Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

काँग्रेसचा प्रचार आज औरंगाबादमधून सुरू
औरंगाबाद, ६ मार्च/खास प्रतिनिधी

गरवारे स्टेडियमवर उद्या (शनिवारी) होणाऱ्या जनजागरण विकास यात्रेच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्याद्वारे काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडणार आहे. आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही उद्या सकाळी होत आहे.

‘तक्रार येताच महापौरांना नोटीस!’
महापौर बंगल्यावरची पत्रकार बैठक भोवणार?
औरंगाबाद, ६ मार्च/प्रतिनिधी
आचारसंहितेच्या काळात महापौरांच्या सरकारी बंगल्यावर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी यांची काल पत्रकार बैठक झाली. त्याबद्दलची डॉ. दत्ता पाथ्रीकर यांची तक्रार आपल्यापर्यंत आली नाही. तक्रार येताच महापौर विजया रहाटकर आणि संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी आज सांगितले.

एक जीवन - दोन कथा
सावरकरांचं असामान्यत्व सांगताना रणजित देसाई यांच्या लेखणीला बहर येतो. या कथेमधील काही सुभाषितवजा ही वाक्ये वानगीदाखल पाहा -
‘वेडय़ा स्वप्नांनी भारलेली आणि अजोड ध्येयाने प्रेरित झालेली माणसेच सूर्यमंडळ भेदून जाण्याचा ध्यास धरतात. ते समर्पणच त्यांच्या जीवनाचे साफल्य घडविते.’

बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंडित यांना अपात्र ठरविण्याची मागणी
संचालक धैर्यशील सोळंके यांचे गंभीर आरोप

बीड, ६ मार्च/वार्ताहर

जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार अमरसिंह पंडित यांनी मागील दोन वर्षांत संचालक मंडळाला अंधारात ठेवून कायमस्वरूपी नवीन १३५ कर्मचाऱ्यांची भरती केली. नूतनीकरण व नियमबाह्य़ कर्जाच्या वेगवेगळ्या सहा प्रकरणांत बँकेचे कोटय़वधी रुपये वाटप करण्यात आले. त्यामुळे या कारभाराची चौकशी करून अध्यक्षांना अपात्र ठरविण्याची कारवाई करावी, अशी मागणी संचालक धैर्यशील सोळंके यांनी काल केली.

‘यात्रा पॅटर्न’
वसंत मुंडे
बीड, ६ मार्च
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या शेतकरी संघर्ष यात्रा निघाली, त्यानंतर भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत उपरे यांची मंडल यात्रा झाली. राजकीयदृष्टय़ा जागृत आणि प्रदेश स्तरावर नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. आता विविध सामाजिक प्रश्नांवर यात्रा काढणाऱ्या नेत्यांचा जिल्हा म्हणूनही त्याची ओळख होऊ लागली आहे.

हत्तीला मुंगी भारी
प्रदीप नणंदकर
लातूर, ६ मार्च

उस्मानाबाद जिल्ह्य़ातून लातूर वेगळा झाला आणि त्याच्या थोडे आधीच लोकसभेचा स्वतंत्र मतदारसंघ मिळवला. ही गोष्ट १९८०ची. त्यापूर्वी लातूर व परिसरातील तालुक्यांसाठी लोकसभेसाठी उस्मानाबादच मतदारसंघ होता. सन १९८० ते १९९९ या काळातील सलग सात निवडणुका जिंकण्याचा मान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी पटकावला. मागच्या (२००४)निवडणुकीत तेच पुन्हा निवडून येणार असा सर्वाचा अंदाज होता.

नांदेडमध्ये दोन प्राध्यापकांना मारहाण
‘युवक राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप!
नांदेड, ६ मार्च/वार्ताहर
अनुपस्थित असलेल्या पत्नीच्या नावावर सेवकाला परीक्षा लिहू द्या, असा आग्रह धरीत दोन प्राध्यापकांना महाविद्यालयातच कोंडून बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी श्रीनिवास जाधव याच्यासह तिघांविरुद्ध सिडको पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून विद्यापीठात चालणाऱ्या परीक्षेतील अनागोंदीही समोर आली आहे.

