Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

सुझलॉन, एनरकॉनमुळे रस्त्यांचे ३ कोटींचे नुकसान!
‘महाऊर्जा’च्या पत्रामुळे जिल्हा परिषदेला जाग
मोहनीराज लहाडे
नगर, ६ मार्च

पवनऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्ते मोठय़ा प्रमाणात खराब होऊ लागले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका जिल्हा परिषदेस बसला आहे. सुझलॉन व एनरकॉन या कंपन्यांमुळे रस्त्यांचे सुमारे ३ कोटीहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. बेकायदा वाळू वाहतुकीमुळे तर जिल्ह्य़ाच्या सर्वच भागांतील रस्त्यांची सातत्याने वाट लागत आहे.

काँग्रेस कमिटीला आली बरकत..
रोज थोरा-मोठय़ांची पायधूळ
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
अगदी सुरुवातीला शहर जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस, मग खासदारांनी बोलवलेली बैठक, नंतर शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट आणि आज कृषिमंत्र्यांची बैठक!
काँग्रेस कमिटीला सध्या बरे दिवस आल्याचे दिसते. एकापाठोपाठ म्हणण्यापेक्षा दररोज एखाद्या मोठय़ा नेत्याच्या भेटीने गेले पाच-सहा दिवस येथे कार्यकर्त्यांचाही राबता वाढला आहे. ‘काँग्रेस कमिटी’ याच नावाने ओळखले जाणारे इंदिरा काँग्रेसचे जिल्हा कार्यालय त्यामुळे सध्या तरी गजबजून गेले आहे.

शिक्षण समितीच्या सदस्यांचा सभात्याग
सेस, सादिलसंदर्भात सभापतींवर आक्षेप
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
शाळादुरुस्तीचा २० लाखांचा सेस व ४ टक्के सादिल निधीच्या नियोजनासंदर्भात शिक्षण समितीच्या सदस्यांना जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप करीत व त्यांचा निषेध करीत सदस्यांनी आज सभात्याग केला. सभापती झावरे सभेस गैरहजर होते. सदस्य नियोजनासंदर्भात विचारणा करतील, या भीतीपोटीच ते गैरहजर राहिले असाही आक्षेप घेण्यात आला.

इटलीतील साईभक्ताची शिर्डीत आत्महत्या
राहाता, ६ मार्च/वार्ताहर

साईदर्शनासाठी आलेल्या एका विदेशी तरुणाने शिर्डीतील हॉटेल साईबाबा इंटरनॅशनलच्या खोलीत अंमली पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. बुटीसिली मार्को असे या तरुणाचे नाव असून तो इटलीच्या कॉसिगॉना (एपी), कॉनट्राडा गॅली, १७ येथील नागरिक असल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावरून निष्पन्न झाले. २४ फेब्रुवारी रोजी तो भारतात आला होता व २३ मार्च रोजी इटलीला परतणार होता, असे विमानाच्या तिकिटावरून स्पष्ट झाले.

..मग शब्द कशाला उणादुणा
मार्च सुरू झालाय. एकीकडे दहावी-बारावीच्या परीक्षांची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा, कार्यक्रम. त्यासाठी निमित्त आहे ८ मार्च - महिला दिन. दर वर्षी या महिला दिनाच्या निमित्ताने विविध सोहळे सुरू असतात. जागोजागी महिला मंडळांमधून भाषणं, व्याख्यानांचं आयोजन होतं. त्यातून महिलांचं प्रबोधन केलं जातं. कुठं महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं घेतली जातात. कुठं मिस अमुक-तमुकच्या धर्तीवर मिसेस तालुका, मिसेस जिल्हा स्पर्धा घेतल्या जातात. कुठं महिलांच्या व्यक्तिमत्त्व सुधारणांसाठीही कार्यक्रम राबवले जातात.

