Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महिलादिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रम
नाशिक / प्रतिनिधी

 

जागतिक महिलादिनानिमित्त शहरात विविध संस्था, संघटना आणि महाविद्यालयांतर्फे गुणवंत महिलांचा सत्कार, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इन्हरव्हिल क्लब ऑफ अंबड, निमा, आयमा व ब्राम्हण महासंघ या संघटनांच्या महिला विभागातर्फे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला निमा हाऊस येथे शनिवारी सायंकाळी चार वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादात स्त्रियांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, उपलब्ध होणाऱ्या नव्या संधीचा कसा उपयोग करावा, याशिवाय महिलांशी संबधित विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. महिलांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चेंबरच्या महिला विभागप्रमुख निलिमा पाटील, इन्हरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सुशीला चंद्रशेखर, निमाच्या महिला विभाग उपाध्यक्षा अरूणा जाधव, ब्राम्हण महासंघाच्या महिला विभाग अध्यक्षा प्रेरणा बेळे यांनी केले आहे.
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्राथमिक विभागातर्फे रविवारी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मालती आव्हाड अध्यक्षस्थानी राहणार असून मनोरमा आव्हाड, यमुना धात्रक, माधुरी धात्रक, विमल बोडके, सविता सोनवणे, पंचायत समिती सदस्य लता वाघ, मंदाकिनी सोनवणे, नगरसेविका सुमन सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेच्या संचालिका अ‍ॅड. वसुधा कराड, अ‍ॅड. ज्योत्स्ना घुगे या महिलांविषयक कायद्याची माहिती देणार असून डॉ. मंजुषा दराडे आरोग्य व आहार याबद्दल माहिती देणार आहेत. लता ताडगे यांचे ‘स्त्री कालची आणि आजची’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. महिलांनी या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरेश ताडगे, हिंदी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना धात्रक यांनी केले आहे.
महिला मेळावा
नाशिक जिल्हा महिला बचतगट विकास सहकारी पतसंस्था व जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने रविवारी जिल्हास्तरीय बचतगट मेळावा, महिला बचत गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या गटांचा सन्मान कार्यक्रम गोविंदनगर येथील नाशिक जिल्हा महिला बचत गट सहकारी पतसंस्थेच्या आवारात सकाळी अकरा ते तीन या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयमाचे मानद सचिव धनंजय बेळे, उद्योजक हेमंत राठी, जनशिक्षण संस्थेच्या संचालिका प्रिया पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी दैनंदिन जीवनातील ताणतणावर मात करण्यासाठी पुणे येथील अशोक देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांनी केले आहे.
‘आम्ही साऱ्याजणी’
नाशिक शहर महिला संघटनेतर्फे रविवारी शरणपूररोड येथील वैराज कलादालनात दुपारी तीन वाजता ‘आम्ही साऱ्याजणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्राचार्या दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नायिका की अन्यायिका’ हा नाटय़प्रयोग व ‘जोडी आमची जमली गं’ हा कार्यक्रम होणार आहे. महिलांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्षा प्रभा कुलकर्णी यांनी केले आहे.
ब्राम्हण महासंघातर्फे व्याख्यान
महिला दिनानिमित्त ब्राम्हण महासंघ इंदिरानगर विभागातर्फे सावरकर सभागृहात सायंकाळी चार वाजता कथाकथनकार संगीता इनामदार यांचा कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अ‍ॅड. राजश्री साकुरीकर, मधुरा पारखी, वसुधा काणण्व यांनी केले आहे.
कर्करोग निदान शिबीर
कॅनडा कॉर्नर येथील रोटरी क्लब व मुंबई नाका येथील सुयश हॉस्पिटल यांच्या सहकार्याने दुर्लक्षित राहिलेल्या महिलांचे आरोग्य या प्रश्नाला प्राधान्य देत रविवारी मोफत कर्करोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मॅमोग्राफी क्ष किरण तपासणी, स्तन गर्भमुख कर्करोगांची हार्मोनल तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्प संयोजक डॉ. संजय अहिरे यांनी दिली.
महिला आरोग्य चर्चासत्र
गंगापूररोड येथील समर्थ महिला मंडळाच्या वतीने नऊ मार्च रोजी दुपारी चारला अथर्व मंगल कार्यालय येथे महिलांसाठी ‘आरोग्य जागृती मार्गदर्शन शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. चाळीशीनंतर महिलांना आरोग्याच्या तक्रारी सुरु होण्याचा धोका असतो. रजोनिवृत्तीच्या वेळेस दिसणारी लक्षणे, हाडे ठिसूळ होणे अशा समस्यांवर लक्ष केंद्रीत करून तपासणी करुन घेतल्यास धोका टळू शकतो. याचे गांभिर्य लक्षात घेवून समर्थ महिला मंडळाच्या वतीने हे चर्चासत्र होईल. डॉ. पद्मजा जोशी, डॉ. विश्राम दिवाण या चर्चासत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. या शिबीरास परिसरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सीमा हिरे यांनी केले आहे.