आडाचं पाणी खोल गं..
नांदेड जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांच्या पाणीपातळीत घट
नांदेड, ६ मार्च/वार्ताहर
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने व पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणात झाल्याने जिल्ह्य़ातील १६ तालुक्यांमधील पाणीपातळीत घट झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. पाणीपातळीतील सर्वात जास्त घट धर्माबाद तालुक्यात २.७७ मीटर आहे.
जिल्ह्य़ात यंदा ६६ टक्के पावसाची नोंद झाली.

विमा कंपनीकडून पालिका कर्मचाऱ्यांची फसवणूक
मृत्यूनंतर रक्कम देण्याऐवजी उलट पैशांची मागणी
औरंगाबाद, ६ मार्च/प्रतिनिधी
मृत्यूनंतर पालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या पुढाकाराने कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यात आला होता. मासिक ७५ रुपयांचा हप्त्याच्या बदल्यात मृत्यू ओढावल्यास तीन लाख रुपयांचा दावा मिळणार होता. गुप्ता येथे असण्यापर्यंत याचा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना फायदा झाला.

श्रीसंत गोविंद स्मारक शिक्षणसंस्थेत वादच वाद
कार्यकारिणीचे दोन गट, दोन मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दोन गट आणि पालकांचेही दोन गट
अज़ीज़ मोमीन
जळकोट, ६ मार्च

तालुक्यातील वांजरवाडा येथील श्रीसंत गोविंद स्मारक शिक्षणसंस्थेत कार्यकारिणीवरून वाद सुरू आहे. त्यात आता भर पडली आहे, मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या वादाची. शिक्षणसंस्थेच्या कार्यकारिणीचे दोन गट, श्रीसंत गोविंद स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला दोन मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दोन गट आणि पालकांचेही दोन गट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जीवनशैली
‘जीवनशैली’ हा शब्द सध्याच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना समजायला जरा अवघड वाटेल. त्यांना त्यांच्या सोप्या भाषेत सांगायचे तर जीवनशैली म्हणजे ‘लाईफ-स्टाईल’. एखाद्या गायकाची, वादकाची, लेखकाची, कवीची, खेळाडूची शैली असते. म्हणजे त्या क्षेत्रातील त्यांच्या कामाच्या अदाकारीची ती विशिष्ट पद्धत असते. पण ‘जीवनशैली’ हा शब्द सर्वस्पर्शी आहे.

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी ‘छावा’ पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
भोकर, ६ मार्च/वार्ताहर

भोकर येथील सभेत छावाचे अण्णा जावळे यांनी मागासवर्गीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. भोकर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ५ मार्चला सायं. ७ वा. मोंढा मैदान येथे छावा संघटनेची सभा होती. तेथे छावाचे संस्थापक अण्णा जावळे यांनी मागासवर्गीय समाजास अश्लील भाषेत बेछूट शिविगाळ केली. मागासवर्गीय आरक्षणाच्या माध्यमातून अक्कल नसलेले लोक खुच्र्या बळकावत आहेत’ असे वक्तव्य करून तमाम मागासवर्गीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी जातीय विष पेरल्यामुळे अण्णा जावळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. या प्रकाराचा तीव्र निषेध करतो, असे नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर दलितमित्र पी. जी. क्षीरसागर, एल. ए. हिरे, अशोक राठोड, दशरथ भदरगे, नीळकंठ वर्षेवार, विठ्ठल माचनवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पळसखेडा हत्याकांड; आणखी आठ जणांना अटक
भोकरदन, ६ मार्च/वार्ताहर

पळसखेडा बेचिराख येथील सामूहिक हत्याकांडाच्या गुन्ह्य़ात सीआयडीने आणखी आठ जणांना आज अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक सातदिवे व पोलीस अधीक्षक जे. ए. जगताप यांनी दिली. सचिन नारायण पिसे, नारायण लक्ष्मण पिसे, देवाजी रंगनाथ पिसे, ईश्वर साहेबराव पिसे, बाजीराव दादाराव दळवी, गंगाधर गाडेकर, छगन बाबुराव दळवी, जनार्दन संतुकराव पिसे अशी आरोपींची नावे आहेत.

