Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

शेअर बाजारातील ‘आम्ही साऱ्याजणी’
प्रसाद घारे, पुणे, ६ मार्च

महिलांनी आपला ठसा उमटविला नाही,असे कोणतेच क्षेत्र आता शिल्लक नाही. राजकारण, समाजकारण, संरक्षण, संशोधन, उद्योग-व्यापार, कला, क्रीडा आदी क्षेत्रात महिलांनी उंच भरारी मारली आहे. शेअर बाजार, गुंतवणूक या पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रातदेखील महिला मागे नाहीत, हे पुण्यातील महिलांनीच दाखवून दिले आहे.
२०००/२५०० कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या पुणे शेअर बाजार लि. (पीएसई) आणि पुणे शेअर बाजार सिक्युरिटीज लिमिटेड (पीएसई सिक्युरिटीज लि.) या दोन्ही बडय़ा संस्थांचा दैनंदिन कारभार सध्या सर्व महिलाच पाहात आहेत. येथील सर्व उच्चपदांवर महिला कार्यरत असून, येथे काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण सत्तर टक्क्य़ांहून अधिक आहे.

जात नाही ती ‘जात’!
शिक्षण, नोकरी व राजकारणातील सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी आपण मागासवर्गीय किंवा आदिवासी समाजाचे आहोत, हे दाखविणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. त्यासाठी खोटी कागदपत्रे, बनावट दाखले आणून जातीचा खोटा दाखला मिळविणाऱ्यांचे जणू पेवच फुटले आहे. असे ‘उद्योग’ करून अनेकांनी राखीव जागा बळकावल्यासुद्धा आहेत. सर्वच क्षेत्रात हे घडत असताना राजकारण तरी त्याला कसे अपवाद असेल? म्हणून तर असे अनेक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आढळतात. काहीजण तर आपल्या पदाची मुदत संपेपर्यंत याबाबतचे खटले लढत राहतात. पुणेही त्याला अपवाद नाही..

मद्यधुंद संगणक अभियंत्याचा दोघांवर गोळीबार; एक गंभीर
हडपसर, ६ मार्च/वार्ताहर

दारूच्या नशेत वाहन वेडेवाकडे चालविल्याबद्दल जाब विचारल्याच्या कारणावरून एका संगणक अभियंत्याने दोघा मित्रांवर पिस्तुलातून गोळीबार केला. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज पहाटे दोनच्या सुमारास मगरपट्टासिटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही घटना घडली.
या गोळीबारात सतीश माधवराव गायकवाड (वय ४३, रा. लोणकरवस्ती, केशवनगर-मुंढवा) जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीतून गोळी आरपार गेली. त्यांच्यावर हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी आशिष नरेश दीक्षित (वय ३५, रा. मगरपट्टासिटी, जस्मीनिया बिल्डिंग, जी/६०१, हडपसर, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सतीश गायकवाड यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

दलित मतदारांच्या कलाबाबत सर्वाधिक उत्सुकता
निवडणूक विश्लेषण

पुणे, ६ मार्च/विशेष प्रतिनिधी

‘‘आम्हाला बहेन मायावतींना पंतप्रधान करायचे आहे,’’.. बहुजन समाज पक्षाच्या अशा वेगळ्याच ध्येयाने प्रेरित झालेला कार्यकर्त्यांचा संच एका बाजूला तर दलित मतदारांच्या जोरावर आतापर्यंत राजकारण करणारे रिपब्लिकन पक्षांचे विविध गट आणि काँग्रेस पक्ष दुसऱ्या बाजूला.., यापैकी कोणाकडे दलित समाज वळेल, या प्रश्नाबाबत सर्वाधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

शहर ‘राष्ट्रवादी’त वादळापूर्वीची शांतता
पुणे, ६ मार्च/विशेष प्रतिनिधी
काँग्रेसबरोबरच्या आघाडीबाबत अंतिम निर्णय झाला नसून पक्षनेतृत्वाकडूनही कसलेही ‘संकेत’ नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अद्याप ‘शांतताच’ आहे. मात्र ही वादळापूर्वीची शांतता असावी, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. निवडणुकांचे वातावरण तापू लागले असताना राष्ट्रवादीचे नेते मात्र ‘साहेबांच्या’ व ‘दादांच्या’ आदेशाकडे डोळे लावून बसले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये बऱ्याच मुद्यांवर एकमत झाले असले तरी अजूनही साहेब काही वेगळा निर्णय जाहीर करतील, अशी आशा शहरातील नेत्यांना वाटत आहे.

