Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मौनं सर्वार्थ साधनम्

 

भाऊसाहेब : तुमी बाप-बेटे आज येकदम शांत शांत दिसतायं भावराव, निवडनुकीच्या आखाडय़ात शांतता हाये वाटतं ?
भाऊराव : नाही तसं काही नाही, पण नाशिकमधून जी एक-एक नांव पुढे येऊ लागली आहेत, त्यामुळे काय बोलावं तेच सुचेनासं झालंय खरं.
भाऊसाहेब : आता आनि कोनतं नवं नांव पुडं आलं ?
भाऊराव : दादा, महंत सुधीरदासांपाठोपाठ महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराजांचंही नांव चर्चेत आहे म्हणे..
भाऊसाहेब : काय सांगतोस, अन् कोनत्या पक्षाकडून महाराजजी हुबे राहनार?
भावडय़ा : अहो, शांतीगिरीजी महाराजांचा भक्त परिवार एवढा मोठा आहे की, त्यांना कोणत्याच पक्षाची गरज नाही म्हणतात.
भाऊराव : हो, म्हणूनच ते अपक्ष उभे राहणार असल्याची चर्चा आहे.
भाऊसाहेब : खरंय, गडय़ा तुझं.
भावडय़ा : पण, डॅड मग इतर उमेदवारांच्या ‘इलेक्टोरिअर मेरीट’चे काय ?
भाऊराव : हे बघ भावडय़ा, आपल्याकडे इलेक्टोरिअर मेरीटच्या नावाखाली भलत्याच मुद्दय़ांची चर्चा सुरू असते. या सगळ्या शक्याशक्यतांच्या गदारोळात मूळ मुद्दा दुर्लक्षित होतो.
भावडय़ा : तो कोणता ?
भाऊराव : निवडणुकीत विजयासाठी सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल तर ते म्हणजे मत, अर्थात मतांची संख्या. जय बाबाजी भक्त परिवार आपल्याकडे खूप मोठा आहे. पर्यायाने ते शांतीगिरीजी महाराजांच्या उमेदवारीला फायदेशीर ठरणार. शिवाय, आपल्या अनेक नेतेमंडळींचाही या भक्तपरिवारात समावेश आहे, त्यामुळे शांतीगिरीजी महाराजांची उमेदवारी मतदारसंघातील गणितांची उलथापालथ नक्कीच करेल.
भावडय़ा : त्यांचे भक्तगण तर कामालाही लागले आहेत, म्हणतात..
भाऊसाहेब : भक्तांचं ठीक, पन महाराजांची तयारी नगं ?
भाऊराव : या संदर्भात भक्तांची म्हणजेच आता कार्यकर्त्यांची बैठक झाली म्हणे, त्यात सगळं नक्की झाल्याचं सांगतात.
भाऊसाहेब : पनं, लोकसभेला अपक्ष उमेदवारी म्हंजे..
भाऊराव : महाराजजींच्या भक्त परिवारात सगळ्याच पक्षाची मंडळी आहेत. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांपासून अगदी काही आमदार, सभापती सुद्धा त्यांचे भक्त आहेत. त्यामुळे उगीच कुणाची गैरसोय नको म्हणून महाराज अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.
भावडय़ा : पण, महाराज तर मौनव्रतात असतात म्हणे..
भाऊसाहेब : आरं, येरवी आपन निवडून दिलेले खासदार बी दिल्लीला गेल्यावर मौनच धारन करतात की भावडय़ा..
भाऊराव : मौनं सर्वार्थ साधनम्, हेच बाकी खरं!
पॉलिटिशन
rangeelarangari@gmail.com