Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘आवाका मोठा असावा’

 

परीकथेतील राजकुमारासारखी खासदारांकडून अपेक्षा ठेवणारे अनेकजण असतात. मतदारसंघात जादुची कांडी फिरवून त्याचा कायापालट करणारा खासदार हवा, असा समज बाळगणारे खूप. संसदेत तो बोलला नाही, म्हणजे तो निष्क्रिय. माध्यमं जे दाखवितात, त्यावरून त्याच्या कामाचे मूल्यमापन करीत आपण, त्या खासदाराला मोडीत काढतो. आपल्या एका मताने त्यांना निवडून दिले असते, तेव्हा त्यांच्या कामाचे ऑडिट आपण करणार ! त्यापूर्वी खासदार करीत असलेली कामे आपण समजून घेतली पाहिजेत.
प्रत्येक खासदार संसदीय कामाच्या व्यतिरिक्त दोन समित्यांवर काम करीत असतो. प्रत्येक खात्याशी संलग्न असणाऱ्या स्थायी समित्या म्हणजे एक मिनी पार्लमेंटच ! विधेयकावर प्रत्येक कलमानुसार चर्चा येथे घडते. पक्षभेद विसरून हे कामकाज चालते. विधेयकाविषयी संसदेला शिफारस केली जाते, त्यानंतरच ते मंजूर होते. या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या खासदाराचं मूल्यमापन माध्यमे करीत नाहीत.
वर्षांला दोन कोटी रूपयांचा मतदारसंघ विकास निधी मिळणाऱ्या खासदाराला कोणकोणती कामे करता येऊ शकतील, हे लोकांनी एखादा दबाव गट निर्माण करून सांगितले आहे का ? भरपूर अनुदान असणाऱ्या योजना आपल्याकडे आणता येऊ शकतील, त्या सगळ्याची नोंद आपण मतदार करतो का ? विकासाचा मुद्दा समोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्रातील लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून काही कोटी रूपयांचा योग्य विनियोग कसा करता येईल, याची आखणी करायला काय हरकत आहे ?
आता प्रश्न नाशिकच्या विकासासाठी खासदाराला काय करता येऊ शकेल हा. कांदा व द्राक्ष याकरिता जगाच्या नकाशावर पोहोचलेले नाशिक, पण या दोन्ही संदर्भातल्या समस्या तशाच आहेत. त्या सोडवू शकणारा खासदार हवा. पर्यटन म्हटले की केवळ कोकणच का ? नाशिक का असू नये, त्यामुळे परिसराचा विकास होईल. नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम किती काळ रखडणार ? मुंबई, पुणे, नगर, औरंगाबादला जाण्यासाठी सहापदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करावयास काय हरकत आहे ? औद्योगिक वसाहतींची संख्या वाढविण्यापेक्षा त्यासाठी लागणाऱ्या विजेला प्राधान्य देण्याचा विचार का नको ?
उद्योगापेक्षा कृषीक्षेत्रातील रोजगाराच्या संधींचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करणारा खासदार आज हवा आहे. आयटी पार्क, वायनरी इन्स्टिटय़ूट, कार्गो इन, टर्मिनल मार्केट याबरोबर पायाभूत सुविधांवर मुख्यत्वे भर देऊन नाशिकची खरी ओळख वीस वर्षांनंतरही कोणती राहील याची दृष्टी देणारा खासदार आपण निवडून द्यावा. मात्र, हा खासदार पासष्टीच्या आतील असावा. शिक्षित, भाषण-संभाषणात कुशल, गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसलेला, जातीचे राजकारण न करणारा हवा. विषयाचा आवाका उत्तम आणि झालेल्या खर्चातले १० टक्के पाहिजे असं न म्हणणारा हवा. पाच वर्षांत सहाशे गावांना त्याने भेटी द्याव्या हा आग्रह आपण धरू नये. मतदारसंघापुरता सीमित हा त्याचा परिचय नको, देशहिताचा विचार करणारा असे त्याचे प्रोफाईल हवे.
डॉ. वृन्दा भार्गवे, नाशिक