Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पवार हवेत की अडवाणी? भाजप शिवसेनेला विचारणार जाब !
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी

 

शिवसेनेतील ‘बोरुबहाद्दर’ आणि ‘चाणक्य’ हे परस्परविरोधी वक्तव्ये करून भाजपसमवेतच्या चर्चेत अधिकाधिक गुंता निर्माण करीत असल्याने यापुढील चर्चा कोणाशी करावी आणि पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे का, याचाही खुलासा करावा, अशी विचारणा थेट शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडेच करण्याचे भाजपच्या नेत्यांनी ठरविले आहे.
अडवाणी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत शिवसेनेने मान्य केले होते.
त्यानंतर गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका विशिष्ट स्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊही, असे वक्तव्य करून पवारांना शिवसेनेचा पाठिंबा हा ते मराठी असल्याने असेल, असे स्पष्ट केले होते. तसेच मराठीच्या मुद्दय़ावरच गोपीनाथ मुंडे अथवा नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तरी चालतील, असा मतप्रवाहही शिवसेनेच्या गोटातून व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे अडवाणींना पाठिंबा आहे का आणि शिवसेना पाच वर्षे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमवेतच राहणार का, हे स्पष्ट करावे, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे.
शिवसेनेने आज मुखपत्र सामनातून जागावाटपाबाबतची बोलणी पूर्ण, अशी मुख्य बातमी देऊन आता कोणतीही तडजोड नाही, असा इशाराच भाजपला दिला. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांची तातडीची बैठक झाली. त्या बैठकीत, गेल्या दोन दिवसांत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबत चर्चा करण्यात आली. युतीची यापुढील चर्चा दिल्लीत होईल, या शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेण्यात आला आणि दिल्लीत नव्हे तर मुंबईतच जागावाटप आणि अन्य चर्चा पूर्ण होईल, असा निर्णय शिवसेनेला कळविण्याचे ठरले.
शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलेले विधान आणि त्यानंतर संजय राऊत यांनी केलेले विधान यामुळेच युतीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे अधिकृत चर्चा कोणाशी करावयाची, असे सरळ शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाच विचारण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे यापुढे शिवसेनेशी चर्चा करताना गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी हे एकत्रितपणे चर्चेत सहभागी होतील, असेही ठरविण्यात आले. अडवाणींबाबत स्पष्ट भूमिका नसेल तर शिवसेनेने युती तुटल्याचे जाहीर करावे, असे काल गडकरी म्हणाले होते. तर कोणीही काहीही वक्तव्ये केली तरी युती होणारच, असे मुंडे म्हणाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्या हॉस्पिटलमधून घरी जाण्याची मुभा देण्यात येणार असल्याने युतीच्या वतीने उद्या जाहीर करण्यात येणारे लोकसभा मतदारसंघाचे वाटप पुढे ढकलण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. युतीचे संयुक्त वाटप शनिवारी जाहीर करण्याचे मुंडे यांनी काल सांगितले होते. मात्र युतीचे जागावाटप उद्याच जाहीर व्हावे यासाठी शिवसेना व भाजपमधील एक गट आज प्रयत्नशील होता.