Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नाशिक पालिकेच्या कारभाऱ्यांकडूनच पूररेषा आखणीत बाधा
नाशिक, ६ मार्च / खास प्रतिनिधी

 

गंगा गोदावरीच्या किनाऱ्यालगत वास्तव्यास असलेल्या लाखो रहिवाशांच्या अस्तित्वाबाबत सुस्पष्ट दिशादर्शन करणाऱ्या ‘पूर नियंत्रण रेषा’ आखणीचे काम नाशिक महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा रखडले आहे. पाटबंधारे खात्याबरोबर या कामाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणे अन् तब्बल ५० लाखाचा निधी उपलब्ध करून देणे एवढीच प्रक्रिया बाकी असताना पालिकेचे कारभारी नेमके येथेच खोळंबले व आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची सबब पुढे करून हात वर करायलाही मोकळे झाले. पालिका कारभाऱ्यांच्या या टोलवाटोलवीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आणि नाशिकचे पालकत्व करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशांनाही गोदावरीचा प्रवाह दाखविला गेला, हे विशेष.
नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून वाहणाऱ्या गोदावरी व नासर्डी या नद्यांसह त्यांच्या उपनद्या व नाल्यांना १९ सप्टेंबर २००८ रोजी आलेल्या महापुराने लाखो शहरवासियांची अक्षरश: दाणादाण उडवून दिली होती. या महापुराचे थैमान तब्बल तीन दिवस सुरु राहिले. नद्या नंतर काही दिवस दुथडी भरून वाहत राहिल्याने गोदावरी व नासर्डी नद्यांच्या किनाऱ्यालगत वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला. महसूल खात्याकरवी सुमारे पाच हजाराहून अधिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. कोटय़वधीचे नुकसान झाले, अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे असंख्य कुटुंबे उघडय़ावर आली. शहरात काही तासांमध्ये उडालेल्या त्या हाहाकाराला नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार आणि पाऊस व पुराच्या पाण्याच्या दबावामुळे मातीचे गंगापूर धरण फुटू नये म्हणून पाटबंधारे खात्याने प्रचंड मोठय़ा प्रमाणात गोदावरीच्या पात्रात सोडलेला प्रवाह ही प्रमुख कारणे होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशावरून नियुक्त केलेल्या एकसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालातही पालिकेच्याच कारभारावर ठपका ठेवताना ‘संवेदनशीलता दाखविली नाही’ असाही शेरा मारला गेला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पालिका प्रशासनाचे कान उपटल्यावर पूररेषा आखणीसाठी ५० लाखाचा निधी पाटबंधारे खात्याकडे सुपूर्द करण्यास पालिका तयार झाली. पालिकेच्या सर्वसाधारणसभेने या निर्णयावर शिक्कामोर्तब केला व पुढील कार्यवाहीसाठी ही फाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती असलेल्या स्थायी समितीकडे आली आणि तिथे ती जी खोळंबली ती आजतागायत. वास्तविक पाहता पूररेषा आखणीचे काम हे अवघ्या सात महिन्यात म्हणजेच जून महिन्याच्या आधी पूर्ण व्हावे म्हणून पाटबंधारे खात्याने सर्व तयारीही केली. त्यासाठी पालिका व पाटबंधारे खाते यांच्यात होणाऱ्या सामंजस्य कराराचा मसुदाही पालिकेकडे पाठविण्यात आला. महिना उलटला तरी त्या मसुद्याचे पुढे काय झाले याचा थांगपत्ता लागू शकलेला नाही.