Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेस २७-२१ वर ठाम, तिढा कायम
नवी दिल्ली, ६ मार्च/खास प्रतिनिधी

 

मुंबईतून दिल्लीत पोहोचलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानच्या जागावाटपाच्या चर्चेचा गुंता सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेससाठी २३ जागा सोडून काँग्रेस २५ जागा लढणार असल्याची प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा सुरु असली तरी प्रत्यक्षात अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, असे आज काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी स्पष्ट केले. उभय पक्षांदरम्यान २००४ सालच्या २७-२१ च्या फॉम्र्युल्यानुसार वाटाघाटी सुरु असल्याचा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला.
आज रात्री केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी, सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही जागावाटपाच्या मुद्यावर फारशी प्रगती होण्याची शक्यता नसल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. काँग्रेसने २७-२१ अशाच जुन्या सूत्रानुसार निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केल्याचे समजते, तर राष्ट्रवादी काँग्रेसने २४-२४ आग्रह सोडलेला नाही. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरु होती.
राष्ट्रवादी काँग्रेसशी जागावाटपावरून सुरु असलेल्या बोलणीची दिशा सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. पण त्यांनीही आकडय़ाच्या वादात आपण पडणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जागावाटपाचा २३-२५ असा समझोता होत असल्याच्या वृत्ताला आपण दुजोराही देत नाही आणि खंडनही करीत नाही, अशी भूमिका घेत त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
मात्र, २००४ सालच्या २७-२१ सूत्रात अजून तरी कोणताही बदल झाला नसल्याची माहिती जागावाटपाच्या बोलणी सहभागी झालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली. काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असून हे सूत्र बदलण्याची शक्यता नाही, असे संकेतही त्यांनी दिले. लोकसभेच्या २४ जागा मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी २३ जागा सोडत असल्याची प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुरु असलेली चर्चा भ्रामक असून त्यात तथ्यांश नसल्याचा दावा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला.
काँग्रेसच्या जोरावर महाराष्ट्रात आपली ताकद वाढवून बरोबरीच्या गोष्टी करणाऱ्या राष्ट्रवादीला अतिरिक्त २ जागा का वाढवून द्यायच्या, अशी भूमिका दिल्लीतील काँग्रेसश्रेष्ठींसह राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचे समजते. शिवसेनेशी युतीबाह्य संबंध ठेवून लोकसभा निवडणुकांनंतर दिल्लीतील सत्तेसाठी चर्चा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वासार्हतेवरही आता प्रश्नचिन्ह लावले जात आहे. लोकसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस युपीएसोबत राहील की काँग्रेसच्या जीवावर जास्तीत जास्त जागाजिंकून तिसऱ्या आघाडीत सामील होईल, असा प्रश्न काँग्रेसच्या गोटात उपस्थित करण्यात येत आहे.