अंबाजोगाईतील दुकानातून पावणे दोन लाख रुपयांचे कापड चोरले
अंबाजोगाई, ६ मार्च/वार्ताहर

शहराच्या गुरुवार पेठेतील ‘डायमंड कलेक्शन’ या कापडाच्या दुकानातून काल रात्री १ लाख ८७ हजारांचे कापड चोरीला गेले. तथापि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. मुदिराज यांनी ६९ हजारांवर तक्रार नोंदविता येणार नाही, असा नवीनच फतवा काढला आहे. यामुळे व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.मोंढा भागातील ‘अनिल ट्रेडिंग कंपनी’तून तीन दिवसांपूर्वी ४० हजारांची चोरी झाली. त्यापाठोपाठ काल खालेद मोमीन यांच्या ‘डायमंड कलेक्शन’चे शटर वाकवून चोरी झाली. श्री. खालेद यांनी पावणेदोन लाखांची चोरी झाल्याची तक्रार दिली. तथापि श्री. मुदिराज यांनी ६९ हजारांच्या वर तक्रार न नोंदविण्याचा नवीनच फतवा काढला आहे. यामुळे व्यापारी व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.योगेश्वरी शाळेसमोरील अनमोल बेजगमवार यांच्या किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरांनी पाच हजारांची रोकड पळविली. चोऱ्यांचे सत्र गेल्या आठवडय़ापासून सुरू आहे.

मनात सेवेची भावना ठेवून काम करावे - ठक्कर
लातूर, ६ मार्च/वार्ताहर

मनात सेवेची भावना ठेवून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तरुण उद्योजक अजय ठक्कर यांनी केले.जनमाध्यम बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य गिरजाप्पा मुचाटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद नुरमियाँ उपस्थित होते.पुढे ठक्कर म्हणाले, आपल्या कामात प्रसन्नता असेल तर हातून चांगले कार्य घडू शकते. आपण विचाराने कमी जगतो आणि भावनेने अधिक जगतो. भावनेला व्यवहारात किंमत नाही. भावनेने जगण्यापेक्षा मनात सेवेची भावना ठेवून जगायला शिकले पाहिजे आणि भावना शुद्ध असायला हव्यात.याप्रसंगी प्राचार्य मुचाटे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सय्यद नुरमियाँ यांचेही समयोचित भाषण झाले. सूत्रसंचालन आयुब शेख यांनी केले.

परभणीत आज व उद्या निसर्गोपचार शिक्षण शिबिर
परभणी, ६ मार्च/वार्ताहर

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान व बालभवन सार्वजनिक वाचनालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ मार्च या दोन दिवसीय निसर्गोपचार शिक्षण शिबिराचे बालभवन सार्वजनिक वाचनालय, विद्यानगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन ७ मार्चला नवी दिल्ली महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा केंद्रातील निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. सच्चिदानंदजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यामंदिरचे अध्यक्ष हेमंत जामकर हे उपस्थित राहणार आहेत.

माधवराव विभूते यांचे निधन
लोहा, ६ मार्च/वार्ताहर

माधवराव विभूते यांचे आज वृद्धा-पकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांंचे होते. तालुक्यातील रायवाडी येथील रहिवासी असलेले विभूते यांचा लोह्य़ात हॉटेलचा व्यवसाय होता. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, स्नूषा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रायवाडीचे सरपंच गोविंद विभूते त्यांचे चिरंजीव होत.

गावतलाव गाळाने भरले
भोकर, ६ मार्च/वार्ताहर

भोकरच्या जवळ असलेले दोन्ही तलाव गाळाने तुडुंब भरलेले असून त्या तलावातील गाळ काढण्यात आला, तर पाण्याचे साठवण होऊ शकते. भोकरच्या पूर्व दिशेला महादेव मंदिरासमोर जुना तलाव आहे. तेथे पाणी साचत होते. मात्र काही दिवसांनंतर तलाव पूर्ण गाळाने भरून गेला. या तलावांमधील गाळ काढण्याची मागणी रेखा वैष्णव आदींनी केली आहे.

