Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

फॅमिली फिजिशियन असोसिएशनतर्फे रिफ्रेशर कोर्स
नाशिक / प्रतिनिधी

 

फॅमिली फिजिशियन असोसिएशनतर्फे येत्या ७ व ८ मार्च रोजी २५ व्या रिफ्रेशर कोर्सचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शनिवारी दुपारी दोनला आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साई पॅलेसमध्ये हा कार्यक्रम होईल. यावेळी सात व्याख्याने होणार आहेत. पहिल्या दिवशी दुपारी तीन ते सहा या कालावधीत डॉ. प्रतिक सोनी (हृदयविकार), डॉ. योगेश चौधरी (जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन), डॉ. सिंग (लॅपरोस्कोपिक सर्जन) यांची ज्ञानसत्रे होणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते दोन या वेळेत डॉ. विनोद व्हीजन (हृदयविकार), डॉ. कौस्तुभ गोखले (हृदयरोग), डॉ. राजेंद्र नेहते (कॉस्मेटीक सर्जन) यांची व्याख्याने होणार आहेत.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी. बी. देशमुख यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ३३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या असोसिएशनचे आज ५५० फॅमिली डॉक्टर सभासद आहेत. अद्ययावत वैद्यकीय ज्ञानाची माहिती व्याख्यानाद्वारे सभासदांना देणे, व्यावसायिक सुरक्षिततेबाबत काळजी घेणे, सोशल सिक्युरिटी स्कीम, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स याद्वारे फॅमिली डॉक्टरांच्या वैद्यकीय व कौटुंबिक सुरक्षिततेबाबत लक्ष देणे, स्नेहसंमेलन, सहली व क्रीडा स्पर्धा असे विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या फॅमिली वैद्यकीय व्यावसायिकास पुन्हा एकदा धन्वंतरी पुरस्कार देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजपयोगी उपक्रमांमध्ये फॅमिली डॉक्टरांचा सक्रिय सहभाग असल्याचे सचिव डॉ. विनोद गुजराथी यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांची मोफत तपासणी शाळेमध्ये जावून दरवर्षी केली जाते. मोफत आरोग्य तपासणी शाळेमध्ये जावून दरवर्षी केली जाते. खेडोपाडी जावून मोफत शिबिरे घेतली जातात. रूग्ण व फॅमिली डॉक्टर यांचे नाते अतुट असून परस्परांमध्ये विश्वास, सामंजस्य निर्माण होण्यासाठी असोसिएशनने भरीव कार्य केले असल्याचे ते म्हणाले.