Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
प्रादेशिक

महात्मा गांधी यांच्या साहित्यावरील ‘स्वामित्त्वधना’चा अधिकार संपुष्टात!
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी

महात्मा गांधी यांच्या साहित्यावर गेल्या काही वर्षांंपासून असलेला ‘नवजीवन ट्रस्ट’चा स्वामित्त्वधनाचा (कॉपीराइट) अधिकार नुकताच संपुष्टात आला आहे. यापूर्वी स्वामित्त्वधनाचे अधिकार नवजीवन ट्रस्टकडे असल्याने या ट्रस्टशिवाय अन्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला गांधीजींचे साहित्य प्रकाशित करता येत नव्हते. मात्र हा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता महात्मा गांधी यांचे साहित्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला किंवा गांधीप्रेमी मंडळींना प्रकाशित करता येणार आहे.

मुंबईत आता सायलेन्स झोन
फटाके, ध्वनिक्षेपक, हॉर्नवर बंदी
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी
मुंबईतील रूग्णालये, न्यायालय, शाळा-महाविद्यालये, मंदिर यांच्यापासून १०० मीटरच्या परिसरात यापुढे कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदुषण केल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. १०० मीटरच्या परिसरात फटाके वाजवणे, ध्वनीक्षेपक लावणे, घोषणाबाजी करणे तसेच गाडय़ांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

अर्भकचोरीबद्दल भरपाई देण्यास पालिकेचा नकार
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी

मोहिनी आणि मोहन नेरुरकर या चेंबूरच्या दाम्पत्याला दोन मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा जन्मानंतर तिसऱ्या दिवशी शीव येथील लो. टिळक रुग्णालयातून पळविला जाण्यास तेथील कर्मचारी जबाबदार आहेत, असे खातेनिहाय चौकशीतून निष्पन्न होईपर्यंत या दाम्पत्यास कोणत्याही प्रकारची अंतरिम भरपाई आम्ही देऊ शकत नाही, अशी भूमिका बृहन्मुंबई महापालिकेने आज उच्च न्यायालयात घेतली. अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेऊन तो आपल्या ताब्यात दिला जावा यासाठी मोहन नेरुरकर यांनी केलेली ‘हेबियस कॉर्पस्’ याचिका प्रलंबित आहे.

..तर आमदार आव्हाड यांना रस्त्यावर फिरू देणार नाही
शिवसेनेचा इशारा
ठाणे, ६ मार्च/प्रतिनिधी
ठाण्याच्या सीमेवरील डंपिंग ग्राऊंडबाबतची वस्तुस्थिती माहीत असतानाही राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘पब्लिसिटी स्टंट’ सुरू केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे लोकांमधून निवडून आले आहेत.

इंद्रायणी एक्स्प्रेस आता सोलापूपर्यंत?
पुणेकरांचा विरोध
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी
मुंबई-पुणेदरम्यान धावणारी इंद्रायणी एक्स्प्रेस गेल्या काही महिन्यापासून प्रायोगिक तत्वावर सोलापूपर्यंत नेण्यात येत आहे. अर्थात पुणे-सोलापूरदरम्यान ती विशेष गाडी म्हणून चालविण्यात येत आहे. मात्र अपेक्षित प्रतिसाद लाभल्यास ती सोलापूपर्यंत कायम करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.

वीजचोर कारखानदाराला दोन वर्षे सक्तमजुरी
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी

मालेगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने वीजचोरीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात एका कारखानदाराला अडीच वर्षे आणि दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्याचप्रमाणे या दोन्ही प्रकरणी एकूण १२ हजार रुपये दंडही ठोठावला आहे.मालेगाव येथील रफिक अहमद अमरुल्ला अन्सारी याच्या मालकीचे दोन कारखाने आहेत. भरारी पथकाने या दोन्ही कारखान्यांच्या विजेच्या मीटरची अचानक तपासणी केली. तेव्हा दोन्ही मीटरचे सील तोडल्याचे आढळले. मीटर रीडिंग कमी व्हावे यासाठी मीटरमध्ये अतिरिक्त सर्किट जोडून विजेची चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हे दोन्ही मीटर जप्त करण्यात आले. ‘महावितरण’च्या वतीने त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपपत्र निश्चित करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी अन्सारी याला दोन वर्षे सहा महिने आणि दोन वर्षे सक्तमजुरीची तसेच १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

