Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

राष्ट्रवादीच्या भूमिकेवर ठरणार काँग्रेसच्या इच्छुकांचे भवितव्य
प्रतिनिधी / नाशिक

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघापैकी किमान एक जागा आपल्या पदरात पडावी म्हणून जिल्हा काँग्रेसने आटापिटा चालविला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस त्यास कितपत दाद देईल, यावर पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह तीन जणांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात तर अन्य चौघांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदेश काँग्रेसकडे अर्ज सादर करून व्यक्त केली आहे.

‘आवाका मोठा असावा’
परीकथेतील राजकुमारासारखी खासदारांकडून अपेक्षा ठेवणारे अनेकजण असतात. मतदारसंघात जादुची कांडी फिरवून त्याचा कायापालट करणारा खासदार हवा, असा समज बाळगणारे खूप. संसदेत तो बोलला नाही, म्हणजे तो निष्क्रिय. माध्यमं जे दाखवितात, त्यावरून त्याच्या कामाचे मूल्यमापन करीत आपण, त्या खासदाराला मोडीत काढतो. आपल्या एका मताने त्यांना निवडून दिले असते, तेव्हा त्यांच्या कामाचे ऑडिट आपण करणार ! त्यापूर्वी खासदार करीत असलेली कामे आपण समजून घेतली पाहिजेत.

मौनं सर्वार्थ साधनम्
भाऊसाहेब : तुमी बाप-बेटे आज येकदम शांत शांत दिसतायं भावराव, निवडनुकीच्या आखाडय़ात शांतता हाये वाटतं ?
भाऊराव : नाही तसं काही नाही, पण नाशिकमधून जी एक-एक नांव पुढे येऊ लागली आहेत, त्यामुळे काय बोलावं तेच सुचेनासं झालंय खरं.
भाऊसाहेब : आता आनि कोनतं नवं नांव पुडं आलं ?
भाऊराव : दादा, महंत सुधीरदासांपाठोपाठ महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराजांचंही नांव चर्चेत आहे म्हणे..

महिलांवरील अन्यायास महिलाच बहुतांशी कारणीभूत
महिला सुरक्षा शाखेतील नोंदी
चारूशीला कुलकर्णी /नाशिक

जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे हक्क व अधिकार याविषयी पुन्हा एकदा बोलबाला सुरू झाला असला तरी बहुतांशी प्रमाणात महिलाच महिलांच्या हक्काआड येत असल्याचे वास्तवही नाशिकमध्ये तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महिला सुरक्षा विशेष शाखेतील नोंदींवरून उघड होते. महिलांचे प्रश्न, त्यांच्यावरील अत्याचार, याची नोंद घेत त्यांना न्याय मिळावा यासाठी २००५ मध्ये जागतिक महिला दिनी आ. डॉ. शोभा बच्छाव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या शाखेचा निम्म्यापेक्षा अधिक वेळ कौटुंबिक अन्यायाविरोधात महिलांचेच प्रबोधन करण्यात जात आहे.

अनुदानाच्या दुधाची तहान ताकावरच
वार्ताहर / मालेगाव

वस्त्रोद्योग व्यवसायातील राष्ट्रीय पातळीवर मालेगावचा वाटा नऊ टक्के तर राज्य पातळीवर तो १७ टक्के असताना केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाकडून या व्यवसायात आधुनिक यंत्रसामग्री उभारण्यासाठी ‘टफ’ योजनेंतर्गत देशभरात देण्यात आलेल्या ४० हजार कोटीच्या अनुदानात मालेगावचा वाटा अत्यंत नगण्य आहे. येथील यंत्रमागांच्या तुलनेत किमान १२०० ते १५०० कोटीचे अनुदान मिळणे अपेक्षित असताना गेल्या दहा वर्षांत नाममात्र सहा उद्योजकांना जेमतेच ४० लाखाचे अनुदान या योजनेंतर्गत मिळू शकले.

निवडणूक रिंगणात ‘संशयकल्लोळ’
विवाहाची तारीख निश्चित होऊनही वधु-वरांची नावे निश्चित नसावी, तशीच काहीशी परिस्थिती लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप यांच्यातील ‘घोळात घोळ’ चा फार्स संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवार निवडही आपोआपच लांबणीवर पडत आहे. एखाद्या चित्रपटाचा शेवट आता जवळ आला आहे, असे वाटत असताना मध्येच एखाद्या उपकथानकाचा जन्म होऊन शेवट लांबतो.

