Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मुस्लिमांच्या धार्मिक हक्कांच्या रक्षणासाठी सोमवारपासून ठिय्या आंदोलन
कोल्हापूर, ६ मार्च / प्रतिनिधी

 

घटनेतील मुस्लिमांच्या मूलभूत धार्मिक हक्कांच्या रक्षणासाठी सोमवार दिनांक ९ मार्चपासून विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती हिंदी है हम हिंदूोस्ता हमारा या संघटनेचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर आणि सरचिटणीस हुमायून मुरसल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
इस्लाममध्ये पाचवेळा नियमित सामुहिक नमाज पठण अनिवार्य आहे. हे धार्मिक कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्याला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. प्रथम मस्जिदीची परवानगी मग नमाज पठण हे बंधन म्हणजे शासनाचा धार्मिक कार्यात हस्तक्षेप ठरतो. मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक कर्तव्यापासून तो रोखणारा आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मुस्लिम समाज घटनेने दिलेल्या मूलभूत धर्मपालनाच्या अधिकाराचा वापर करत आलेला आहे. परंतु काही विघ्नसंतोषी मंडळी अकारण वाद उपस्थित करून तणाव निर्माण करतात. त्यामुळे मुस्लिमांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित व्हावे लागत आहे. सागरमाळ येथे एका मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधवांच्याकडून नमाज पठण केले जात होते. परंतु या इमारतीला मस्जिदीचा दर्जा नसल्यामुळे तिथे नमाज पठण करता येणार नाही असा आक्षेप घेण्यात आला. विशेष म्हणजे राजारामपुरी पोलिसांकडूनही या इमारतीत नमाज पठण करण्यास लेखी स्वरूपात परवानगी नाकारलेली आहे. याबद्दल शासनस्तरावर चर्चा होऊन निर्णय लागेपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत असे यावेळी सांगण्यात आले.