प्रभारी आयुक्तपदाची सूत्रे हांगे यांच्याकडे
अंदाजपत्रकाबाबत अजून निर्णय नाही
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
प्रभारी आयुक्त म्हणून महापालिकेचे उपायुक्त अच्युत हांगे यांनी आज दुपारी सूत्रे स्वीकारली. नगर विकास खात्याचा त्यांच्या नावाचा फॅक्स आदेश प्रशासनाला आज सकाळी मिळाला.
‘नगर विकास’ने या आदेशालाही तब्बल ८ दिवस विलंब केला. हा आदेश आला, तरी अंदाजपत्रकाचे काय करायचे, जकातीच्या ठेक्याच्या निविदा कोणासमोर मांडायच्या याविषयी महिनाभरापूर्वी मनपाने मागवलेल्या मार्गदर्शनावर विभागाने अद्याप एका ओळीचेही पत्र पाठवलेले नाही.

जमिनींच्या नोंदी रद्द करण्याचा प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय वादग्रस्त
तलाठी संघाचा आंदोलनाचा इशारा
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी

कोणतीही तक्रार नसताना श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांनी नेवासे येथील सलाबतपूर सर्कलमधल्या ९ सजांतील ६५० शेतकऱ्यांच्या जमिनींच्या १४६ नोंदी रद्द केल्याबद्दल तलाठी संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. नेवासे तहसील कार्यालयात याबाबत झालेल्या तालुका तलाठी संघटनेच्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. बदलीच्या वाटेवर असताना असा निर्णय घेण्यात आल्याबद्दल शंकाही व्यक्त करण्यात आली. जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४९अन्वये लेखी अर्ज करून शेतकऱ्यांनी जमिनीचे वाटप करून घेतले व त्याच्या नोंदी तलाठी सर्कल यांनी केल्या. त्या ३ वर्षांपासूनच्या आहेत. या सर्व फेरफार नोंदी शेतकऱ्यांच्या कौटुंबिक सोयीच्या दृष्टीने आपापसांतील समजुतीने जंगम वहिवाटीनुसार झाल्या. त्याबाबत कोणाचीही लेखी किंवा तोंडी तक्रार नसताना प्रांताधिकाऱ्यांनी स्वतच काही फुटकळ तांत्रिक दोष काढून १४६ नोंदी रद्द केल्या, असे तलाठी संघाचे म्हणणे आहे. या संदर्भात आंदोलन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तलाठी संघाचे उपाध्यक्ष उमेश गावडे होते. आर. के. पाऊलबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. या निर्णयाचा आठ दिवसांत फेरविचार झाला नाही, तर आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

‘संगमनेर’ दरोडा प्रकरणातील फरारी आरोपीस सांगलीत अटक
संगमनेर, ६ मार्च/वार्ताहर

संगमनेर साखर कारखाना दरोडा प्रकरणातील फरारी असलेल्या सचिन मोहन पाखरे (वय २६) या आरोपीस पोलिसांनी सांगली जिल्ह्य़ात अटक केली. या प्रकरणातील सूत्रधार गोविंद श्यामराव देसाई याच्यासह चौघे अद्यापि फरारी आहेत. दि. ५ ऑक्टोबर रोजी कारखान्याच्या गोदामाला भगदाड पाडून साखर चोरी होत असल्याचा प्रकार सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. त्यापूर्वीही काही वेळा अशीच चोरी झाली होती. त्यामुळे सुमारे दीड कोटीची साडेआठ हजार साखरपोती चोरीस गेल्याची फिर्याद कारखान्याने दिली. या प्रकरणी पोलिसांनी ३९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ३४ आरोपींना अटक केली होती. त्यातील काहींची नंतर जामिनावर सुटका झाली. फरार असलेल्या पाचपैकी पाखरे यास विसापूर (ता. तासगाव) येथे पोलिसांनी पकडले. गुन्हे अन्वेषणचे संजय धीवर, अण्णा परदेशी, अविनाश शिंदे यांनी ही कामगिरी बजावली. पाखरे यास उद्या (शनिवारी) न्यायालयासमोर नेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना केडगावात पकडले
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
मोटारसायकली चोरून त्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सायंकाळी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या.
संतोष माधव आंग्रे (२८, रा. निमगाव वाघा, ता. नगर) व सचिन राजापुरे (२२, रा. ढवळपुरी, ता. पारनेर, हल्ली रा. शिरूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांना केडगाव येथे पकडले. हे दोघेजण चोरीच्या मोटारसायकली विकणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पथकाने सापळा लावला. पोलिसांचा सुगावा लागताच ते पळू लागले. पोलिसांनी सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करून त्यांना पकडले. या दोघांची चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून आणखी चोरीच्या मोटारसायकली मिळण्याची शक्यता आहे.गुन्हे शाखेचे निरीक्षक देवीदास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस राजू वाघ, भरत डंगोरे, अर्जुन दहिफळे, संजय इस्सर, अरुण घोडके, हेमंत खंडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शिक्षणसेवक प्रकल्पग्रस्त भरती आंदोलनाला यश
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
शिक्षणसेवक प्रकल्पग्रस्त भरतीबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाने तीन महिन्यांपासून केलेल्या आंदोलनास यश आले असून, शिक्षणसेवक प्रकल्पग्रस्त नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या यशाबद्दल प्रकल्पग्रस्तांतर्फे महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांचा दिनकर घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी प्रकल्पग्रस्त अन्याय निवारण कृती समितीचे सचिव रमेश गरुड, उपाध्यक्ष भास्कर खेडकर, अमोल खेडकर, बाळासाहेब उभेदळ, संतोष घोलप, वैभव ठाणगे, रामराव फलके आदी उपस्थित होते. दि. २ मार्चला जिल्हा परिषदेने प्रकल्पग्रस्त शिक्षणसेवक नियुक्तीचे आदेश दिल्याची माहिती दहातोंडे यांनी दिली. इतर सरकारी खात्यांचा प्रकल्पग्रस्त अनुशेष तत्काळ न भरल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