महिलांनी लक्ष घालावे असे काही..
गेल्या चार-पाच दशकांचा आढावा घेता असे लक्षात येते की, आपल्या देशातील लोकसंख्येच्या ५० टक्के भाग असलेल्या महिलांच्या पोषण दर्जाच्या बाबतीत फारशी माहिती उपलब्ध नाही. बालकांच्या कुपोषणावर आरोग्यसेवा, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था वगैरेंचे लक्ष केंद्रीत आहे व कुपोषण कमी करण्यासाठी सुरू असलेल्या उपाय योजनांना काही प्रमाणात यश येत आहे. परंतु, मातेच्या पोषणाकडे कुटुंबाचे व समाजाचे लक्ष केंद्रीत होत नाही, हीच दुर्दैवाची बाब आहे.

महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘मंत्र’
बायका एकत्र आल्या की काय करणार, या बद्दल प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असू शकतात. मात्र, राष्ट्रसेविका समितीच्या वतीने महिलांचे संघटन करत त्यांना शारीरिक, मानसिक, बौध्दीकदृष्टया सक्षम करण्यासोबत राष्ट्रप्रेम जागृत व्हावे यासाठी लक्ष्मी केळकर यांच्या पुढाकाराने व अखिल भारतीय राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्याने नाशिक शहारात १९५८ साली राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीची स्थापना झाली.

समाधान शंकर यांचा सत्कार
मनमाडच्या एच. ए. के. हायस्कूलचे माजी विद्यार्थी समाधान शंकर यांनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांशी लढा दिला. हे शौर्य गाजविल्याबद्दल त्यांचा मालेगांवचे सहाय्यक पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोरे यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या सेवेसाठी संरक्षण दलात भरती होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष गणेश धात्रक होते. शहराचा नागरिक म्हणून आपणास समाधानचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास हायस्कूलचे सलीम अहमद, संजय धोंडगे, साहिल कांकरिया, जयवंत जगताप, मुख्याध्यापक अन्सारी अजीज, युनूस भाई आदी उपस्थित होते.

चित्रकला स्पर्धेचा निकाल
नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सकाळी दहा वाजता वाचनालयात होणार आहे. या स्पर्धेचे तीन गट पाडण्यात आले होते. गट क्रमांक एकमध्ये प्रथम- रुतिका चंदनगीर, व्दितीय-अंकिता टिपरे, तृतीय-सुदर्शन चंद्रात्रे, गट क्रमांक दोनमध्ये प्रथम-वैष्णवी थोरात, व्दितीय- कृष्णा ढगे, तृतीय- साक्षी बिरारी व तिसऱ्या गटात प्रथम- वैशाली भट्टड, व्दितीय- धिरज बिरारी व तृतीय- गायत्री बेलेकर यांना गौरविण्यात येणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंनी बक्षिस घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन बालभवन प्रमुख गिरीश नातू यांनी केले आहे.

नवापूर पलिकेतील निलंबित महिला रुजू
नवापूर येथील नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या सफाई कामगार हंसाबेन अटालिया व पन्नाबेन कराडे यांना जानेवारी पासून निलंबित करण्यात आले होते. कामावर घेण्यासाठी चार मार्चपासून त्यांनी साखळी उपोषण सुरु केले होते. त्यांच्या बरोबरच इतर ४५ कामगारांनीही साखळी उपोषण सुरु केले होते. त्यांचा परिणाम होवून त्यांना बिनशर्त कामावर रुजू करुन घेण्यात आले. आखिल भारतीय सफाई कामगार मजदूर संघटनेच्या नवापूर शाखेतर्फे त्यांचे निलंबन बिनशर्त मागे घेण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप हंडोरे, तालुका अध्यक्ष तुळशीराम ॠषी, उपाध्यक्ष शिवाभाई टिभे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.

पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन
नाशिक जिल्ह्य़ात सोन्याच्या दागिन्यांना पॉलीश करुन देतो, असे सांगून सदरचे दागिने पळविण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या बाहेरून आल्या आहेत व त्यांनी बऱ्याच महिलांना फसवून दागिने लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यक्तींकडून दागिने उजळून घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. निखील गुप्ता यांनी केले आहे. अशा प्रकारच्या व्यक्ती आढळल्यास त्वरीत पोलिसांना कळवावे, त्यामुळे या प्रकारांवर आळा घालण्यास मदत होईल असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले आहे. त्वरीत संपर्कासाठी ग्रामीण नियंत्रण कक्ष ०२५३-२३०९७१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

गटकळ वाचनालयाचा वर्धापन दिन
शहराचे विस्तारीकरण झाले, इमारतीची उंची वाढली, परंतु जेष्ठ नागरिकांच्या वाटय़ाला उपेक्षाच आली, अशा अवस्थेत कायद्याची भिती आणि माणुसकीची नीती जेष्ठांचा सांभाळ करु शकेल, असे विचार जेष्ठ पत्रकार पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केले. नाशिक येथील रंजनाताई संतोष गटकळ वाचनालयाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटकळ यांनी वाचनालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या समारंभात कीर्तन-प्रवचनकार हनमंत गडकरी, जेष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.