Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
विशेष

कोठेवाडीची व्यथा आणि वंचना!
बरोबर आठ वर्षे होऊन गेली. जानेवारीचा उत्तरार्ध आणि फेब्रुवारी पूर्ण अशा महिना-दीड महिन्याच्या काळात पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडीला तीन-चारदा जावे लागले. तोपर्यंत नगर जिल्ह्य़ात कोठेवाडी नावाचे गाव आहे याचीच कल्पना नव्हती. मात्र, ‘त्या’ रात्री दरोडा पडला. दागदागिने, पैशांच्या लुटीला फारशी संधी नव्हतीच. दरोडेखोरांनी महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने सबंध महाराष्ट्र हादरला. त्याबरोबरच कोठेवाडी चर्चेत आली. एरवी पाथर्डीकरांनाही माहिती नसलेल्या कोठेवाडीत या घटनेनंतर राज्यभरातून ओघ सुरू झाला. १६ जानेवारी २००१ची रात्र कोठेवाडीकरांसाठी शब्दश काळरात्र ठरली. संक्रांत होऊन दोनच दिवस झाले होते. पन्नास-बावन्न घरांची ही वाडी गाढ झोपेत असताना मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने कोयते, कुऱ्हाडीनिशी वाडीवर हल्ला चढविला. दरोडेखोरांनी साऱ्यांना एका वाडय़ात कोंडून महिलांवर अत्याचार केले. त्यातून ७० वर्षांची म्हातारीही सुटली नाही.

पुन्हा एक बंगला बने न्यारा..
अनधिकृत बांधकामे आणि ठाणे यांचे जे काही नाते जडले आहे, ते अपूर्व म्हणायला हवे. तब्बल एक लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामे असोत, वा येऊरच्या डोंगरात निसर्गाच्या कुशीत उभे राहिलेले जवळपास पावणेदोनशे बंगले असोत, याचा पुरता निकाल लागत नाही. वाद काही संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे तसेच अलीकडेच राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत दाखल झालेले प्रताप सरनाईक यांचे बंगले ठाणे महापालिकेने जमीनदोस्त केल्यावर येऊरचे बंगले पुन्हा एकवार चर्चेत आले आहेत. प्रश्न आहे, तो ही कारवाई तर्कसंगत शेवटाला जाण्याचा. तसे पाहिले तर येऊरच्या बंगल्यांचा प्रश्न यापूर्वीही अनेकदा गाजला आहे. कित्येकदा वाजून वाजून शांतही झाला आहे. सुमारे १७६ बंगल्यांपैकी जे बंगले अनधिकृत आहेत, ते पाडण्यासाठी २०-२५ वर्षे का लागावीत आणि इतका प्रदीर्घ अवधी मिळाल्यानंतरही त्यापैकी मोजक्याच बंगल्यांवरील कारवाई पूर्ण व्हावी, हे एक न सुटलेले कोडे आहे.