Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीच्या किमतीतच परत करण्याचे सूर्या रोशनी कंपनीस आदेश
जयंत धुळप
अलिबाग, ६ मार्च

 

सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने अलिबाग तालुक्यांतील वाघविरा, चिखलीखार आणि हेमनगर या गांवांतील शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या शेतजमिनी, खरेदीच्या मूळ किमतीतच शेतकऱ्यांना परत कराव्यात, असा ऐतिहासिक अंतिम आदेश रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी रामदास खडतरे यांनी दिला आहे. महामुंबई एसईझेडकरिता सरकारच्या माध्यमातून होत असलेले भूमी संपादन आणि त्याच्या विरोधात सुरू असलेली शेतकऱ्यांची तीव्र आंदोलने या पाश्र्वभूमीवर या निर्णयास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूर्या रोशनी लिमिटेड या कंपनीस एकूण ६० हेक्टर शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी १६ जानेवारी १९९६ रोजी उद्योग विकास आयुक्तांनी दिली होती़ त्याप्रमाणे खरेदी केलेल्या या ६० हेक्टर जमिनीवर पाच वर्षांच्या आत त्यांनी त्यांचा कारखाना उभारणे बंधनकारक होते. परंतु २००९ साल उजाडले तरी त्यांनी आपला कारखाना उभारला नाही़ कंपनीने ज्या प्रयोजनार्थ या जमिनी खरेदी केल्या, त्या करणासाठी शेतजमिनीचा वापर केला नाही़ इतकेच नव्हे, तर कंपनीने खरेदी केलेल्या शेतजमिनीपैकी काही जमिनी इतर कंपन्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय परस्पर विक्री केल्या आहेत़ परिणामी उद्योग विकास आयुक्तांनी कंपनीची परवानगी रद्द केल्याने, या सर्व जमिनी या शेतकऱ्यांना विकत घेतलेल्या किंमतीलाच परत द्याव्यात, या मागणीसाठी चिखलीखार, वाघविरा व हेमनगर या गावांतील शेतकऱ्यांच्या वाघेश्वर औद्योगिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ़ संजय जगन्नाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली म़े सूर्या रोशनी लि़., नवी दिल्ली व जिल्हा उद्योग केंद्र, रायगड दावा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.
शेतकऱ्यांच्या १३ वर्षांत झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई कंपनीस देण्यास लावून शेतकऱ्यांना जमिनी परत देण्यास भाग पाडाव़े सर्व शेतकरी, कंपनीने खरेदी केलेल्या किंमतीत त्या जमिनी परत घेण्यास तयार आहोत, असे या सर्व शेतकऱ्यांनी सांगितले होते.
सन २००५ चा महाराष्ट्र अधिनियम क्ऱ २५ नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३ (१)(अ)(३) मधील तरतुदीनुसार, शेतजमीन खरेदी दिनांकापासून विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत ज्या जमिनीचा वापर औद्योगिक कारणासाठी न केल्यास ज्या व्यक्तीकडून जमीन खरेदी केली होती त्या व्यक्तीला तितक्याच किंमतीला ती पुन्हा खरेदी करण्याचा हक्क आह़े याच तरतुदीचा लाभ शेतकऱ्यांना या निकालाच्या निमित्ताने झाला आहे.
म़े सूर्या रोशनी कंपनीने उद्योग विकास आयुक्तांच्या १६ जानेवारी १९९६ च्या आदेशाचा भंग करुन खरेदी केलेल्या शेतजमिनीपैकी काही जमिनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता अन्य कंपन्या वा व्यक्तींना विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत अलिबाग उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी म़े सूर्या रोशनी कंपनी व अन्य कंपनी यांच्यामध्ये जमिनीचे हस्तांतरण ज्या फेरफार नोंदी अन्वये झाले आह़े, ते फेरफार पुनर्विलोकनास घेऊन या सर्व जमिनी म़े सूर्या रोशनी कंपनीच्या नांवे कराव्यात व त्यानंतर म़े सूर्या रोशनी कंपनीने त्या जमिनी ज्या मूळ मालकांकडून ज्या किंमतीला खरेदी केलेल्या आहेत, त्याच किंमतीला संबंधित व्यक्तींना परत कराव्यात, असा स्पष्ट आदेश या निकालात अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत़, त्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी जमीन परतो घेण्यास तयार नाहीत, त्या जमिनी अलिबाग तहसीलदारांनी मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ८४ (क) नुसार कार्यवाही करुन शासनजमा कराव्यात, असेही आदेश याच निकालपत्रात देण्यात आले आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे, सूर्या रोशनी कंपनीप्रमाणेच अन्य ज्या कंपन्या, संस्था आणि व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून खरेदी करून ठेवल्या, परंतु प्रयोजनाप्रमाणे वापर केला नाही आणि ज्यांचा प्रयोजन कालावधी संपुष्टात आला आहे, अशा कंपन्या, संस्था आणि व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.