Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘मंत्र’

 

बायका एकत्र आल्या की काय करणार, या बद्दल प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असू शकतात. मात्र, राष्ट्रसेविका समितीच्या वतीने महिलांचे संघटन करत त्यांना शारीरिक, मानसिक, बौध्दीकदृष्टया सक्षम करण्यासोबत राष्ट्रप्रेम जागृत व्हावे यासाठी लक्ष्मी केळकर यांच्या पुढाकाराने व अखिल भारतीय राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्याने नाशिक शहारात १९५८ साली राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीची स्थापना झाली. स्थापनेपासूनच सामाजिक गरजा ओळखून विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली. यामध्ये नोकरदार महिलांसाठी समितीतर्फे महिला वसतीगृह, पाळणाघर स्थापन करण्यात आले. तसेच बालवाडी व बालवाडी प्रशिक्षण वर्गाला गेल्या काही वर्षांपासून सुरूवात करण्यात आली आहे.
राष्ट्रसेविका समितीच्या वतीने नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांतून महिलांसाठी पौराहित्य वर्गही चालवले जातात. नाशिकला जुना आग्रारोडवरील स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या उर्फ राणी भवनच्या वास्तूमध्ये १९८९ सालापासून स्त्री पुरोहितांचे वर्ग चालू आहेत. चार वर्ष कालावधी असणाऱ्या या वर्गामध्ये अथर्वशीर्ष, श्री सुक्त, पुरूषसुक्त, रूद्र, गंगालहरी, शिवमहिम्न आदी मंत्र शिकवले जातात.
या पौराहित्य वर्गाला महिला वर्गाकडून उत्स्र्फूत प्रतिसाद लाभत आहे. मंत्राची सोपी व्याख्या सांगायची झाली तर अंतकरणात श्रध्दा ठेवून, भगवंताविषयी प्रेमाने परमेश्वर प्राप्तीसाठी, भगवंताजवळ मंत्राच्या साह्य़ाने बोलणे, प्रत्येक मंत्राचे अंतिम ध्येय म्हणजे परमेश्वराची प्राप्ती, स्वानंद, आत्मानंद मिळविणे. मंत्राला विशिष्ट अर्थ असतो. ते शरीराने नाही तर मनाने, प्रेमाने, अंतकरणातून म्हणायचे असतात. त्याचे परिणाम आपल्या शरीरावर, घरातल्या वातावरणावर होत असतात. गेल्या एकोणावीस वर्षांत हे वर्ग पूर्ण करणाऱ्या अनेक महिला सेविका आहेत. या महिलांना त्यांच्या सामान्य आयुष्यात मंत्राच्या उच्चाराने मिळालेले आश्चर्यकारक असे फायदे सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी हा लेख प्रपंच आहे.
या महिला पौराहित्य वर्गात अत्यंत स्पष्ट आणि शुध्द मंत्रोच्चाराकडे लक्ष दिले जाते. ते सारे घोटून घेतले जाते आणि पाठांतरावरही भर दिला जातो. त्यामुळेच असे वेगळे अनुभव सर्वाना येत असतात. सर्वात प्रथम आत्मविश्वास वाढला असे अनेकांनी सांगितले. तसेच भीती नाहिशी झाली, मनाची संवेदनशीलता वाढली, वाणीमध्ये शुद्धता आली त्यामुळे भाषा सुधारल्याचा अनुभवही अनेकींना आहे. शास्त्रशुध्द शिक्षणामुळे ज्ञानाचे महत्व समाजाला पटले. जिज्ञासावृत्ती वाढली आणि जीवनाला एक आखीव रेखीवपणा आला. नकारात्मक विचार कमी झाले व शास्त्रशुध्द मंत्रोच्चारामुळे अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढली. मंत्र पठणामुळे संकुचित वृत्तीच्या काही महिला आदराने इतरांकडे बघू लागल्या, बोलू लागल्या, विचारात प्रगल्भता वाढली. त्याचप्रमाणे अनेक घरांतल्या अनेक सासूबाईंचा आपापल्या सुनांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलल्याची उदाहरणे आहेत. समोरच्याला समजून घेण्याची क्षमता वाढल्याने नात्यातील सुसंवादही वाढला आहे.
प्रत्येक मंत्राचा अर्थ कळल्यामुळे म्हणण्यात सहजता येऊ लागली. जीवनात नियमीतपणा आल्यामुळे समाधान वाटू लागले. मुलांच्या स्वभावातही फरक पडला. मुले संध्याकाळी टी.व्ही. वरचे कार्यक्रम सोडून रामरक्षा म्हणू लागली. नियमित मंत्रपठणाने या महिलांची चिडचीड कमी झाली, काही किरकोळ दुखण्यांमधून सुटका झाली. एकप्रकारे स्त्रीला स्त्रीत्वाची, स्वत्वाची जाणीव व्हायला लागली. विशाल मातृत्व जागृत झाले. अंधश्रद्धा दूर होऊन अर्थ समजल्याने प्रत्येक कार्य डोळसपणे होऊ लागले.
राष्ट्रसेविका समिती या मंत्र शिक्षणाद्वारे आज एकप्रकारे राष्ट्र संवर्धनाचे कार्य करीत आहे. अशा मंत्रशास्त्रच्या वर्गाला जर सर्व समाजातील महिलांनी उपस्थित राहून मंत्रशास्त्र शिकून घेतले तर घराघरांतील वातावरण नक्कीच आणखी समृद्ध होईल. महिला पुरोहिता घराघरात जातात आणि पूजा सांगणे, मंत्र पठण करणे याच्या जोडीला मंत्रातून दडलेला अर्थ आणि राष्ट्रभक्ती शिकवण्याचे काम करतात. या साऱ्या गोष्टी आजच्या काळात अत्यंत मोलाच्या आहेत, याचा विचार सर्व समाजाने जरूर करावा.
साधना कुलकर्णी
नाशिक