प्रचारसभांसाठी जागा शोधण्याची राजकीय पक्षांवर वेळ!
चौकातील ‘सभा बंदी’ला विरोध
पुणे, ६ मार्च / खास प्रतिनिधी
शहरातील प्रमुख चौकांत प्रचारसभा घेण्यास मनाई करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या निर्णयामुळे राजकीय पक्षांवर सभेसाठी जागा शोधण्याची वेळ आली आहे. प्रचारसभांना योग्य जागा नसल्याच्या चिंतेने ग्रासलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीत या निर्णयाविरोधात नाराजी प्रकट केली आणि सभांसाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. राजकीय पक्षाची ही अडचण लक्षात आल्याने शैक्षणिक संस्थांची मैदाने शुल्क आकारून सभांना देण्याबाबतची शिफारस मुख्य निवडणूक आयुक्तांना करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिले. याशिवाय पोलीस आयुक्त व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यातून मार्ग काढता येईल का, याचा विचार करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

क्रीडा प्रशिक्षकानेच चोरले विद्यार्थ्यांचे वाहन
पिंपरी, ६ मार्च / प्रतिनिधी

व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्याने रोज शिकायला येणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचीच दुचाकी पळविल्याची घटना उघडकीस आली.चोरी करणाऱ्या या ‘गुरुजीं’ना पोलिसांनी ताबडतोब जेरबंद केले. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,नागेश अंजय्या धोबी (वय-२३, रा. संभाजीनगर, आकुर्डी)या व्यायामशाळेतील प्रशिक्षकाला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्याने बाळ सराफ या आपल्याकडे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची पल्सर गाडी चोरून नेल्याचा आरोप आहे. धोबी याने १७ जानेवारी रोजी संभाजीनगर येथील सराफ यांच्या घरापासून रातोरात ही गाडी लांबवली होती. तत्पूर्वी काही दिवस अगोदर एक फेरी मारण्याच्या बहाण्याने त्याने सराफ यांची गाडी नेली व त्याच गाडीची बनावट चावी तयार करून घेतली होती. स्पोलिसांच्या खबऱ्याने माहिती दिल्यावर त्याच्या घरातून दोन्ही गाडय़ा जप्त करण्यात आल्या.धोबी याला अटक करून नंतर जामिनावर सोडून देण्यात आले.

दोन शाळकरी मुले बेपत्ता
पुणे, ६ मार्च / प्रतिनिधी

श्री संत ज्ञानदेव विद्यालयातील शाहबाज सत्तार पठाण (वय १०, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) व सागर जगदीश ओसवाल (वय १३, रा. दत्त मंदिराजवळ, धनकवडी) हे दोन विद्यार्थी १८ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. पठाण हा रंगाने गोरा असून त्याची उंची चार फूट आहे. त्याने शाळेचा गणवेश असलेला बदामी रंगाचा शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट घातली असून, त्याने चष्मा लावलेला आहे. ओसवाल हा रंगाने गोरा आहे. त्याची उंची पाच फूट असून त्याने निळय़ा रंगाची सफारी घातलेली आहे. पठाण व ओसवाल या दोघांना कोणी पाहिल्यास ९९२२६४५०१० किंवा ९४२३७१५०४८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. खरातांच्या नावाचा वापर टाळण्याचे आवाहन
पुणे, ६ मार्च/ प्रतिनिधी
निवडणुकीच्या संदर्भात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या नावाचा गैरवापर करू नये, असे आवाहन डॉ. खरात यांच्या पत्नी डॉ. शकुंतला खरात यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा वेळी थोर साहित्यिक आणि मानवतावादी डॉ. शंकरराव खरात यांच्या नावाचा मोह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
परंतु अनेकांनी आग्रह केल्यानंतर कधीही डॉ. खरात हे निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले नव्हते. त्यांनी आपली राजकारणाची मानवतावादी व सामाजिक समतेच्या आग्रहाची भूमिका कायम राखली होती.अशा परिस्थितीत कोणीही राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.