साईसूर्य नेत्रसेवातर्फे उद्या महिलांसाठी ‘विवाह दृष्टिभेट’
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि. ८) साईसूर्य नेत्रसेवातर्फे खास महिलांसाठी विवाह दृष्टिभेट योजना राबविण्यात येणार आहे. ‘व्हीजन परफेक्ट लॅसिक लेसर’ या अत्याधुनिक उपचार पद्धतीद्वारे चष्मा कायमचा घालवून त्यांना सुदृष्टी प्राप्त करून दिली जाईल, अशी माहिती डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली.माणिक चौकातील साईसूर्य नेत्रसेवामध्ये हे शिबिर होणार आहे. शनिवारी (दि. ७) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येईल. औषध, काळाचष्मा, निवास व्यवस्था साईसूर्यतर्फे करण्यात येणार आहे. चष्मा किंवा दृष्टिदोष असणे हा मुलींच्या लग्नातील, प्रगतीतील मोठी समस्या असते. ‘नासा’ने विकसित केलेल्या ‘व्हीजन परफेक्ट’ उपचार पद्धतीने ही समस्या कायमची सोडविता येते. गरजू महिला-मुलींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कांकरिया दाम्पत्याने केले आहे. नावनोंदणीसाठी फोन नं. (०२४१) २३४१४१७ व ९८२२७८३३७९वर संपर्क साधावा.

कॅन्टोन्मेंट आरोग्य समितीच्या सभापतिपदी कलीम शेख
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य समितीच्या सभापतिपदी कलीम शेख यांची निवड झाली. अध्यक्ष ब्रिगेडिअर चंद्रमुकेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.
आरोग्यसेवेचा दर्जा उंचावणे, एडस्ग्रस्तांसाठी भिंगारमध्ये एआरटी सेंटर सुरू करणे, तसेच बोर्डाच्या रुग्णालयात विविध यंत्रणा उभारण्याला आपले प्राधान्य राहील, असे शेख यांनी सांगितले.
यापूर्वी झालेल्या बोर्ड सदस्यांच्या बैठकीत अर्थ समितीच्या सभापतिपदी सुनील पतके, तर शिक्षण समितीच्या सभापतिपदी शाहीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली.

कोयत्याचा धाक दाखवून मालमोटारचालकास लुटले
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
मालमोटारीवर दगडफेक करून आत झोपलेल्या मालकास व त्याच्या सहकाऱ्यास कोयत्याचा धाक दाखवून चोरटय़ांनी २० हजार ४०० रुपये चोरून नेले. आज पहाटे हा प्रकार केडगाव येथील सोनेवाडी फाटय़ाजवळ घडला. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी संदीपन गोपीचंद भोपळे (२७, मालमोटारचालक, रा. मादळमोही, ता. गेवराई) यांनी फिर्याद दिली. भोपळे व त्यांचा सहकारी लतीफ शेख हे रात्री रस्त्याकडेला मालमोटार उभी करून आत झोपले. पहाटे पाच वाजता चोरटय़ांनी मालमोटारीवर दगडफेक केली. दगडफेकीने मालमोटारीच्या काचा फुटल्या. या वेळी केबिनमध्ये झोपलेल्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून चोरटय़ांनी त्यांच्याकडील रोख रक्कम पळवून नेली. या घटनेचा तपास उपनिरीक्षक लक्ष्मण राख करीत आहेत.