मोटारीच्या धडकेने बालकाचा मृत्यू
औरंगाबाद, ६ मार्च/प्रतिनिधी
भरधाव वेगातील मोटारीने धडक दिल्याने सात वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. प्रवीण संजय वानखेडे (रा. बदनापूर) असे बालकाचे नाव आहे. औरंगाबाद-जालना रस्त्यावर बदनापूरनजीक मायक्रो कंपनीसमोर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण हा रस्ता ओलंडत असताना मंठय़ाकडे जाणाऱ्या मोटारीने (एमएच २८-सी ४०५०) त्याला जोराची धडक दिली. बेशुद्धावस्थेत त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोटारीचालक पंढरीनाथ चव्हाण याच्याविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

केशरबाई भोसले यांचे निधन
औरंगाबाद, ६ मार्च/प्रतिनिधी
मुकुंदवाडी भागातील रहिवासी केशरबाई भाऊराव भोसले यांचे आज निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये केशरबाई यांच्यावर उद्या (शनिवारी) सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुकुंदवाडीतील वृत्तपत्र विक्रेते भोसले त्यांचे नातू होत.

नगररचना विभागाचे निवृत्त सहसंचालक चौथई यांची चौकशी
औरंगाबाद, ६ मार्च/प्रतिनिधी

नगररचना विभागाचे निवृत्त सहायक संचालक विकास चौथई यांनी पालिकेतील सेवेदरम्यान अनियमितपणा केल्याच्या तक्रारीनंतर त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौथई हे येथूनच निवृत्त झाले होते. येथील तीन वर्षांच्या सेवेत त्यांनी बांधकाम परवानगी देताना नियमांकडे डोळेझाक केल्याच्या तक्रारी पालिकेचे सदस्य आणि नागरिकांनीही केल्या होत्या. चौथई हे नगररचना विभागाच्या सेवेत होते. त्यामुळे या तक्रारी पुणेस्थित नगररचना संचालकांकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. याची दखल संचालकांनी घेतली आहे. चौथई यांच्या संबंधीच्या फाईल पुण्याला मागविण्यात आल्या आहेत.

ख्यातनाम चित्रकारांची विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाला भेट
औरंगाबाद, ६ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विविध चित्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांशी चर्चाही केली. ख्यातनाम चित्रकार मुरली लाहोटी (पुणे), चंद्रकांत चन्न्ो (नागपूर), युसुफ खान (भोपाळ), भगवान चव्हाण (बंगलोर), आप्पासाहेब काटे (औरंगाबाद), सुरेंद्र जगताप (मुंबई) याशिवाय अनंतकुमार बोरकर, शिल्पकार सुनील देवरे, नंदकुमार जोगदंड, अफझलखान आदी मान्यवरांनी आस्थेने विभागाची वाटचाल आणि प्रगतीची माहिती करून घेतली. याप्रसंगी मुरली लाहोटी यांच्या हस्ते वेशभूषा प्रदर्शनाचे तर युसुफ खान यांच्या हस्ते प्रकाशयोजना सामग्री प्रदर्शनाचे आणि चंद्रकांत चन्न्ो यांच्या हस्ते मल्टीमिडीया कक्षाचे उद्घाटन झाले.

निरपराधांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी फुलंब्री ठाण्यावर मोर्चा
औरंगाबाद, ६ मार्च/प्रतिनिधी

पाल घटनेनंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली. यात काही निरपराधांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी मल्हार सेनेच्या वतीने फुलंब्री पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष लहुजी शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. पहिल्या दिवशी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. अशांना तातडीने सोडून द्यायला हवे होते. परंतू पोलिसांनी त्यांना अद्यापि सोडले नाही. या घटनेत निरपराध भरडले जात असून त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पुरावे समोर आल्यानंतर निरापराधांना सोडण्यात येईल, असे आश्वासन श्री. वाघमारे यांनी शिष्टमंडळाला दिले.

