Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महिलांनी लक्ष घालावे असे काही..

 

गेल्या चार-पाच दशकांचा आढावा घेता असे लक्षात येते की, आपल्या देशातील लोकसंख्येच्या ५० टक्के भाग असलेल्या महिलांच्या पोषण दर्जाच्या बाबतीत फारशी माहिती उपलब्ध नाही. बालकांच्या कुपोषणावर आरोग्यसेवा, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था वगैरेंचे लक्ष केंद्रीत आहे व कुपोषण कमी करण्यासाठी सुरू असलेल्या उपाय योजनांना काही प्रमाणात यश येत आहे. परंतु, मातेच्या पोषणाकडे कुटुंबाचे व समाजाचे लक्ष केंद्रीत होत नाही, हीच दुर्दैवाची बाब आहे.
त्यामागे काही कारणे देखील आहेत. इतर अनेक कारणांपेक्षा अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे तिला स्वत:लाच त्याचे गांभीर्य नाही की जाणीव नाही. खेडय़ातील, आदिवासी भागात राहणारी स्त्री अज्ञानी, निर्णय क्षमता व आर्थिक स्वातंत्र्य नसलेली शिक्षणाचा अभाव असलेली, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारी सतत चूल आणि मूल व कष्ट यात गुरफटलेली आहे. तिच्या कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या निभवणारी अशी आहे व त्यात तिच्या अंगी असलेल्या कमालीच्या सहनशीलतेमुळे बरेचवेळा कळत असूनही वळत नाही, अशी परिस्थिती असते. पण, शहरी भागातील स्त्रीचे काय ? उच्च शिक्षित, हातात भरपूर, पैसा असणारी, योग्य निर्णय क्षमता असणारी, कुटुंबात योग्य स्थान असणारी ही स्त्री स्वत:च्या आरोग्याकडे व पोषण मूल्यांकडे किती से लक्ष देते ? तिला ही जाणीव असते परंतु, आजाराने गंभीर स्वरुप न घेतल्याशिवाय त्याबद्दल गांभीर्याने विचार न करण्याचीच मानसिकता आढळते.
निसर्गाने स्त्रिला अनेक बाबतीत समृद्ध केले आहे. तिच्या ठायी ममता, संगोपन, (मुलांचे आणि कुटुंबाचे) अविरत श्रम करण्याची क्षमता, मृदुता, क्षमाशीलता, औदार्य, प्रेम ओथंबून दिले आहे. म्हणूनच ती कुटुंबातील इतर सर्व व्यक्तींची काळजी करते. त्यांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, प्रगतीसाठी अविरत कष्ट करते व सर्व व्यवस्थितपणे करण्याचा अटोकाट प्रयत्न करते. पण, स्वत:च्या बाबतीत तिला तिच्या गरजांची जाणीव नसते.
लहानपणापासूनच्या आहाराच्या सवयींचा यात खूप मोठा वाटा असतो. लग्नापूर्वी अवास्तव आवडी निवडीमुळे नेमके पोषक पदार्थ टाळले जातात. पुढे लग्न झाल्यावर पहिल्या गरोदरपणात थोडे फार लाड होतात, डोहाळे पुरवले जातात, त्यायोगे खाण्यापिण्याकडे जरा तरी लक्ष पुरवले जाते. परंतु बाळंतपणाचे दोन-तीन महिने सोडले तर आहाराकडे फारसे लक्ष दिले जात नाही. बाळंतपणात झालेली झीज, बाळ अंगावर पीत असताना वाढलेली गरज याकडे कानाडोळा होतो व रोजच्या आहाराचे संतुलन बिघडते. बाळंतपणाच्या वेळी एचबी तपासल्यानंतर पुढे ८ / १० वर्षे पुन्हा ते तपासले जात नाही. कॅल्शियमची लेव्हल कधीच बघीतली जात नाही आणि कालांतराने या सर्व अत्यंत महत्वाच्या पोषक घटकांच्या अभावाने उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढू लागतात.
सतत थकवा, कंटाळा, निरुत्साह, चिडचिड, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा किरकोळ वाटणाऱ्या समस्या जेव्हा गंभीर रुप धारण करतात तेव्हाच डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. स्त्रीने आयुष्याच्या सुरूवातीपासून स्वत:च्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले, स्वत:चा पोषण दर्जा उत्तम राखला तर तिची शारीरिक, बौद्धीक क्षमता नक्कीच उंचावेल आणि ती जास्त कार्यक्षम होईल. यासाठी तिने काय केले पाहिजे, तर वर्षांतून एक वेळा वैद्यकीय चाचण्या कराव्यात उदा. एच.बी., कोलेस्ट्रोरॉल, ट्रायग्लिसराईडस् यांची पातळी, वजन, गर्भाशयाच्या व स्तनांच्या कॅन्सरच्या तपासण्या, पोटाची सोनोग्राफी अशा तपासण्या करून घ्याव्यात तसेच आपला आहार ‘समतोल’ ठेवावा. उत्तम आरोग्याच्या व्याख्या समजून ते राखण्यासाठी नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण करावे, जेणे करून तिच्या व्यक्तिमत्वावर सोनेरी मुकूट चढेल.
संगीता पतकी
आहारतज्ज्ञ, नाशिक