Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीच्या भूमिकेवर ठरणार काँग्रेसच्या इच्छुकांचे भवितव्य
प्रतिनिधी / नाशिक

 

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघापैकी किमान एक जागा आपल्या पदरात पडावी म्हणून जिल्हा काँग्रेसने आटापिटा चालविला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस त्यास कितपत दाद देईल, यावर पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह तीन जणांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात तर अन्य चौघांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदेश काँग्रेसकडे अर्ज सादर करून व्यक्त केली आहे. जिल्ह्य़ात काँग्रेसला एकही जागा सुटली नाही तर पक्षाचे चिन्ह विस्मरणात जाण्याची भीती व्यक्त करीत इच्छुकांनी या प्रश्नावरून मित्रपक्षाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याने हा मतदारसंघ जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाटय़ाला जाईल याची मानसिक तयारी जिल्हा काँग्रेसने केली होती. त्यामुळे, पुनर्रचनेत नव्याने निर्माण झालेला दिंडोरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण, राष्ट्रवादीने नुकत्याच येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात दिंडोरी मतदारसंघावरही आपला दावा सांगितल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पाच आमदार असून ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असे गृहीतक मांडून पक्षाने उमेदवाराच्या शोध मोहिमेला गती दिली. या पाश्र्वभूमीवर, जिल्हा काँग्रेसने केवळ दिंडोरीच नव्हे, तर नाशिक लोकसभा मतदारसंघातही आपला उमेदवार उतरू शकतो अशी खेळी खेळण्याची तयारी केली आहे.
प्रदेश काँग्रेसने इच्छुकांकडून मागविलेल्या अर्जात नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर दशरथ पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आणि गोपाळराव गुळवे यांनी रिंगणात उतरण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी तीन जणांनी पक्षनिधी भरून अर्ज सादर केले असले तरी त्याची गंधवार्ता काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना नाही. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून एकाही उमेदवाराने या मतदारसंघासाठी अर्ज नेला नसल्याचे सांगण्यात आले. जागा वाटपात ही जागा नेमक्या कोणत्या पक्षाला मिळणार या बाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असली तरी ते अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे डॉ. बच्छाव यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसकडे अर्ज सादर करणाऱ्यांची यादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली. नाशिकला तीन तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात रमेश कहांडोळे, पंडित गायकवाड, सिताराम दाभाडे आणि प्रा. डी. के. गांगुर्डे अशा चार जणांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. जिल्ह्य़ात दोनपैकी एक जागा तरी काँग्रेसला मिळायला हवी अशी कार्यकर्त्यांची मागणी असून त्याबाबत वरिष्ठांना अवगत करण्यात आले आहे. या उपरही जिल्ह्य़ात जागा मिळाली नाही तर राष्ट्रवादीला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पानगव्हाणे यांनी दिला. प्रत्येकवेळी काँग्रेसचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन प्रचार करणार नाही. आमदारांचा निकष लावून मतदारसंघ निश्चित करावयाचा असेल तर नाशिक शहरात काँग्रेसचा आमदार असून हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची मागणी त्यांनी केली. जागा वाटपावरून उभय पक्षांमध्ये कलगीतूरा रंगला असला तरी राष्ट्रवादीने नमती भूमिका घेतल्याशिवाय या विषयावर तोडगा निघू शकणार नाही. आपले प्राबल्य असणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी इतक्या सहजासहजी काँग्रेसला देईल याची शक्यता दिसत नाही. नाशिकला तर पक्षाचा विद्यमान खासदार असल्याने या मतदारसंघाचा प्रश्नच येत नसल्याचे राष्ट्रवादीने आधीच स्पष्ट केले आहे. परिणामी, काँग्रेसच्या इच्छुकांचे भवितव्य आता पूर्णपणे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे दिसत आहे.