शिवजयंती मिरवणुकीसाठी पोलिसांतर्फे नियोजन
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
शिवसेनेतर्फे दि. १३ला शिवजयंती उत्सव साजरा होत असून यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांनी नियमन आदेश जारी केले आहेत.
पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३३ (१) (ब) ३४, ३६, ३९, ४०नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून नियमनाचा आदेश जारी केला आहे. हा आदेश मिरवणुकीच्या दिवशी दुपारी दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहील. मिरवणूक माळीवाडय़ातील बसस्थानकाशेजारील शिवाजीमहाराज पुतळ्यापासून निघणार आहे. माळीवाडा वेस, फुलसौंदर चौक, पंचपीर चावडी, आशा चौक, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजार, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्ली दरवाजामार्गे मिरवणूक जाईल. मिरवणूकमार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने, हातगाडय़ा, जनावरांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मिरवणूकमार्गाना मिळणारे सर्व जोडरस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी लाकडी बॅरिकेड लावून बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताचेही नियोजन सुरू आहे.

पत्रकार सुधीर लंके यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण स्मृती जिल्हास्तरावरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार ‘लोकमत’च्या नगर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक सुधीर लंके यांना जाहीर झाला. प्रशस्तिपत्रक व ५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २००७-०८मधील वृत्तांकनाबद्दल दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार ‘पुढारी’चे वार्ताहर प्रभाकर मकासरे यांना मिळाला. अभियानच्या प्रसिद्धी व प्रसाराचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

झाडास गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी

तालुक्यातील घोसपुरी येथील पद्मावतीदेवीच्या मंदिराजवळील झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह काल सायंकाळी आढळून आला. घटनेची खबर पोलीस पाटील पारधे यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अंदाजे ३५ ते ४० वर्षांंच्या पुरुषाचा हा मृतदेह आहे. या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

मिरजगाव आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले!
मिरजगाव, ६ मार्च/वार्ताहर

वैद्यकीय अधिकाऱ्याची कायमस्वरूपी नेमणूक करावी, या मागणीसाठी आज शिवसेनेने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले! वैद्यकीय अधिकारी म्हणून सोनवणे यांची नेमणूक केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मंगळवारी कुल्फीतून सुमारे ५०० मुलांना विषबाधा झाल्यानंतर आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी नव्हता. या केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. केंद्रात लशींची कायम वानवा असते. नगर-सोलापूर रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमींना येथे आणले जाते. परंतु आरोग्यसुविधा नसल्याने त्यांना अन्यत्र हलवावे लागते. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी आंदोलकांनी केली.गावात शीतपेयांची राजरोसपणे विक्री केली जाते. कुल्फीतून विषबाधा झाली. आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आहे. या सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य केंद्रास शिवसेनेने कुलूप ठोकले. या आंदोलनात सर्वश्री. अमृत लिंगडे, गुलाब तनपुरे, अंकुश म्हेत्रे, संजय शेलार, इंद्रकुमार क्षीरसागर, कैलास बोराडे, कल्याण बोराडे आदी सहभागी झाले होते.

राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचा वाटा - अनास्कर
अकोले, ६ मार्च/वार्ताहर

समाजनिर्मितीचे काम करणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्राच्या जडणघडणीत मोठा सहभाग असल्याचे प्रतिपादन पुणे येथील विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केले. येथील मातोश्री पार्वतीबाई कोते शिक्षणशास्त्र व अध्यापक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले होते. पुस्तकी शिक्षणाइतके शाळेबाहेरचे शिक्षणही महत्त्वाचे असते. ज्ञानाचे उपयोजन करायला न शिकविणारे शिक्षण निरुपयोगी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता स्पर्धेला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक व्यक्तीला कायदा व अर्थशास्त्र यांचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे यांनी केले. शीतल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सनी गायकर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी या वेळी अनास्कर यांना बँकिंगविषयी अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची त्यांनी दिलखुलास व सहजसोप्या भाषेत उत्तरे दिली.

