Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

आयपीएलला हिरवा कंदील
मुंबई, ६ मार्च/क्री.प्र.
इंडियन प्रीमियर लीग ट्वेंटी-२० स्पध्रेभोवती पसरलेले अनिश्चिततेचे धुके आता दूर झाले आहेत. वेळापत्रकात सुधारणा करून भारतात आयपीएलचा मोसम बहरणार असल्याची ग्वाही अध्यक्ष ललित मोदी यांनी आज येथे दिली. आयपीएलची सलामीची लढत १० एप्रिलला मुंबईत होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आयपीएलशी भेट घेतली. तसेच गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आयपीएल स्पध्रेला हिरवा कंदील देऊन योग्य सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आश्वासन दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असे मोदी यांनी सांगितले.

पवार हवेत की अडवाणी? भाजप शिवसेनेला विचारणार जाब !
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी

शिवसेनेतील ‘बोरुबहाद्दर’ आणि ‘चाणक्य’ हे परस्परविरोधी वक्तव्ये करून भाजपसमवेतच्या चर्चेत अधिकाधिक गुंता निर्माण करीत असल्याने यापुढील चर्चा कोणाशी करावी आणि पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे का, याचाही खुलासा करावा, अशी विचारणा थेट शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडेच करण्याचे भाजपच्या नेत्यांनी ठरविले आहे. अडवाणी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत शिवसेनेने मान्य केले होते.

अन्यथा ४८ जागांवर स्वबळावर लढू..
भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भावना !
समर खडस
मुंबई, ६ मार्च

लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान बनण्यात काही अडचण झाल्यास शिवसेना शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ शकते, या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते प्रचंड नाराज आहेत. युतीबाबत जवळपास ९९ टक्के बोलणी पूर्ण झालेली असताना हे विधान केल्याने त्याचा स्पष्ट खुलासा जोवर शिवसेनेतून होत नाही, तोवर काही खरे नाही. आम्ही ४८ जागांवरील आमच्या कार्यकर्त्यांना तयार राहण्यास सांगितले आहे, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणामुळे काहीसे अस्वस्थ असतानाच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही एक छोटीशी जखम झाली. छायाचित्रण करताना त्यांच्या हाताला झाडाचा काटा लागला. शिवसेनाप्रमुखांच्या काळजीने ते सातत्याने लीलावती इस्पितळात व्यस्त असतानाच युतीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. या वाटाघाटींत नको तितकी जहाल विधाने केली गेली व त्यामुळे युतीमध्ये नको तितका तणाव वाढला, असा भाजपमधील बहुतांश नेत्यांचा मतप्रवाह आहे. एकदा २४ -२४ असे जागावाटपाचे सूत्र ठरल्यानंतर लगेचच २६-२२ असा फॉम्र्युला मान्य करण्याचे काहीच कारण नव्हते, असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. जळगावसारख्या जागेवरून भाजपाशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. सुरेशदादा जैन पक्षात आले म्हणून भाजपने लढविलेली जागा मागण्यात काय अर्थ आहे, तसेच भाजपनेही मुंबई दक्षिणवर दावा करणे म्हणजे काटकुळे दंड फुगवून बेडक्या दाखविण्यासारखे आहे, असे मत एका शिवसेना नेत्याने व्यक्त केले.

काँग्रेस २७-२१ वर ठाम, तिढा कायम
नवी दिल्ली, ६ मार्च/खास प्रतिनिधी

मुंबईतून दिल्लीत पोहोचलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानच्या जागावाटपाच्या चर्चेचा गुंता सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेससाठी २३ जागा सोडून काँग्रेस २५ जागा लढणार असल्याची प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा सुरु असली तरी प्रत्यक्षात अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, असे आज काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी स्पष्ट केले. उभय पक्षांदरम्यान २००४ सालच्या २७-२१ च्या फॉम्र्युल्यानुसार वाटाघाटी सुरु असल्याचा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला.

वर्षभरात राज्यात लाखाहून अधिक खटल्यांचे मराठीतून निकाल
अजित गोगटे
मुंबई, ६ मार्च

जानेवारी ते डिसेंबर २००८ या वर्षभराच्या काळात महाराष्ट्रातील तालुका व जिल्हा पातळीवरील न्यायालयांनी एक लाखांहून अधिक फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांचे निकाल मराठीतून दिल्याची माहिती उच्च न्यायालयाने प्रशासकीय कामासाठी केलेल्या ताज्या आढाव्यातून स्पष्ट झाली आहे. मात्र यात बृहन्मुंबईतील न्यायालयांचा समावेश नाही.या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात एकूण १,०७, ३१३ प्रकरणांचे निकाल मराठीतून दिले गेले. यातही मराठीतून निकाल दिल्या गेलेल्या फौजदारी खटल्यांची संख्या (८७,६९५) दिवाणी प्रकरणांच्या निकालांपेक्षा (१९,७१८) सहा पटींहून अधिक आहे.

