Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आयपीएलला हिरवा कंदील
मुंबई, ६ मार्च/क्री.प्र.

 

इंडियन प्रीमियर लीग ट्वेंटी-२० स्पध्रेभोवती पसरलेले अनिश्चिततेचे धुके आता दूर झाले आहेत. वेळापत्रकात सुधारणा करून भारतात आयपीएलचा मोसम बहरणार असल्याची ग्वाही अध्यक्ष ललित मोदी यांनी आज येथे दिली. आयपीएलची सलामीची लढत १० एप्रिलला मुंबईत होणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आयपीएलशी भेट घेतली. तसेच गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आयपीएल स्पध्रेला हिरवा कंदील देऊन योग्य सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आश्वासन दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असे मोदी यांनी सांगितले.
सर्व राज्य सरकारांशी आम्ही संपर्कात असून, नवे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल. प्रायोजक, संघ आणि क्रिकेटरसिकांना मी ग्वाही देतो की आयपीएल सुरू होते आहे आणि अन्य देशांत ते हलविण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असे मोदी म्हणाले. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर लाहोर येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर आयपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. १० एप्रिलपासून आयपीएल ट्वेंटी-२० स्पर्धा सुरू होत असून, नेमक्या याच कालावधीत भारतात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
हैदराबाद येथे चिदंबरम यांनी पत्रकारांना सांगितले की, आयपीएलच्या काही सामन्यांच्या तारखा बदलणे अपरिहार्य आहे.तसेच भरघोस पारितोषिक रकमेची ही प्रतिष्ठेची आयपीएल स्पर्धा सुरळीत आयोजित व्हावी, याकरिता आम्ही सवरेतोपरी प्रयत्नशील राहू.
आयपीएलचे वेळापत्रक आणि निवडणुकीच्या तारखा या आसपासच येत आहेत. आयपीएलने जेव्हा वेळापत्रक जाहीर केले तेव्हा निवडणूक आयोगाने आपल्या तारखा घोषित केल्या नव्हत्या. त्यामुळे स्वाभाविकता निवडणूक आयोगाने या तारखांची नोंद घेतली नव्हती, असे चिदंबरम यांनी सांगितले. सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी असल्यामुळे त्या दिवशी आयपीएलचे देशभरात कोणतेही सामने होणार नाहीत, असे मोदी यांनी सांगितले. मतमोजणीच्या दिवशी एकही सामना कोणत्याही शहरात होणार नाही. सामन्याच्या आयोजनाकरिता आमच्याकडे १४ शहरे उपलब्ध असून, त्यापैकी आठ शहरे निश्चित करण्यात येतील, असे ते पुढे म्हणाले.
ज्या दिवशी शहरात मतदान असेल त्या दिवशी तिथे कोणताही सामना नसेल. याची नव्या वेळापत्रकात काळजी घेण्यात आली आहे. आयपीएलच्या नव्या वेळापत्रकात सामन्यांच्या संख्येत कपात करण्यात येणार नाही आणि लवकरच ते घोषित करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर आयपीएल दक्षिण आफ्रिकेतील सुरक्षा सल्लागारांशी पुढील आठवडय़ात महत्त्वपूर्ण भेट घेणार आहे.

दुसऱ्या हंगामाचा प्रारंभ मुंबईत
इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा प्रारंभ १० एप्रिलला मुंबईत होणाऱ्या सलामीच्या लढतीने होणार आहे, अशी माहिती आयपीएलच्या सुत्रांनी दिली.
आधीच्या वेळापत्रकानुसार, या प्रतिष्ठेच्या ट्वेन्टी-२० स्पध्रेची उद्घाटनीय सोहळा जयपूरला होणार होता. पहिल्या हंगामाचे विजेते राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सलामीची लढत होणार होती. परंतु श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर लाहोरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त झाल्यामुळे आयपीएलच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला. कारण आयपीएल आणि सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा एकाच काळात येत आहेत. नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयपीएलतर्फे सांगण्यात आले आहे.