Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

पीळदार अतुल!
सुनील नांदगावकर

मराठी चित्रपट सध्या फॉर्मात आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पाहायला लोक जाऊ लागले आहेत, चित्रपटांची संख्या खूप वाढलीय. निरनिराळे विषय हाताळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मराठी चित्रपट निर्माते आणि अन्य व्यावसायिक आपला चित्रपट तांत्रिकदृष्टय़ा सफाईदार असावा यासाठी आग्रह धरू लागले आहेत. पण विशिष्ट भूमिकेसाठी विशेष तयारी आणि मेहनत घेण्याचे प्रयत्न नटमंडळी करताहेत असे फारसे दिसत नाही. पण अष्टपैलू अभिनेता अतुल कुलकर्णी याला संपूर्णपणे अपवाद ठरला आहे. ‘नटरंग’ या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी अतुल कुलकर्णीने भारदस्त शरीरयष्टी धारण केली आहे.

मुंबईचा ‘ग्रीन’ फेरफटका
विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचा उपक्रम

प्रतिनिधी
निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी दरवेळी एखादे हिलस्टेशनच गाठले पाहिजे असे नाही. मुंबईत ठिकठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहात असली तरी कित्येक ठिकाणी विविधतेने नटलेली वृक्षसंपदा आहे. रस्त्यावरून जाताना कित्येक वेळा आपण त्या झाडाच्या सावलीतून जातो. पण ते निसर्गसौंदर्य चटकन आपल्याला दिसत नाही. मुंबईतील वृक्षवल्लींची माहिती व्हावी आणि या निसर्गसौंदर्याची मजा लुटता यावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे ‘वृक्ष सौंदर्याचा आस्वाद’ या अभ्यासक्रमाची नवी तुकडी १४ मार्च २००९ पासून सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत तीन शनिवार-रविवार दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत भटकंती करुन मुंबईतील वृक्षांची माहिती घेण्यात येईल. दक्षिण मुंबईतील विद्यापीठ उद्यान, मलबार हिलचा उतार, जिजामाता उद्यान, दादर पारसी कॉलनी या ठिकाणी वृक्ष सौंदर्याचा आस्वाद घेता येणार आहे.

..अशी ही पटवापटवी
सुनील डिंगणकर

उत्तर गोव्यातील कोलवले नदीच्या किनाऱ्यावरील एक टुमदार बंगली.. ऐसपैस खोल्या.. समोर हिरवीगार वनराई.. आजूबाजूला नीरव शांतता.. मशालींच्या प्रकाशात उजळून निघणारी रात्र.. चंद्रप्रकाशात नदीत पडलेले गर्द वनराईचे प्रतिबिंब.. परफेक्ट ‘डेट’साठी एकदम परफेक्ट ‘स्पॉट’. या बंगलीमध्ये सध्या नऊ तरूण आणि नऊ तरूणी राहात आहेत. त्याचप्रमाणे एक ‘किंग’ आणि एक ‘क्वीन’ आहे. तरुणांनी क्वीनला तर तरुणींनी किंगला इम्प्रेस करायचे आहे. या तरुण-तरुणींचा हा सर्व खटाटोप ‘एम टीव्ही’वरील ‘स्प्लिट्सविला’चे विजेतेपद पटकाविण्यासाठी सुरू आहे.

विक्रमादित्य ‘पृथ्वी’
नीरज पंडित

बाजा एसएइ इंडियाने आयोजित केलेल्या रेस कार स्पध्रेत आयआयटी, मुंबईच्या ‘पृथ्वी’ या रेस कारने सर्वाधिक पाच पारितोषिके पटकावून विक्रम नोंदविला आहे. या स्पध्रेत ‘पृथ्वी’ला डिझाइन, अ‍ॅक्सेलरेशन, सवरेत्कृष्ट वेग यासाठी पहिले तर कमी खर्च आणि डोंगर चढाईसाठी दुसरे पारितोषिक मिळाले आहेत. या विजयानंतर आयआयटी, मुंबईची टीम ब्रिटनमध्ये जुलै २००९ रोजी होणाऱ्या ‘फॉम्र्युला स्टुडण्ट’ या स्पध्रेत सहभागी होणार आहे.