‘नॅशनल हेवी’च्या संचालकपदी पुन्हा शिवाजीराव नागवडे
श्रीगोंदे, ६ मार्च/वार्ताहर

श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांची दिल्ली येथील नॅशनल हेवी को-ऑपरेटिव्ह इंजिनिअरिंग या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध फेरनिवड झाली.
संस्थेच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ५ वर्षांसाठी नागवडे यांची फेरनिवड करण्यात आली. त्यांनी यापूर्वी दोन वेळा संचालक म्हणून काम पाहिले आहे. ही साखर कारखान्यांची यंत्रसामग्री निर्माण करणारी देशातील सर्वोच्च सहकारी संस्था असून, या संस्थेवर संचालक होणे हा साखर उद्योगात मोठा बहुमान समजला जातो. शिवाजीराव गिरधर पाटील, माजी सहकारमंत्री शंकरराव कोल्हे आदींनी या संस्थेवर राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. नागवडे ४०-४५ वर्षे राज्यातील सहकार क्षेत्रात काम करीत असून, त्यांना सहकारातील अभ्यासू म्हणून ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी जिल्हा बँक, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष व राज्य सहकारी साखर कारखाना संघात संचालकपदासह अनेक वर्षे राज्य खरेदी समितीवर प्रभावीपणे काम केले आहे.

‘तनपुरे’च्या कामगारांचा आंदोलनाचा इशारा
राहुरी, ६ मार्च/वार्ताहर

डॉ. तनपुरे साखर कारखान्याने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कामगारांनी द्वारबंद व बेमुदत संप करण्याचा इशारा दिला. आज साखर कामगार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब गावडे यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन पाठविले. त्यात म्हटले आहे की, कामगारांची पगाराची थकबाकी व नियमित पगार देण्याबाबत १४ फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते. परंतु कार्यवाही केली नाही. संपाचा इशारा त्यावेळीच देण्यात आला होता. त्या अनुषंगाने साखर कामगार १० मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कामगार व व्यवस्थापन यांच्यातील दरी वाढत चालली असून, व्यवस्थापनाने सर्व आयुधे वापरण्यास प्रारंभ केला.

सुरेगाव-बेलपांढरी रस्ता मोजण्याचा आदेश
नेवासे, ६ मार्च/वार्ताहर

सुरेगाव (गंगापूर) आणि बेलपांढरी यांना जोडणाऱ्या शिवरस्त्याची मोजणी करण्यात येणार असून, या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांच्या सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविणार असल्याचे समजते.
सुरेगाव-बेलपांढरी या ४ किमीच्या जोडरस्त्याची सरकार दरबारी नोंद आहे. मात्र, हा रस्ता ३३ फुटांचा न राहता केवळ ५ ते ६ फुटांपर्यंत अरुंद झाला आहे. या अतिक्रमण क्षेत्राचा दोन्ही गावांच्या जमीनमालकांना व येणाऱ्या-जाणाऱ्यांना नेहमीच त्रास होत असे. याबाबत नाथा शिंदे यांनी अखेर लोकशाही दिनात दाद मागितली होती. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तहसीलदारांच्या अहवालावरून या रस्त्याचे अतिक्रमण निघावे, यासाठी रस्त्याची मोजणी करण्याविषयी आदेश दिले आहेत. या रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्यास या अतिक्रमणधारकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

संगणक अभियंता सदाफळ उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला
राहाता, ६ मार्च/वार्ताहर

शहरातील संगणक अभियंता विशाल सदाफळ हे संगणक क्षेत्रातील नवीन सॉफ्टवेअर प्रकल्पाच्या शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. सदाफळ हे पुण्याच्या एका संगणक कंपनीत कार्यरत असून कंपनीने त्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील शिकागो येथे पाठविले. ते संगणक अभियंता आहेत. संगणक क्षेत्रातील नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी त्यांची निवड झाली. सदाफळ यांचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, अण्णासाहेब म्हस्के, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी अभिनंदन केले.