Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

नूतनीकरणाचा निधी दिखाऊ कामांवरच खर्च
प्रश्न जिव्हाळ्याचे
वार्ताहर / धुळे
धुळे अर्थात प्रताप मीलच्या नूतनीकरणासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने २००२ मध्ये तीन कोटी रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले खरे, पण ते गिरणीच्या नूतनीकरणासाठी वापरलेच गेले नाही, अशी कामगारांची तक्रार आहे. गिरणीतील उत्पादनक्षम यंत्रसामग्री अधिकाधिक काळ कार्यक्षम रहावी यासाठी हा निधी वापरणे आवश्यक होते. तथापि, तो गिरणीची संरक्षक भिंत, प्लास्टरकाम, आणि स्वच्छतागृह बांधण्याच्या दिखाऊ कामांवर खर्च केला गेला.

सटाणा तालुक्यात हजारो शेतकऱ्यांना कर्ज सवलत योजनेचा लाभ
सटाणा / वार्ताहर

तालुक्यातील १२ हजार १११ शेतकऱ्यांना केंद्राच्या कर्जमाफी योजनेतून ५०.६० कोटी रुपये तर ३,६३१ शेतकऱ्यांना कर्ज सवलत योजनेनुसार ९.४० कोटी रुपये सवलत देण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक गौतम बलसाणे यांनी दिली. केंद्राची कर्जमाफी योजना केवळ पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठीच होती. त्यामुळे अनेक गरजू, कर्जबाजारी परंतु पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी वंचीत राहिले होते. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कर्जमाफी व कर्जपरतफेड योजना २००९ जाहीर केली. या योजनेतून ६,८०१ कोटी रुपयांची कर्जमाफी व कर्ज सवलत देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे नंदुरबारमध्ये कॉंग्रेससमोर पेच
घडामोडी
शहादा / वार्ताहर
नंदुरबार लोकसभा मतदार संघांवर राष्ट्रवादीने दावा ठोकल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील यश हे लोकसभेसाठीचे निकष ठरू शकत नाही. नंदुरबार मतदार संघात पाच आमदार आणि विद्यमान खासदार काँग्रेसचे आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा हट्ट अनाठायी आहे, असे मत आ. अ‍ॅड. पद्माकर वळवी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. कमलाताई मराठे या ही जागा मिळावी म्हणून आक्रमक झाल्या आहेत.

जळगावातील अतिक्रमण : विशेष महासभेची मागणी
जळगाव / वार्ताहर

शहरात प्रचंड प्रमाणात फोफावलेल्या अतिक्रमणासंदर्भात कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आल्यानंतर महानगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी महापौरांना पत्र देऊन या प्रश्नी विशेष महासभा बोलविण्याची मागणी केली आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते, चौक, मोकळ्या जागा तसेच विविध व्यापारी संकुलात फेरीवाले व हॉकर्स या अतिक्रमणांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून दररोज त्यात भर पडत आहे. या परिस्थितीमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोच शिवाय काही रस्त्यांवर नागरिकांना पायी चालणेही मुश्किल असते. महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग कार्यरत असताना अतिक्रमणावर गेल्या अनेक वर्षांपासून नियंत्रण नाही. शहरातील या स्थितीला पालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व अधिकारीच जबाबदार असून यात लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानंतर पाटील यांनी महापौर रमेश जैन यांना पत्र देऊन या गंभीर विषयावर विस्तृत चर्चा करण्यासाठी विशेष महासभा बोलविण्याची मागणी केली आहे.