‘शामरंग होरी’
प्रतिनिधी

वसंतराव देशपांडे संगीत सभेतर्फे येत्या १४ मार्च रोजी होळीनिमित्त माटुंगा येथील यशवंतराव नाटय़मंदिर येथे रात्री ८ वाजता ‘शामरंग होरी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प. कुमार गंधर्व यांचे पुत्र व पट्टशिष्य पं. मुकुल शिवपुत्र आपल्या वैशिष्टपूर्ण गायकीतून होळीचे विविध रंग उलगडून दाखवणार आहेत. त्याचप्रमाणे डॉ. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य प. चंद्रकांत लिमये खास ढंगात ‘होरी’च्या बंदिशी व ठुमऱ्या पेश करणार आहेत.

लेखक-प्रकाशक आणि वाचकांचा ‘ई वाटाडय़ा’!
प्रतिनिधी

मराठी भाषेखेरीज अन्य भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. भारतीय भाषांमध्ये हिंदीसह बंगाली आणि अन्य भाषेत दरवर्षी मोठय़ा प्रमाणात नवीन पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठीमध्येही वर्षांकाठी सुमारे बाराशे पुस्तके प्रकाशित होत असूून ती सर्व वाचकांपर्यंत पोहोचतातच असे नाही. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आता केवळ मराठीच नव्हे तर अन्य भारतीय भाषांमधील पुस्तके लेखक, प्रकाशक आणि वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता ‘ई वाटाडय़ा’ उपलब्ध झाला आहे.

मुंबईचे ‘रिमेक’चे तीनतेरा
दक्षिण मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने अखेर सुधारीत विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) जाहीर केली. परंतु ही सुधारीत नियमावली मुंबईच्या ‘रिमेक’मध्ये सर्वात मोठी अडचण ठरणार असल्याची ओरड विकासक करीत आहेत. ते साहजिकच आहे. याचे कारण म्हणजे मुंबईत सुमारे १९ हजारच्या आसपास जुन्या इमारती आहेत. या इमारतींचा संपूर्ण पुनर्विकास होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संपूर्णपणे नव्या पायाभूत सुविधांचीही तातडीने उभारणी होणे आवश्यक आहे.

‘समुद्र मंथन - वेध मुंबईच्या समुद्राचा’
पर्यावरण शिक्षणाचे उपक्रम मुंबईतल्या शाळांबरोबर करताना काही तरुणांना जाणवले की, मुंबईतल्या पर्यावरणात धोकादायक ठरणाऱ्या गटात सागरी प्रदूषण खूपच जास्ती आहे. दररोज सोडले जाणारे २.५ दशलक्ष लिटर दूषित पाणी, खारफुटीची तोड, इतर घन कचरा या सर्वानीच सागरी पर्यावरणाची धोक्याची पातळी गाठली आहे. तेव्हा याकडे सजगपणे पाहात त्यांनी या अथांग सागराचा वेध घ्यायला सुरुवात केली आणि पाच वर्षांचा अभ्यासानंतर एक माहितीपूर्ण संकलन साकारले. ‘समुद्रमंथन- वेध मुंबईच्या समुद्राचा’ हे अनोखे पुस्तक. सृष्टीज्ञान पर्यावरणप्रेमी संस्थेने साकारलेल्या ‘समुद्रमंथनाचा’ प्रकाशन सोहळा नुकताच रचना संसद खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

एसबीआयच्या गृहकर्ज योजनेचा एचडीएफसीवर परिणाम नाही
प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आठ टक्के एवढय़ा कमी व्याजाने गृहकर्ज देऊ केले असले तरी एचडीएफसी या मार्केट लीडरवर त्याचा काही परिणाम होणार नसल्याचे विश्लेषकांचे मत आहे. त्यांच्यामते एचडीएफसीद्वारे दिली जाणारी ओव्हरऑल इंटरेस्ट कॉस्ट आजही सर्वात कमी आहे. स्टेट बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘कॉस्ट बेनिफिट्स’चे विश्लेषण केले असता एडलवाईस या संस्थेतील विश्लेषकांच्या लक्षात आले की, या योजनेमुळे एचडीएफसीच्या स्थानाला धक्का पोहोचण्याची शक्यता कमी आहे.

‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ सोहळा आज रंगणार
प्रतिनिधी

‘संस्कृती कलादर्पण’ या संस्थेच्या वतीने नाटक, चित्रपट शैक्षणिक, समाजजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी सत्कार करण्यात येतो. यंदाचा ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ ७ मार्च रोजी सायंकाळी ५.५५ वाजता रवींद्र प्रभादेवी येथील नाटय़मंदिरमध्ये रंगणार आहे. ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ श्रीनिवास खळे यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्यात बाल रंगभूमि, व्याववसायिक नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, मराठी वृत्तवाहिनी यातील कलाकार व तंत्रज्ञांना गौरविण्यात येणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते मनोहर जोशी, कामगारमंत्री नवाब मलिक, वनमंत्री बबनराव पाचपुते, सामाजित न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, विधानपरिषद सभापती वसंत डावखरे त्याचप्रमाणे चित्रपट आणि नाटय़क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

बाल आणि हौशी चित्रकारांच्या चित्रांतून रेखाटला ‘थरार’
प्रतिनिधी

लालबाग येथील सह्याद्री क्रीडा मंडळातर्फे ‘दहशतवाद’ या विषयावर पोस्टर्स स्पर्धेचे अलीकडेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बाल चित्रकार तसेच हौशी चित्रकारांनी आपल्या चित्रांमध्ये दहशतवादाचा ‘थरार’ रेखाटला होता. स्पर्धेतील काही उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन येत्या ८ मार्चपासून डॉ. एस. एस. राव रोड, गांधी रुग्णालयाशेजारी, लालबाग येथे भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वासाठी खुले राहील. बाल व हौशी चित्रकारांनी दहशतवाद या विषयावर रेखाटलेली ही चित्रे पाहण्यासाठी रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेत ८५० चित्रकार सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात सायंकाळी ७ वाजता पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

आरोग्य सेवेत लोकसहभागाची गरज - डॉ.लाड
प्रतिनिधी

्रलोकसहभागातून आरोग्य सेवा विकसीत झाल्या तर लोकांना त्यांच्या परिसरात आणि स्वस्तात आरोग्य सेवा मिळू शकतील, असे मत शुश्रूषा इस्पितळाचे प्रमुख डॉ. नंदू लाड यांनी व्यक्त केले आहे. डॉ. लाड यांचा नुकताच सत्कार करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. सध्या सर्वसामान्य माणसांना आरोग्य सेवा मिळत नाहीत. त्यामुळे सर्वससामान्यांनी एकत्र येऊन आरोग्य सेवा निर्माण करणे गरजेचे आहे. सहकारातून आरोग्य सेवा कशी निर्माण होते, याचे चांगले उदाहरण म्हणजे शुश्रूषा इस्पितळ, असे ही लाड म्हणाले. सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते लाड यांचा सत्कार करण्यात आला. सर्वसामान्यांना उपयुक्त असणाऱ्या प्रकल्पांना सारस्वत बँक नेहमीच मदत करेल, असे ठाकूर यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना डी.लिट.
केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना नागपूर येथील ‘विश्वसरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या वतीने अलीकडेच डी.लिट. प्रदान करण्यात आली. विश्वसरय्या इन्स्टिटय़ूट ही केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे. संस्थेच्या दीक्षांत सोहळ्यात डॉ. मुणगेकर यांना डी.लिट. प्रदान करण्यात आली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस. एस. सोहोनी व संचालक सदानंद गोखले यावेळी उपस्थित होते. मुणगेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना डी.लिट. प्रदान करण्यात आली.

महिलांसाठी परिसंवादाचे आयोजन
सखी या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतर्फे महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी सांयकाळी ७ वाजता दादर (पू. ) येथील आयईएस हायस्कूलमधील बी. एन. वैद्य सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये महिलांचे आरोग्य, सौंदर्य आणि फिटनेस या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांनाही या संवादात सहभागी होता येईल. आहार, व्यायाम याविषयी असलेला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न या परिसंवादाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. पुढील आठवडाभर आरोग्य आणि सौंदर्यविषयक विविध शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी २४१८३९२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अभिनय प्रशिक्षण शिबीर
गिरगावातील आनंदवयी या संस्थेतर्फे लहान मुलांसाठी ८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रँट रोड येथील लॅमिंग्टन रोडवरील स्वस्तिक लीग सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सतीश जोशी या शिबिरात मार्गदर्शन करणार असून अधिक माहितीसाठी ९८६९२२०६९५ या क्रमांकावर संपर्क साधावा.