Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महिलांवरील अन्यायास महिलाच बहुतांशी कारणीभूत
चारूशीला कुलकर्णी /नाशिक

 

जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे हक्क व अधिकार याविषयी पुन्हा एकदा बोलबाला सुरू झाला असला तरी बहुतांशी प्रमाणात महिलाच महिलांच्या हक्काआड येत असल्याचे वास्तवही नाशिकमध्ये तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महिला सुरक्षा विशेष शाखेतील नोंदींवरून उघड होते. महिलांचे प्रश्न, त्यांच्यावरील अत्याचार, याची नोंद घेत त्यांना न्याय मिळावा यासाठी २००५ मध्ये जागतिक महिला दिनी आ. डॉ. शोभा बच्छाव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या शाखेचा निम्म्यापेक्षा अधिक वेळ कौटुंबिक अन्यायाविरोधात महिलांचेच प्रबोधन करण्यात जात आहे.
अन्यायविरोधात दाद मागण्यासाठी पोलीस ठाणे, न्यायालयाचे दरवाजे नेहमीच खुले असतात. परंतु एकटीने पोलीस ठाणे गाठणाऱ्यांची संख्या तशी कमीच. त्यापेक्षा निमूटपणे अन्याय, अत्याचार सहन करीत राहणाऱ्या महिलांचीच संख्या अधिक. महिलांच्या दबून राहणाऱ्या या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये केवळ महिलांसाठी असणारे पोलीस ठाणे स्थापावे, किंवा महिलांशी संबधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पथक नेमावे, असा विचार डॉ. शोभा बच्छाव यांनी मांडला. या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता स्वतंत्र ठाण्याऐवजी ‘महिला सुरक्षा विशेष शाखा’ सुरू करण्याची कल्पना पुढे आली, आणि २००५ मध्ये महिला दिनीच शाखेचे उद्घाटन झाले.
या शाखेतंर्गत वर्षांला सरासरी दोनशेपेक्षा अधिक प्रकरणांची हाताळणी होत आहे. सासूकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ, माहेरकडून पैसे आणावेत यासाठी सारखा तगादा, अशा स्वरूपाच्या तक्रारींचे प्रमाण या प्रकरणांमध्ये अधिक आहे. विशेष म्हणजे असुशिक्षित किंवा ग्रामीण भागापेक्षा पांढरपेशा वर्गातून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सुशिक्षितांकडून महिलांच्या हक्कांचा सन्मान केला जाईल, ही अपेक्षाही फोल ठरल्याचे यावरून दिसत आहे. शाखेकडे आलेल्या तक्रार अजार्ंवर तडजोडीचा प्रयत्न म्हणून मुख्य अधिकारी ज्योती करंदीकर, अरूणा जाधव, चित्रकला थेटे, सुरेखा गिते या दोन्ही बाजूंना समुपदेशनाचे काम करतात. या समुपदेशनात ९० टक्क्यांहून अधिक तक्रारी पहिल्या दोन-तीन फेऱ्यांमध्ये निकाली निघतात. मुळात मुद्दा असतो तो एकमेकांना समजून घेण्याचा. लग्नानंतर वधू नवख्या घरात बावरते. तिला नव्या घरातील वातावरण समजून घेण्यास वेळ लागतो. अशा स्थितीत तिच्या पाठिवरून आपुलकीचा हात फिरवण्यापेक्षा जर सासूबाईंसह इतर मंडळी हुकुमशहा प्रमाणे वागू लागली तर वाद होणारच, असे हवालदार बी. बी. ठोंबरे यांचे म्हणणे. काही वेळा पती-पत्नींच्या वैयक्तिक वादात त्यांचे आई-वडील अवाजवी हस्तक्षेप करतात. त्यामुळे प्रश्न दोन्ही बाजूकडून प्रतिष्ठेचा होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम नकळत का होईना पती-पत्नीवर होत असतो. त्यामुळे बऱ्याच प्रकरणात प्रतिवादीला त्याचा अहं न दुखावता सांभाळायचे कसे हा प्रश्न शाखेपुढे असतो. मात्र समुपदेशानानंतर झालेल्या समझोत्याचा आपल्याला नेहमीच आनंद होतो, असे सुरेखा गिते यांनी सांगितले. आपल्यावरील अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी महिलांनी महिला सुरक्षा विशेष शाखा (०२५३- २३१९६०९), ग्रामीण भागातील महिलांनी गंगापूर पोलीस चौकी (०२५३- २३१९७१०) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.