Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

समाजाच्या तळागाळापर्यंत विकास पोहोचविण्यास ग्रामीण पत्रकारिता सक्षम
नाशिक / प्रतिनिधी

 

समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास पोहोचविण्यासाठी ग्रामीण पत्रकारिता सक्षम होण्याची गरज ग्रामीण पत्रकारांच्या विशेष कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली. नाशिक जिल्हा पत्रकार संघ आणि प्रगती अभियान या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातून ग्रामीण भागातील ६० पत्रकारांनी यात सहभाग घेतला.
शेवटच्या गावाचा आणि गावातील शेवटच्या माणसाचा विकास करण्याचे सामथ्र्य असणाऱ्या रोजगार हमी योजनेविषयी कार्यशाळेत पत्रकारांना माहिती देण्यात आली. राज्यातील रोहयोचा जन्म आणि योगदान, सध्याच्या रोहयोचे बदलते स्वरुप आणि रोहयोचा ग्रामीण विकासाशी असलेला संबंध या विषयांचा यात समावेश होता. आतापर्यंत रोहयोतील भ्रष्टाचार हा बातम्यांचा विषय झालेला दिसतो. त्याच्या पलिकडे जावून हा भ्रष्टाचार रोकण्याच्या उद्देशाने रोहयोची पारदर्शकता आणि प्रभावी अमलबजावणी घडवून आणण्यात ग्रामीण पत्रकारांचे काय योगदान असू शकते यावर प्रगती अभियानच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यासाठी रोहयो कायद्याच्या तपशीलातील माहितीसोबतच विविध पातळ्यांवर कोणकोणत्या विषयांची माहिती मिळवून, पडताळणी करून, कोणत्या काळात कोणत्या बातम्या देता येतील याचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी पत्रकारांनी रोहयोच्या कामांबद्दलचे आणि वार्ताकनाबद्दलचे त्यांचे अनुभव यावेळी मांडले, त्यांच्या शंकांचे चर्चेतून निरसन करण्यात आले.
रोहयोबाबत माहितीच्या अधिकाराच्या कायद्याबद्दलही या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. अन्य कायद्यांच्या तुलनेत माहितीच्या अधिकाराच्या कायद्याशी संबंधित असेलली पत्रकारांची सक्रीय भूमिका, कायद्यातील तपशील, बातमीदारीसाठी कायद्याचा वापर, कायद्याच्या वापरातील आव्हाने आणि व्याप्ती याविषयीवर यात पत्रकारांना माहिती मिळाली. रोहयोप्रमाणेच या कायद्याबाबतही सहभागी पत्रकारांनी त्यांच्या अनुभवांची चर्चा करून शंकांचे निरसन करून घेतले. नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने ही कार्यशाळा घेण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत नाशिक जिल्ह्य़ातील आदिवासी तसेच बिगर आदिवासी तालुक्यांमधील सर्व दैनिकांचे ग्रामीण वार्ताहर सहभागी झाले होते. ग्रामीण पत्रकारांसाठी अशा प्रकारचे उपयोगी मार्गदर्शन मिळाल्याबद्दल सर्वानी समाधान व्क्त केले. तसेच, तालुकापातळीवरील पत्रकारांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने त्या त्या ठिकाणी अशीच कार्यशाळा घेण्याची तयारी दर्शविली.