Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा

 

प्राचीनकाळी राजगृहात एक गुंड राहत होता. तो आई-वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगरमस्त राही. परंतु; पूजा आणि बलिदान यासारखे शारीरिक कष्टाचे विधी कितीही केले तरी, सतत तीन वर्षे दीघरेद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरविले. तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व पाहून त्याने त्यांच्या पायांवर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे, हे सांगितले. नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि ते ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही, अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या, की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषत: मुलाचे आई-बाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलाच्या त्या माता-पित्यांना पाहून आणि आपल्या मुलाविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या. ‘‘थोर पुरुष हा संपूर्णपणे निरिच्छ असतो. तो स्वत: स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दु:खाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो.’’ ‘‘शहाणा मनुष्य (भद्र) ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही; संपत्ती, संतती, जमीनजुमला यांची त्याला इच्छा नसते. नेहमी शीलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्याच सिद्धान्ताच्या (संपत्तीच्या किंवा मानाच्या) नादी लागत नाही.’’ ‘‘अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य. अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे (पावित्र्याकडे) त्याला वळविण्याचा प्रयत्न करीत असतो.’’
डॉ. बाबासाहेब आबंडेकर (बुद्ध आणि त्याचा धम्म)

कु तू ह ल
चंद्रावरील पाणी
चंद्रावर पाणी असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. ती कशाच्या आधारे?

पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली, उत्क्रांत झाली आणि टिकून राहिली याचं एक प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीवर विपुल प्रमाणात असलेलं पाणी! साहजिकच, आपल्या सौरमालेत पृथ्वीशिवाय अन्यत्र कुठे पाणी आहे काय, हा वैज्ञानिकांच्या संशोधनाचा प्राधान्याचा विषय आहे. अपोलो मोहिमांमध्ये चंद्रावरून जी माती आणण्यात आली त्यात पाण्याचा अंश अजिबात सापडला नाही; परंतु त्यामुळे चंद्रावर पाणी नाहीच, असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. फारतर असं म्हणता येईल की, ही यानं ज्या भागात उतरली त्या भागात पाणी नाही. पुढच्या काळात म्हणजे डिसेंबर १९९६ मध्ये क्लेमेंटाइन नावाच्या यानानं चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांची २० लाख छायाचित्रं पृथ्वीकडे पाठवली. त्यांच्या आधारे चंद्रावर असलेल्या खोल विवरांमध्ये कोटय़वधी टन बर्फ असला पाहिजे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतरच्या काळात ‘ल्युनर प्रॉस्पेक्टर’ नावाच्या यानानं केलेल्या या विवरांच्या तपशीलवार अभ्यासातून बर्फाच्या अस्तित्वाला पुष्टी मिळाली. हे दोन्ही अभ्यास वेगवेगळय़ा तंत्राच्या मदतीनं करण्यात आले; परंतु त्याचे निष्कर्ष सारखेच आल्यानं चंद्राच्या खोल विवरांमध्ये बर्फाचे प्रचंड साठे आहेत ही गोष्ट आता मान्य करण्यात आली आहे. चंद्रभूमीवर कोटय़वधी वर्षांपासून धूमकेतू आदळत आहेत. धूमकेतूच्या गाभ्यात बर्फ मोठय़ा प्रमाणावर साठवलेलं असतं. चंद्राच्या ध्रुवप्रदेशात आदळलेल्या धूमकेतूमधलं बर्फ तेथे असलेल्या विवरांत साठून राहिलं असावं. ही विवरं इतकी खोल आहेत की, तेथे सूर्यकिरण कधीच पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे हे बर्फ वितळण्याचा प्रश्नच येत नाही. चंद्रावरचं पृष्ठभागावरचं सर्वात कमी तापमान उणे १९० अंश सेंटिग्रेड असतं. विवरांच्या तळाशी हे तापमान अजून कमी असणार ही गोष्ट अगदी उघड आहे.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
नीळकंठ कीर्तने

मराठय़ांच्या इतिहासाच्या साधनांचे इंग्रजीतील आद्य संशोधक, तसेच मराठय़ांच्या इतिहासाचे आद्य चिकित्सक टीकाकार नीळकंठ जनार्दन कीर्तने यांचा जन्म १८४४ च्या सुमारास झाला. काही काळ इंदूर संस्थानच्या विद्याखात्यात, तसेच सौराष्ट्रात विद्यागुरू व कारभारी या पदावर नोकऱ्या केल्या. मराठय़ांचा इतिहास आणि त्यातही शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे चोरी-दरोडेखोरी, मराठय़ांचे शौर्य म्हणजे आगीचा वणवा अशी डफली इंग्रज इतिहासकार ग्रँड डफने वाजवल्यावर त्याला सडेतोड उत्तर कीर्तन्यांनी दिले. डफच्या इतिहासलेखनाचा गौरव करून त्यातील उणिवा त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. परिणामी यामुळेच न्या. रानडय़ांनी ‘राइज ऑफ मराठा पॉवर’ हा ग्रंथ लिहिला. शिवाजीमहाराजांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र त्यांनी संपादित केले, तसेच त्याला अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लिहिली. १५ व्या शतकातील जैन कवी नयनचंद्रसुरी यांचा ‘हमीर महाकाव्य’ हा दुर्मिळ ग्रंथ इंग्रजीत प्रसिद्ध केला ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी. ‘इंडियन अ‍ॅटिक्वेरी’ या इंग्रजी नियतकालिकामधून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. याशिवाय मोरोबा कान्होबा यांनी लिहिलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या पुस्तकावर त्यांनी निर्भीडपणे केलेले परीक्षण वाखाणण्याजोगे होते. शेक्सपियरच्या ‘टेंपेस्ट’ या नाटकाचे त्यांनी मराठी भाषांतरही केले. सांप्रत प्रचारातील हिंदू धर्म व अर्वाचीन इष्ट सुधारणुकींच्या संबंधी त्यांची योग्यता ही पुस्तकेही त्यांनी लिहिली. त्यांच्या निबंधांनी मराठी इतिहास संशोधन लेखनास नवी दिशा मिळाली. त्यामुळे इतिहासाच्या यथार्थ मूल्यमापनाला व पुनर्विचाराला चालना मिळाली. ७ मार्च १८९६ रोजी वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
ढगाने केला पाठलाग

