुई विचारमंचच्या मदतीने सोलापुरात सुरु केले आहे.
या ग्रामीण सुविधा केंद्राचे उद्घाटन एमसीएक्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ मॅसी व जाई-जुई विचार मंचच्या अध्यक्षा कु. प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ग्रामीण सुविधा केंद्र हा भारतीय टपाल विभाग व मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम आहे. राज्यात जळगाव, अमरावतीसह पाच ठिकाणी अशी केंद्रे आहेत. तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश गुजरात येथेही केंद्रे कार्यरत असून त्याद्वारे ८५ टपाल कार्यालये व ५०० गावांमधील सुमारे ३५०० शेतकऱ्यांना या केंद्रांमार्फत सेवा प्रदान केली गेली आहे. विविध पीक-पाण्याच्या माहितीविषयक गरजा, गोदामांची सुविधा, बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदींचे शिक्षण व सल्ला देणारे दालन म्हणून भारतीय टपालाच्या देशभरात फैलावलेल्या एक लाख ५५ हजार कार्यालयांच्या जाळ्यांचा पुरेपूर वापर करुन घेणारा हा अनोखा उपक्रम आहे.याप्रसंगी बोलताना कु. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, शेतकरी हा कृषिक्षेत्राची चालकशक्ती आहे. ग्रामीण विकास केंद्राची संकल्पना ही केवळ शेतकऱ्यांच्या हिताचीच ठरणार नाही तर ग्रामीण युवकांचे सबलीकरण करुन शहरे व गावांमध्ये दरीही भरुन काढता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.