Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नोंदणी व मुद्रांक विभागाने गमावले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र
सुनील कडूसकर
पुणे, ६ मार्च

 

आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविणारे पहिले सरकारी खाते अशी शेखी मिरविणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाला आता हे बिरुद मिरविता येणार नाही. कार्यपद्धतीच्या प्रमाणीकरणासाठी देण्यात येणारे ‘आयएसओ ९००१- २०००’ हे प्रमाणपत्र आपल्या अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळेच गमाविण्याची वेळ या खात्यावर आली आहे.
राज्याचे तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक डॉ. नितीन करीर यांच्या प्रयत्नातून जर्मनीच्या ‘टीयूव्ही साऊथ एशिया’ या संस्थेकडून नोंदणी व मुद्रांक विभागाने हे प्रमाणपत्र मिळविले होते. डिसेंबर २००३ मध्ये मिळविलेले हे प्रमाणपत्र ११ मे २००४ ते १० मे २००७ या काळासाठी वैध होते. तथापि, त्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्याची खबरदारी या खात्यातील एकाही वरिष्ठाने घेतली नाही. तब्बल दीड वर्षांनंतर या अधिकाऱ्यांना जाग आली असून आता त्याच्या नूतनीकरणासाठी येणाऱ्या खर्चाला मान्यता मिळावी, असा प्रस्ताव नुकताच त्यांनी सरकार दरबारी पाठविला आहे.
आयएसओ प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ४१ लाख ८० हजार खर्च येणार असून त्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव डिसेंबर २००८ मध्ये सरकारकडे पाठविला असल्याचे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रामराव शिनगारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. नूतनीकरणास झालेल्या विलंबाचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, इतका मोठा खर्च करून आयएसओ प्रमाणपत्र घ्यावे की न घ्यावे याबाबत अधिकाऱ्यांमध्येच एकमत नव्हते म्हणूनच हा प्रस्ताव पाठविण्यासाठी उशीर झाला.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवेत सातत्य यावे, विभागाचे कामकाज लोकाभिमुख व पारदर्शी व्हावे या हेतूने डॉ. करीर यांनी हे प्रमाणपत्र घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ‘टीयूव्ही साऊथ एशिया’ या प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विभागातील कामकाजाची पद्धत, अर्ज दाखल झाल्यानंतर त्याचा निपटारा होण्यासाठी लागणारा वेळ, दस्त नोंदणीसाठी आल्यानंतर त्याची पूर्तता होऊन तो संबंधिताला परत देण्यासाठी लागणारा कालावधी, तक्रारींचे निरसन करण्याची पद्धती या बाबत तपशीलवार माहिती देणाऱ्या १४ प्रकारच्या माहिती पुस्तिका तयार करण्यात आल्या. या माहिती पुस्तिकांसोबतच कार्यपद्धतीची माहिती देणारे फलकही प्रत्येक कार्यालयात लावण्यात आले. या तयारीनंतर प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेने प्रत्येक कार्यालयाची पाहणी करून त्याचे कामकाज योग्यरित्या चालते की नाही, याची तब्बल पाच वेळा पाहणी केली. नोंदणी विभागाचे कामकाज समाधानकारक झाल्यानंतरच गुणवत्तेचे ‘आयएसओ ९००१-२०००’ हे प्रमाणपत्र या विभागाला देण्यात आले होते. तीन वर्षे कालावधीसाठी देण्यात आलेल्या या प्रमाणपत्राकरिता या संस्थेच्या वतीने दरवर्षी नियमितपणे विविध कार्यालयांचे परीक्षणही करण्यात येत असे. मे २००७ ला प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी कसलीही विचारणा न झाल्याने ‘टीयूव्ही साऊथ एशिया’ या संस्थेने असे परीक्षण करणे बंद केले आहे, असे या खात्यातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.