तस्करीप्रकरणातील बडतर्फ पोलिसाने स्वत:च्या मुलांवर गोळ्या झाडल्या
एकाचा मृत्यू , तर दुसरा चिंताजनक
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी

राजभवनमागे असलेल्या समुद्रातून उंची घडय़ाळ्यांची तस्करी केल्याप्रकरणी बडतर्फ झालेला पोलीस शिपाई आणि सध्या काँग्रेसवासी झालेल्या केशवराव भोसले याने आपल्या परवानाधारी रिव्हॉल्व्हरमधून दोन मुलांवर आज दुपारी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्याचा एक मुलगा मरण पावला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. तो स्वत:ही जखमी झाला आहे. वाळकेश्वर येथील बाणगंगा जवळील परस्व या इमारतीत पहिल्या मजल्यावर भोसले आपली दुसरी पत्नी व मुलीसह राहत होता. पहिल्या पत्नीचे श्राद्ध असल्यामुळे त्याची पहिल्या बायकोपासूनची दोन मुले राजेश (३०) आणि गणेश (२४) घरी आली होती. जेवण झाल्यानंतर दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बाप-लेकांमध्ये मालमत्तेवरून वादावादी सुरू झाली. दोन्ही मुलांनी लपवून आणलेली तलवार बाहेर काढताच भोसले याने रिव्हॉल्व्हरमधून दोघांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. गणेशच्या मणक्यात तर राजेशच्या गालात गोळी शिरली. गोळीबाराचा आवाज येताच शेजारच्यांनी धाव घेतली असता राजेश आणि गणेश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यामुळे मलबार हिल पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा राजेश आणि गणेशसह भोसले हाही जखमी अवस्थेत आढळून आला. दोन्ही मुलांना एलिझाबेथ रुग्णालयात तर भोसले याला भाटिया इस्पितळात दाखल करण्यात आले. अतिरक्तस्त्रावामुळे गणेशचा इस्पितळात दाखल केल्यानंतर लगेचच मृत्यू झाला मात्र राजेशच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. भोसले याच्या हाताला गोळी लागली आहे. मुलांनी भोसले याच्यावर गोळीबार केला की, भोसले याने स्वत:च हातावर गोळी मारून घेतली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मालमत्तेच्या वादातून तिघांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर काही क्षणातच गोळीबाराचा आवाज आल्याचे सांगण्यात आले. भोसले हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होता. परंतु मराठा समाजाबाबत त्याने काही विधाने केली म्हणून त्याला काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर तो काँग्रेसमध्ये गेला होता. विधानसभा निवडणुकीत भोसले खेडमधून विद्यमान विरोधीपक्षनेते रामदास कदम यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.

काँग्रेस - सपाचा मधुचंद्र संपुष्टात!
नवी दिल्ली, ६ मार्च/पी.टी.आय.

अणुकराराच्या मुद्दय़ावरून संकटात सापडलेल्या यूपीए आघाडीला मदतीचा हात देणाऱ्या मुलायमसिंग यांच्या समाजवादी पार्टीबरोबरचा ‘मधुचंद्र’ आज अधिकृतपणे संपुष्टात आला. राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात जागावाटपात दोन्ही पक्षांनी ताणून धरल्याने ही वेळ आली. ‘काँग्रेसबरोबरची आमची युती तुटली आहे.’ अशी घोषणा सपाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी आज केली. मात्र युती तुटली असली तरी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अमेथी आणि रायबरेली मतदारसंघांत सपा उमेदवार उभे करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ८० जागांच्या उत्तर प्रदेशात काँग्रेसने २५ जागांवर हक्क सांगितला होता. तर सपाने त्यांना अवघ्या १७ जागा देऊ केल्या होत्या. सपाने एकतर्फी ६२ जागांवरील आपल्या उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली होती. तर काल काँग्रेसने या कृतीला प्रत्युत्तर देताना २४ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. काँग्रेसच्या या कृतीने खवळलेल्या सपाने ही युती तुटल्याची घोषणा आज केली. ‘मला कठोर शब्द वापरायचे नाहीत. मात्र आमची युती तुटली आहे.. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील आपल्या २४ उमेदवारांची नावे जाहीर करून या युतीचा मृत्युलेख लिहिला.’ अशा शब्दांत अमरसिंग यांनी पत्रकार परिषदेत आपला राग व्यक्त केला.

शिवसेनाप्रमुख आज घरी परतणार!
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी

ताप आणि अशक्तपणा आल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती पूर्णत: सुधारली असल्याने उद्या त्यांना घरी जाण्याची मुभा देण्यात येईल, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज सांगितले. शिवसेनाप्रमुखांना २६ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ठाकरे यांना शुक्रवारी घरी जाण्याची मुभा देण्यात येणार होती. रुग्णालयात शरद पवार, छगन भुजबळ, राज ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.

 


प्रत्येक शुक्रवारी