डेरला उपसा सिंचन योजनेच्या कामाला प्रारंभ
लोहा, ६ मार्च/वार्ताहर

डेरला उपसा सिंचन योजनेच्या कार्यारंभाचा आदेश निघाल्यामुळे सोनखेडसह अकरा गावांत सिंचनाची सोय होणार आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे १७ कोटी रुपयांच्या या योजनेचे काम आता प्रत्यक्षात सुरू होण्यास मदत झाली. या ११ गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, जलसंपदामंत्री अजितपवार व चिखलीकर यांचे आभार मानले आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात श्री. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली डेरला, सोनखेड, जानापुरी, हरबळ, दापशेड, मडकी, आंबेसांगवी यासह अकरा गावांतील प्रमुखांचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांची भेट घेतली. जलसंपदामंत्र्यांनी डेरलाच्या उपसा योजनेसाठी १७ कोटींची मान्यता दिली. त्याचा कार्यारंभ आदेश दि. २७ फेब्रुवारीला निघाला. जळगावच्या ‘सिद्धार्थ कन्स्ट्रक्शन’तर्फे हे काम होणार आहे.

पोखर्णीकरांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही चालू
गंगाखेड, ६ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील पोखर्णी (वाळके) येथे भारत निर्माण योजनेच्या कामांमध्ये अध्यक्ष, सचिव व अभियंत्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशीही चालू आहे. भारत निर्माण योजनेत गावातील १८ लाख रुपयांची कामे निकृष्ट व अर्धवट झाल्याचे उपोषणकर्त्यांनी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनास वेळोवेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उपोषणकर्त्यांनी ५ नोव्हेंबर २००८ रोजी जिल्हा प्रशासनासह तहसील कार्यालयास याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर पुन्हा २ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोखर्णी (वाळके) येथे भारत निर्माण योजनेत झालेली कामे निकृष्ट दर्जाची व अर्धवट स्वरूपाची आहेत. तसेच संबंधित कामे अंदाजपत्रकानुसार होत नाहीत. विहिरीचे काम ३५ फुटांचेच झाले आहे. वापरलेले पाईप निकृष्ट दजाचे व तीन फुटांपेक्षा कमी आहेत. गावातील समितीचे अध्यक्ष, सचिव आणि अभियंता या तिघांच्या संगनमतातून बनावट होत आहे. या कामी आजपर्यंत १८ लाख रुपये उचलण्यात आले आहेत. परिणामी गावकऱ्यांना आजही दोन किलोमीटरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या कामांच्या चौकशीसाठी गावकरी उपोषणास बसले आहेत. निवेदनावर संजय पंडित, सर्जेराव पंडित, लिंबाजी धापसे, गंगाधर वाळके आदींसह १५ गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सोयाबीनच्या भरपाईपोटी सरकारकडून ११ कोटींचा निधी
अंबाजोगाई, ६ मार्च/वार्ताहर

लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या सोयाबीनच्या नुकसानीपोटी अंबाजोगाई व केज तालुक्यांतील सर्व गावांतील शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुदानापैकी ११ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) डॉ. विमल मुंदडा यांनी दिली.महसूल विभागाने बीड जिल्ह्य़ातील सोयाबीनचा पेरा केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांचे अंदाजित नुकसान गृहीत धरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अंबाजोगाई तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १९ कोटी ७५ लाख रुपये व केज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी ७१ लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे.अंबाजोगाई तालुक्यातील मंजूर रकमेपैकी ११ कोटी रुपयांचा निधी सरकारने संबंधित विभागाच्या खात्यात जमा केला असून उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल डॉ. मुंदडा यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चवरे, अशोक उगले, पंचायत समिती सभापती रुख्मिणबाई शेप, उत्तरेश्वर स्वामी आदींनी आभार मानले आहेत.

विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा - व्यंकट सगर
उदगीर - अनाथाचा नाथ बनणारी ही संस्था उल्लेखनीय कार्य करीत असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन जीलनात प्रगती करावी, असे आवाहन व्यंकट सगर यांन केले.
ग्रामविकास युवक मंडळ, बाऱ्हाळी संचालित निवृतीराव वडगावकर बालकाश्रम, उदगीर येथे गणवेशवाटपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालरोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब पाटील होते.
श्री. सगर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला करून अभ्यास करावा. आपल्यात आत्मविश्वास व जिद्द असेल तर कोणतेही संकट आपण दूर करू शकतो. मनातील जिद्द कायम ठेवली तर यश आपलेच आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता आंबदे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश बाळे, यांनी तर शेवटी आभार तेलंगे यांनी मानले.

पवार बालमंदिरात बालमहोत्सव रंगला
लोहा - वि. ग. पवार बालमंदिरात लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारा बालमहोत्सव हा विद्यार्थ्यांना नवप्रेरणा देणारा आहे. कै. विठ्ठलराव पवार यांच्या शैक्षणिक विचारांचा आदर्श हे बालक मंदिर जोपासत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केले.
गणेश उपासनेने बालमहोत्सवाचा आरंभ झाला. सुयश शिंदे, श्रीनिवास चालिकवार, निखिल वाघमारे, रुषभ वट्टमवार, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य पांचाळ, विशाल कोटलवार यांनी यात भाग घेतला. सिद्धी पवार, पूर्वा महाजन, पार्थ महाजन, प्रतिक अंबेकर, वेदांत दमकोडावार, श्रीकांत जिल्लेवाड यांनी राईम्स सादर केल्या. गणेश अकुलवार, ओमकार दमकोंडावार, साईनाथ पवार, प्रथमेश कऱ्हाळे, श्रीधर वसमतकर, अनिरुद्ध कंधारे, आवेश शेख यांनी ‘ए इश्क हाय..’, तर धनश्री राहटकर, साक्षी मोरे, श्रद्धा शिंदे, रितिका जोगदंड यांनी ‘ऐका दाजिबा..’ सादर केले. प्रियंका पवार, अंजली चव्हाण, अमोल चव्हाण यांनी नृत्य सादर केले. या महोत्सवाला पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

सामान्य ज्ञान २००९ चे प्रकाशन
उदगीर - कै. रावसाहेब पाटील शिक्षणसंस्था कल्लूरच्या वतीने कृषक समाजाचे नेते तथा माजी मंत्री आमदार गोविंदराव आदिक यांच्या हस्ते वेदप्रकाश भोसले संपादित ‘सामान्यज्ञान २००९’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे झाला. ‘‘ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना ‘सामान्य ज्ञान’ अवगत होण्याच्या दृष्टीने साध्या व सोप्या मराठी भाषेत अद्ययावत माहिती संकलित करण्याचा संपादकाचा या सामान्य ज्ञान २००९ मध्ये प्रयत्न आहे. हे पुस्तक सर्वाच्या पसंतीस उतरेल’’ असा विश्वास आमदार गोविंदराव आदिक यांनी प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केला. या प्रकाशन सोहळ्यास रवींद्र मडाडिक, संपादक वेदप्रकाश भोसले, विजयकुमार भोसले, धैर्यशील शितोळे, प्रा. सुरेखा भोसले, सुदेशराजे शिर्के, राजेश्वर भोसले आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेचा सुवर्णमहोत्सव साजरा
चाकूर - बेलगाव येथे जिल्हा परिषद शाळेचा सुवर्णमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ओमकार स्वरूपा..’ या गीताने कल्याणी जाधव या विद्यार्थिनीने केली. ‘किलबिल किलबिल पक्षी बोलते’, ‘रविवार माझ्या आवडीचा’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या नृत्यगीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘हुंडा नको मामा पोरगी द्या मला’ हे गीत अंजली मधे व युनुस शेख यांनी, तर ज्योती सांगुळेने ‘रेशमाच्या रेघांनी..’ ही लावणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोती बुद्रुक-पाटील यांनी, तर आभार नरहारे राजकुमार यांनी केले.