Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दिंडोरी मतदारसंघाचा वाद; कॉंग्रेसचा राष्ट्रवादीला इशारा
नाशिक / प्रतिनिधी

 

राष्ट्रवादीने जिल्ह्य़ातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदार संघांवर हक्क सांगितल्याने बिथरलेल्या काँग्रेसने दिंडोरी मतदार संघ मिळण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. काँग्रेसच्या वाटय़ाला दिंडोरी मतदार संघ न दिल्यास त्याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसेल, त्याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीतही त्याची झळ बसेल, असा इशारा जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिल्याने श्रेष्ठी यातून काय मार्ग काढतात त्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
पुनर्रचनेत निफाड व येवला हे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेले विधानसभा मतदार संघ लोकसभेसाठी दिंडोरीला जोडण्यात आल्याने आपोआपच राष्ट्रवादीची बाजू बळकट झाली आहे. राष्ट्रवादीने ही बाब हेरत मतदार संघावर दावा सांगण्यास सुरूवात केल्यावर पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दीही वाढली. राष्ट्रवादीकडून उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसले तरी त्याआधीच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी इशाऱ्याचे निशाण फडकावित राष्ट्रवादीला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे पक्षाने केलेल्या आवाहनानुसार चार इच्छुकांनी आपले अर्जही पदाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. मतदार संघ आपल्या वाटय़ाला येवो अथवा न येवो, परंतु आपल्या पातळीवर तयारी करीत काँग्रेसने एकप्रकारे आपणही पूर्ण तयारीत आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दिंडोरी मतदार संघाबाबतचा आघाडीतील तिढा मिटत नसल्याने इच्छुकांमध्येही चलबिचल निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर पेठ-सुरगाणा मतदार संघही लोकसभेसाठी दिंडोरीत समाविष्ट असल्याने माकपने आ. जीवा पांडु गावित यांची उमेदवारी जाहीर करीत प्रचाराला सुरूवातही केली आहे. युतीतर्फे भाजपचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीवर पिंपळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत
गोपीनाथ मुंडे यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर चव्हाण यांचाही प्रचार जोरात सुरू झाला आहे. बसपने नाशिक मतदार संघात उमेदवारी जाहीर केल्यामुळे दिंडोरीतील त्यांचा उमेदवार कोण, याविषयी सर्वामध्येच उत्सुकता निर्माण झाली आहे.