राजू आणि रवि गावातल्या पारावर गप्पा मारत बसले होते. राजू म्हणाला, ‘मित्रा, या गावात राहून आयुष्यभर काबाडकष्ट करूनही फक्त पोटापुरते मिळेल. त्यापेक्षा जवळपास असलेले थोडेफार पैसे घेऊन आपण मोठय़ा शहरात जाऊ. पैसे कमवून गावी येऊन सुखात राहू.’ रवि राजूसारखा मेहनती नव्हता. स्वभावाने तो स्वार्थी आणि दुष्ट होता. डोकं खाजवत तो म्हणाला, ‘गडय़ा राजू, तू म्हणतोस ती कल्पना वाईट नाही.’ बोलताना त्याचे धूर्त डोळे लकलकले. मित्राला विचार पसंत पडलेला पाहून राजू म्हणाला, ‘मग आपण उद्याच निघू या की.’ दुसऱ्या दिवशी घरचा निरोप घेऊन दोघे मित्र निघाले. आळशी रविला दगदग, कष्ट याची सवय नव्हती. वाटेत तो म्हणू लागला, ‘राजू, मी कंटाळलो बुवा! आपण आपले गावाकडे परत जाऊया.’ ‘असे हातपाय नको गाळू. एखाद्या गावी प्रवास थांबवून मुक्काम करू. ताजेतवाने होऊ मग पुढे जाऊ’, राजू म्हणाला. दोघे एका गावात उतरले. रविच्या मनात आले, आता माझ्याकडे पैसे आहेत, तसे राजूकडेही आहेत. दूर जा, काम करा, एवढे सारे करण्यापेक्षा राजूचे पैसे लुबाडावेत. राजू कुठला व्यापार करावा, पैसे कसे साठवावेत या विचारात गर्क होता. रविने राजूला अचानक खाली पाडले. राजू धाडकन पडला तशी वेगाने रविने मूठ त्याच्या डोक्यावर आपटली. राजूचे पैसे काढून घेतले. ‘रवि, केलेल्या चुकीचा तुला पश्चात्ताप होईल. तुझे हे कृत्य नक्कीच कुणीतरी पाहात असेल’, अर्धवट शुद्धीत राजू म्हणाला. पैसे मोजत रवि बुळबुळीत हसला. ‘इथं कोण आहे बघायला’, तो गुरगुरला. आभाळाकडे पाहात राजू खोल स्वरात म्हणाला, ‘तो ढग पाहतोय. तो सांगेल साऱ्या गावाला.’ काही न बोलता रवि तिथून वेगाने निघाला ते थेट गावात आला. नशीब कमवायला निघालेला आपला नवरा काही न करता आळशीपणे लगेच परतला म्हणून बायकोला वाईट वाटले. तिने विचारले, ‘राजूभाऊजी कुठे आहेत?’ उत्तर देणार एवढय़ात त्याचे लक्ष आभाळाकडे गेले. एक ढग घोटाळताना दिसला. त्याचे शब्द घशातच अडकले. त्या दिवसापासून रवि घराबाहेर पडला की, त्याला डोक्यावर ढग घुटमळताना दिसायचा. रात्री खिडकीतून बाहेर तो ढग वाट पाहताना दिसायचा. तो बाहेर जाईना. हवेत हातवारे करून तो म्हणे, ‘ढगा, जा! जाऽऽ बोलशील तर याद राख!’ तरीही ढग पाठलाग करत राहिला. दु:खाने, संतापाने तो ओरडला, ‘मला माहीत आहे राजूचे पैसे मी घेतले म्हणून तू माझ्या मागे आहेस.’ तो ढगाला दगड फेकून मारू लागला. राजूला मी घेऊन येतो, म्हणत तो निघाला. त्या गावात राजूने आपला व्यवसाय सुरू केला होता. रविने रडत त्याला घट्ट मिठी मारली. ‘मित्रा, अरे आपण इथेच राहून पैसे कमवू शकू. बरं झालं तू आलास.’ राजूचे ते शब्द उबदार पाण्यासारखे रविच्या मनावरून झुळुझुळू वाहत गेले. पश्चात्तापाने त्याचे अंत:करण भरून गेले. मित्र चुकला तर त्याला माफ करणे आणि आपण चुकलो तर पश्चात्ताप होऊन मित्राची माफी मागणे यामुळे मैत्री टिकून राहाते. आजचा संकल्प - मी मैत्री तुटू देणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com