Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणूक रिंगणात ‘संशयकल्लोळ’

 

विवाहाची तारीख निश्चित होऊनही वधु-वरांची नावे निश्चित नसावी, तशीच काहीशी परिस्थिती लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप यांच्यातील ‘घोळात घोळ’ चा फार्स संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवार निवडही आपोआपच लांबणीवर पडत आहे. एखाद्या चित्रपटाचा शेवट आता जवळ आला आहे, असे वाटत असताना मध्येच एखाद्या उपकथानकाचा जन्म होऊन शेवट लांबतो. तीच तऱ्हा आघाडी व युती यांच्यातील वाद-विवादांची. सर्व विवादांना पूर्णविराम मिळाला आहे, असे चित्र निर्माण होत असताना मध्येच एखाद्या जागेवरून तिढा अद्याप कायम असल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ येते. इच्छुक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’ अशी ही स्थिती. प्रत्येक पक्ष अधिकाधिक व सोयीच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावाचे राजकारण खेळत असल्याने एकमेकांविषयी विश्वास वाटण्याऐवजी अविश्वासाचे, संशयाचेच वातावरण अधिक प्रमाणात निर्माण होत आहे. हा संशयकल्लोळ कार्यकर्त्यांपर्यंत झिरपल्याने तर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
नाशिकमध्ये बहुजन समाज पक्षाने महंत सुधीरदास यांची जाहीर केलेली उमेदवारी, हा एकमेव अपवाद वगळता इतर सर्वच पक्षांकडून अद्याप चाचपणीचा खेळच सुरू आहे. जिल्ह्य़ातील दोन्ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आल्याच्या वृत्तामुळे काँग्रेस पदाधिकारी अस्वस्थ आहेत. पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी किमान एकतरी जागा काँग्रेसला देण्यात यावी, अशी त्यांची मागणी. पुनर्रचित दिंडोरी मतदारसंघात पाच आमदार एकटय़ा राष्ट्रवादीचे व काँग्रेसकडे उमेदवार मिळण्याची मारामार तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, परंतु विद्यमान खासदार मात्र त्यांचा, अशी विचित्र स्थिती. पक्षाचा खासदार असल्यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणे जसे अपेक्षित, तसेच त्यांनी दिंडोरीवरही दावा सांगितल्याने काँग्रेसचे पदाधिकारी बिथरणेही अपेक्षित. त्यामुळेच जिल्ह्य़ातील एक जागा काँग्रेसला न सोडल्यास त्याचा परिणाम राष्ट्रवादीच्या उमेदवारास भोगावा लागण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या या इशाऱ्याला वरीष्ठ पातळीवर किती ‘किंमत’ आहे, हे लवकरच कळेल, परंतु अशा वातावरणात दोन्ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यावर शिक्कामोर्तब झाल्यास काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते कितपत सहकार्याचा हात पुढे करतील, याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. दुसरीकडे सेना-भाजपमध्ये जागा सोडण्यावरून कोणताही वाद नसला तरी अविश्वासाचे वातावरण कायम आहे. अंतर्गत कलहाचा सामना करणारी सेना नाशिकमधून उमेदवार निश्चित करण्याआधी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याची वाट पाहत आहे. राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, देवीदास पिंगळे की डॉ. वसंत पवार, हे चित्रही स्पष्ट नाही. आघाडी व युतीमध्ये असा गोंधळ असताना बसप व मनसे या स्वतंत्रपणे मैदानात उतरणाऱ्या पक्षांनी प्रारंभिक टप्प्यात तरी काहीशी आघाडी घेतल्याचे दिसते. मनसेकडून जिल्हा परिषद सदस्य हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
नाशिकच्या शेजारील जिल्ह्य़ांमध्येही वेगळी स्थिती नाही. नाशिक व धुळे या दोन जिल्ह्य़ांमध्ये विभागल्या गेलेल्या धुळे लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेस दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. सेना-भाजप युतीकडूनही उमेदवारांचा शोध सुरू असताना इंदूर-धुळे-मालेगाव-मनमाड या रेल्वेमार्गासाठी आंदोलनांची धूम उठवून देत विरोधकांना धडकी भरविणारे लोकसंग्राम पक्षाचे नेते अनिल गोटे यांच्या उमेदवारीवरही चर्चा सुरू असल्याने ‘जर-तर’ च्या फेऱ्यातच युती अडकल्याचे दिसते.
नंदुरबार मतदार संघात तर संशयकल्लोळ, मानापमान अशा एकापेक्षा एक सरस नाटकांचे प्रयोग रंगले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चारीमुंडय़ा चीत करीत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादीला देदीप्यमान यश मिळवून दिल्याने त्यांनी मतदार संघावर हक्क सांगितला आहे. दुसरीकडे स्वातंत्र्यापासून या मतदार संघाची रखवालदारी करीत असणाऱ्या काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत ही मागणी मान्य होणार नाही, असे ठणकावले आहे. काँग्रेसचे माणिकराव गावित यांची उमेदवारी निश्चित असली तरी राष्ट्रवादीकडून नेमका कशा प्रकारे प्रचार केला जाईल, याची त्यांना धास्ती आहे.
जळगाव जिल्ह्य़ातील रावेर व जळगाव दोन्ही मतदार संघ भाजपच्या वाटय़ाला आल्याचे पदाधिकारी सांगत असले तरी शिवसेनेकडून एका जागेची मागणी केली जात असल्याने गुंता कायम आहे. सुरेश जैन यांच्यामुळे आपणास फायदा होऊ शकतो, असा सेनेचा दावा आहे, तर भाजपने दोन्ही जागा आपल्याच, म्हणून निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचारही सुरू केला होता. रावेर मतदार संघ आपल्यासाठी सोडण्याची मागणी राष्ट्रवादीने केल्याने काँग्रेसमध्ये असंतोष आहे.
अशी एकूणच सर्व अविश्वासाची परिस्थिती निवळल्याशिवाय कार्यकर्त्यांना प्रचाराची दिशा देणे पदाधिकाऱ्यांना शक्य होणार नाही. आघाडी असो वा युती, दोघांसाठी अशी परिस्थिती अधिक काळ राहाणे धोक्याचेच.