Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

पाकिस्तानात श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया अ‍ॅण्टी टेररिस्ट फ्रंटच्या वतीने वाशी येथे शुक्रवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.

उरण मार्गावर आता एनएमएमटीच्या भंगार गाडय़ा
उरण/वार्ताहर

नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेस उरण मार्गावर बुधवारपासून सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत, मात्र बसेसच्या तोडफोडीच्या प्रकारानंतर सुस्थितीतील आरामदायी स्टार बसेस बंद करण्यात आल्या असून, आता या मार्गावर भंगार गाडय़ांनी प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रवासी वर्गांत नाराजी आहे.

चांगल्या मार्गाने आलेला पैसा खर्च करणे महाकठीण - हावरे
बेलापूर/वार्ताहर : चांगल्या मार्गाने पैसे कमविणे कठीण असले, तरी त्या मार्गाने जमविलेला पैसा खर्च करणे त्याहून महाकठीण असल्याचे मत हावरे उद्योगसमूहाचे संचालक व भाजपचे नेते सुरेश हावरे यांनी वाशी येथे व्यक्त केले. सोलापूर रहिवासी संघाच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात हावरे बोलत होते.

वाशी येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
नवी मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने यावर्षी देखील वाशी येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचा जंगी कार्यक्रम रंगणार आहे. वेगवेगळ्या धर्मियांच्या वधु-वरांचा एकाच मांडवात होणारा हा विवाह सोहळा शहरवासियांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. १७ मे रोजी वाशी रेल्वे स्थानकाच्या मैदानात हा सोहळा संपन्न होत असून या लग्न कार्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी माहिती आमदार म्हात्रे यांनी पत्रकारांना दिली.

महापालिकेचे शेकडो कामगार भारतीय कामगार सेनेत
बेलापूर/वार्ताहर : भारतीय कामगार सेनेने स्थापनेनंतर तब्बल १६ वर्षांनी प्रथमच नवी मुंबई महापालिकेत शुक्रवारी खाते उघडले. भारतीय कामगार सेनेचे सचिव अल्बर्ट पिंटो, कार्याध्यक्ष व नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे यांच्या उपस्थितीत ६०० कर्मचाऱ्यांनी भाकासेत प्रवेश केला. १९९२ साली नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर १९९५ साली पहिली निवडणूक होऊन गणेश नाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून एकहाती सत्ता मिळविली.

मनपा कर्णबधिर शाळेतील विद्यार्थी सादर करणार किलबिल
बेलापूर/वार्ताहर : नवी मुंबई महापालिकेच्या कर्णबधिर शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या अंगीभूत गुणांची माहिती सर्वसामान्यांनाही व्हावी, या उद्देशाने ‘किलबिल’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता वाशीतील भावे नाटय़गृहात होणाऱ्या या कार्यक्रमास संगीतकार शंकर महादेवन, अभिनेते अन्नू कपूर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शाळेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेच्या विविध उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे, हे विशेष. विद्यार्थी सादर करणार असलेल्या या ‘किलबिल’ला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

सहा विकासकांवर गुन्हे दाखल
बेलापूर : सीवूड व उलवा परिसरात खारफुटीवर भराव टाकून ती नष्ट केल्याप्रकरणी एन. आर. आय. पोलीस ठाण्यात सहा विकासकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सी-वूड रेल्वे स्थानक सेक्टर ५० कडे जाणाऱ्या रस्त्यालगत बालाजी हाईटस्चे मालक विनस, अशोक, आदिनाथ तसेच साई उद्यानचे राज कुऱ्हाडे यांनी माती व डेब्रिजचा भराव टाकला होता. या प्रकरणी ठाण्याचे तहसीलदार कृष्णा जाधव यांनी वरील पाच जागांविरुद्ध तक्रार केली. त्याचप्रमाणे कोंबडभुजे गाव उलवा रेतीबंदरजवळ प्रोग्रेसिव्ह डेव्हलपर्स यांनी खारफुटीत भराव टाकला होता. याबाबत पनवेलचे तहसीलदार दत्तात्रय केदार यांनीदेखील एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र खारफुटी नष्ट करणाऱ्या विकासकांच्या डंपर वा तत्सम कोणत्याही साहित्याची पोलिसांनी जप्ती केली नाही, तसेच या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

मनसेचा आंदोलनाचा इशारा
बेलापूर : कोपरखैरणे येथे नव्याने सुरू होणाऱ्या धिरुभाई अंबानी डीएव्ही या शाळेतील लहान शिशुवर्गाच्या सर्व प्रवेश प्रक्रिया अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेसमोर निदर्शने करूनही काही पदरात न पडल्याने त्यांनी मनसेकडे धाव घेतली. आता मनसेच्या विद्यार्थी सेनेने या पालकांना सात दिवसांत न्याय न दिल्यास शाळा प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या शाळेने जानेवारी २००९ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये २७५ पालकांनी पाल्यांचे प्रवेश अर्ज प्रवेश शुल्कासह भरले होते, मात्र ९ फेब्रुवारी रोजी अचानक शाळा प्रशासनाने सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द केली. विशेष म्हणजे अनेक पालकांनी इतर शाळेतील पाल्यांची प्रवेश प्रक्रिया रद्द करून अंबानींच्या शाळेत प्रवेश घेतला होता. आता हीदेखील प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने पालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी शुक्रवारी ‘मनविसे’ने शाळेवर धडक दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न घालविता व्यवस्थापनाने लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नवी मुंबई शहर अध्यक्ष कौस्तुभ मोरे यांनी केली आहे.

सीबीडीत आरोग्य महामेळाव्याचे आयोजन
बेलापूर : येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने सीबीडी सेक्टर-२ मध्ये आरोग्य महामेळावा-२००९ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ८ मार्च रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत हा मेळावा होणार आहे. यामध्ये मोफत चष्मा वाटप, रक्तगट तपासणी, मधुमेह, दंतचिकित्सा, हाडाचे विकार, अ‍ॅक्युप्रेशर, आयुर्वेदिक आदी औषधोपचार केले जाणार आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत या मेळाव्याच्या उद्घाटक असून, यावेळी नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, खासदार आनंद परांजपे हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत