Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

रेल्वे स्थानकावर पेट्रोलच्या टँकरला आग
मोठी दुर्घटना टळली

नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

रेल्वे स्थानकावर उभ्या एका पेट्रोलच्या टँकरला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी लगेचच आग विझवल्यानंतर सर्वानीच सुटकेचा श्वास सोडला. टँकरचा स्फोट झाला असता तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती.

पुढील सत्रापासून नागपुरातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा श्रीगणेशा
डी.वाय. पाटील समूहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात

नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील अग्रगणी डी.वाय. पाटील समूहाने नागपूर शहरातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याची घोषणा केली आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून शाळेच्या औपचारिक कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे समूहाचे उपाध्यक्ष भाविक अनजारिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारनियमन : कालच्या पेक्षा आजचा दिवस बरा!
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

अस्ताव्यस्त कारभारासाठी लोकांच्या शिव्या-शाप झेलणारी कंपनी म्हणून वीज महावितरण सर्वाधिक बदनाम असले तरी भारनियमनाच्या संदर्भात कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थोडा दिलासा दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. कंपनीची गावठाण फिडर योजना आणि सिंगल फेजिंगचा लाभ पोहोचलेल्या गावांचीही संख्या वाढली असून कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा, अशी समाधानकारक स्थिती सध्या आहे.राज्याच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च २००८ या तीन महिन्यांपेक्षा याच काळात २००९ मध्ये भारनियमन कमी झालेले दिसते. जानेवारी २००८ मध्ये विजेची सर्वाधिक मागणी १५ हजार ५१८ मेगाव्ॉट नोंदवली गेली.

हेल्पेज इंडिया संस्थेला मॉडर्न स्कूलकडून १.१५ लाखाचा निधी
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

समाजातील निराधार वृद्ध लोकांसाठी काम करणाऱ्या हेल्पेज इंडिया या संस्थेला मदत करण्याच्या उद्देशाने सिव्हील लाईन येथील मॉडर्न स्कूलच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक लाख पंधरा हजार रुपयांचा निधी संस्थेला भेट दिला. हेल्पेज इंडियाचे व्यवस्थापक सुनील ठाकूर यांना धनादेश देण्यात आला.

लता मंगेशकर रुग्णालयात कुष्ठरुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया
नागपूर, ६ मार्च/ प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग व लता मंगेशकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्याच्या आरोग्य सेवेचे (कुष्ठरोग) सहसंचालक डॉ. अशोक लढ्ढा आणि येथील आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. विजय गेडाम यांच्या नेतृत्वाखाली डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात कुष्ठरुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कुष्ठरुग्णांमधील हात व पायाच्या व्यंगावर विशेषत्वाने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

भाजयुमोच्या युवाक्रांती अभियानाला भिवापुरातून प्रारंभ
आघाडी सरकारविरुद्ध जनजागरण

नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चा युवाक्रांती अभियान राबवण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष योगेश वाडिभस्मे आणि सुधीर परबे यांच्या हस्ते भिवापूर येथे अभियानास प्रारंभ झाला. यावेळी संजय टेकाडे, संजय मुलमुले, डॉ. शैलेश डबुरकर, अविनाश खळतकर, अण्णाजी बरगट, विजय चौधरी, संभाजीराव घरत प्रमुख पाहुणे होते.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ५६ कोटींची मदत
नागपूर जिल्ह्य़ासाठी २० कोटी
हेक्टरी १० हजार रुपये

नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

विदर्भात अपुरा पाऊस आणि मृग बहार न आल्याने संत्री उत्पादक शेतकऱ्यांवर आलेले संकट आर्थिक मदतीच्या रूपात काही प्रमाणात कमी करण्याचे प्रयत्न शासनाने केले आहे. एकूण ५६ कोटी रुपयांची मदत जाहीर झाली असून यात नागपूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना सुमारे २० कोटी ४४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे, अशी माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

रंगपंचमीसाठी रंगल्या बाजारपेठा!
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतानाच रंगपंचमी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. ‘बुरा ना मानो होली हैं..’ म्हणत सेलिब्रेटीपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच सप्तरंगात न्हायला आणि इतरांनाही न्हाऊ घालायला सज्ज झाले आहेत. रंग आणि स्टायलिश पिचकाऱ्यांचा बाजारही रस्त्यारस्त्यांवर ऐन रंगात आला आहे. सुगंधी रंगांची हजेरी यंदाच्या होळीचे खास वैशिष्टय़ आहे. इतवारी , महाल, सक्करदरा, गोकुळपेठ, सीताबर्डीतील बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी दिसू लागली आहे.

जवानांप्रती सामाजिक बांधिलकी जोपासावी -दराडे
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

ध्वजदिन निधी संकलनात जास्तीत जास्त संस्थांनी पुढाकार घेऊन शूर जवानांप्रती सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी केले. माजी सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात ध्वजदिन निधी संकलन कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षपदावरून जिल्हाधिकारी बोलत होते. अपर जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक छगन वाकडे, कर्नल जॉली आदी उपस्थित होते.

कलासृजन विश्वविद्यालय व्हावे - पुरोहित
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

कलेच्या क्षेत्रात काम करणारी कलासृजन ही केवळ संस्था न राहता ते विश्वविद्यालय होऊन त्याचे नाव जगभर व्हावे असे प्रतिपादन माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी केले. भारतीय विद्या भवन संचालित कलासृजन या संस्थेच्या वार्षिकोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार देवेंद्र फडणवीस, भारतीय विद्या भवन्सच्या कार्यवाहिका डॉ. सुनंदा सोनारीकर, कोषाध्यक्ष के.एम अग्रवाल, पं. जिवाजी, अन्नपूर्णा शास्त्री, पद्मश्री पं. प्रभाकर देशकर, डॉ. कुमार शास्त्री, ललिता हरदास, मालिनी मेनन, श्रीमती माडखोलकर, डॉ. टी.जी. एल. अय्यर उपस्थित होते.

लोकनाथ यशवंत यांच्या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

कवी लोकनाथ यशवंत यांच्या ‘पुन्हा चाल करू या..!’ कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण साहित्य आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १२ मार्चरोजी यशवंतराव चव्हणा यांच्या स्मृतीदिनी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार समितीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

स्मॉल फॅक्ट्री एरियात रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन
नागपूर, ६ मार्च/प्रतिनिधी

औद्योगिक क्षेत्र असूनही स्मॉल फॅक्ट्री एरियात गेल्या अनेक वर्षांंपासून रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या वार्डाचे नगरसेवक नरेंद्र बोरकर यांच्या प्रयत्नांमुळे नुकतेच १ कोटी ७२ लक्ष रुपयांचे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर झाले. या कामाचे भूमिपूजन भाजपा प्रदेश अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी माजी खासदार बनवारीलाल पुरोहीत, भाजपा शहर अध्यक्ष सुधाकर देशमुख, महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष कृष्णा खोपडे तसेच, वार्डातील नागरिक उपस्थित होते.

बधिरीकरण तज्ज्ञ संघटनेचे चर्चासत्र
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेशियालॉजिस्टस् या बधिरीकरण तज्ज्ञ संघटनेच्या नागपूर शाखेतर्फे रविवार, १ मार्चला ‘आपदा व्यवस्थापन’ या विषयावर जे. आर. शॉ सभागृहात विविधांगी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित होते. एअर व्हाईस मार्शल डॉ. मधुसूदनम, ब्रिगेडियर डॉ. के.के. उपाध्याय, नॅशनल सिव्हील डिफेन्स कॉलेज नागपूरचे निदेशक जी.एस. सैनी, उपनिदेशक डॉ. एम.जी. आठवले, बधिरीकरण विशेषज्ञ डॉ. अनिल चांदे हे तज्ज्ञ चर्चेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विदुला कापर व डॉ. दीपाली मंडलिक यांनी केले. संघटनेच्या अध्यक्ष डॉ. अंजली भुरे यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. हेमांगी अभ्यंकर यांनी आभार मानले.

सीएसी ऑलराऊंडर आणि मैत्रबन अ‍ॅडव्हेंचर कॅम्पिंगच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील रवींद्रनाथ टागोर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आलेले ‘फोटो अ‍ॅडव्हेंचर’ छायाचित्र प्रदर्शन पाहताना मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नंद किशोर आणि विंग कमांडर एम.आर.व्ही. मूर्ती, शेजारी आयोजक अमोल खंते. शुक्रवारी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. साहस शिबिरांदरम्यान टिपलेली छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात आली असून रविवापर्यंत प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले आहे.

रामटेक मतदारसंघासाठी मातंग समाजाचे उद्धव ठाकरेंना साकडे
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून मातंग समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी मातंग समाज महासंघाच्या एका शिष्टमंडळाने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि पूर्व विदर्भाचे संपर्क नेते विनायक राऊत उपस्थित होते.

बडकस चौकात सट्टय़ाचे आकडे घेणारा अटकेत
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी बडकस चौकात सापळा रचून सट्टय़ाचे आकडे घेणाऱ्यास पकडले. मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोग घोंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. राजकुमार किशोरसिंग राजपुत (रा. जामदार शाळेजवळ) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एका पान टपरीसमोर उभा राहून तो मोबाईलवरून सट्टय़ाचे आकडे घेत होता. दोन मोबाईल, आकडे लिहलेले सहा कागद व रोख १ हजार ५५ रु. असा एकूण ५ हजार ५५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.