व्याजदरकपातीला बँकांकडून सुरुवात
मुंबई, ६ मार्च/ व्यापार प्रतिनिधी

रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या व्याजदरांच्या कपातीच्या संकेतानुसार, आयसीआयसीआय बँकेसह, युनियन बँक आणि बँक ऑफ बडोदाने आपल्या प्राधान्य क्षेत्र कर्जाच्या व्याजदरात आज कपातीची घोषणा केली. लवकरच अन्य बँकांही हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रात सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जासाठी येणाऱ्या नव्या ग्राहकांसाठी व्याजाचे दर पाव ते अर्धा टक्क्यांनी कमी केले आहेत. २० लाख रुपयांपर्यंतच्या या बँकेच्या गृहकर्जावर आता पूर्वीच्या १० ऐवजी ९.७५ टक्के असा नवा दर लागू होईल. तर २० ते ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर १०.५ ऐवजी १० टक्के असा नवा दर ताबडतोबीने लागू होईल. बँक ऑफ बडोदाने १ एप्रिलपासून प्रमाण ऋण दरात अर्धा टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. त्या आधी युनियन बँकेनेही याच धर्तीची घोषणा केली आहे. यूको बँकेच्या संचालक मंडळाची या संबंधाने शनिवारी बैठक होत असून, व्याजदर कपातीचा निर्णय या बैठकीत अपेक्षित आहे.

ठाण्यात सेना-भाजपची युती संपुष्टात!
ठाणे, ६ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप व युतीवरून सेना-भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू असतानाच ठाण्यातील पोटनिवडणुकीत भाजपने सेनेच्या विरोधात उमेदवार उभा करून स्थानिक पातळीवरील युती संपुष्टात आणल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी कल्याणची जागा तसेच पंतप्रधान पदासाठी कोणाला पाठिंबा यावरून सेना-भाजपात सध्या जोरदार धुमशान चालू आहे. ठाण्यात आणि जिल्ह्यातही भाजप कमकुवत असल्याने कल्याणची जागा आपल्याला मिळावी अशी भूमिका सेनेने घेतली आहे. त्यामुळे गेल्याच आठवडय़ात नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करून सेनेला आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपने आता थेट निवडणुकीच्या माध्यमातून सेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.ठाणे महापालिका प्रभाग २९ मध्ये २५ मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे राजन धुमाळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला, तर सेना-भाजपाने स्वतंत्ररित्या उमेदवार उभे केल्याने शहरातील युती संपुष्टात येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

उकाडा असह्य झाल्याने दहावीची विद्यार्थिनी कोसळली
बदलापूर, ६ मार्च /वार्ताहर

अंबरनाथ येथील शास्त्री हिंदी विद्यालयात रूपाली बाजीराव सोलकर या विद्यार्थिनीस उकाडा सहन न झाल्याने ती चक्कर येऊन दहावीच्या परीक्षा केंद्रावरच कोसळली. या मुळे महावितरणच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.अंबरनाथ शहरात दहावीची एकूण १३ केंद्रे असून ३५८१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. त्यापैकी सहा केंद्रावर जनरेटरची व्यवस्था आहे. केंद्रांवर जनरेटरची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे भारनियमन कालावधीत प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, आघाडी शासन जर दहावीच्या केंद्रांवर भारनियमनाच्या काळात पर्यायी व्यवस्था करू शकत नसेल तर त्यांनी तसे जाहीर करावे. भारतीय विद्यार्थी सेना विद्यार्थ्यांसाठी जनरेटरची व्यवस्था करेल, असे भाविसेतर्फे सांगण्यात आले.

तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याविरुद्ध कारवाई
मुंबई, ६ मार्च / प्रतिनिधी

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तिकिटे मिळत नसताना तिकिटांचा काळाबाजार करून प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या एका एजंटवर रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या एजंटला कनिष्ठ न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरपीएफने एल. बी. एस. रोड, कुर्ला येथून अटक केलेल्या या एजंटचे नाव डीके जयस्वाल आहे.