Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

सुरेश प्रभूंची उमेदवारी निश्चित!
खास प्रतिनिधी
रत्नागिरी, ६ मार्च

 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजप-सेना युतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान खासदार सुरेश प्रभू यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे.
या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ. नीलेश राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असली तरी अजून तसे ठोस संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळालेले नाहीत. भाजप- सेना युतीने मात्र प्रभू यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असून त्यांचे निकटवर्तीय निवडणुकीच्या दृष्टीने जुळवाजुळवीला लागले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बहुजन समाज पार्टीतर्फे अचानक पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर करण्यात आल्यामुळे तिरंगी लढत अटळ दिसत आहे, पण उपळेकर अलीकडच्या काळातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्यास आले आहेत. त्याचप्रमाणे येथील पर्यावरणविषयक मोहिमेतील त्यांचा सहभागही तसा नवीनच आहे. त्यामुळे राजकीय- सामाजिक दृष्टीने ते फारसे वजनदार मानले जात नाहीत. तरीसुद्धा बसपाच्या झेंडय़ाखाली कार्यकर्ते गोळा करून डॉ. परुळेकर किती मजल मारतात, याबद्दल उत्सुकता आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून बसपा उमेदवाराने सुमारे बारा हजार मते मिळविली होती.
निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षांंत प्रभू मतदारसंघात फारसे फिरकले नाहीत, हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप आहे, पण त्यांचे उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आणि मतदारसंघामध्ये केलेली विविध प्रकारची मूलभूत सामाजिक विकासाची कामे ही जमेची मोठी बाजू आहे. काँग्रेसतर्फे डॉ. नीलेश यांचा नवा चेहरा आणि कोरी पाटी हे गुण तरुण वर्गाला आकर्षित करतील, असा त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे.
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी झाली असली तरी पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यामध्ये काँग्रेसचे संख्याबळ कमी व्हावे, म्हणून प्रयत्नशील राहणार हे उघड गुपित आहे. त्यामुळे होणाऱ्या हानी- लाभाचे कोष्टकही राजकीय वर्तुळात मोठय़ा हिरीरीने मांडले जात आहे. राष्ट्रवादी आणि सेनेची अलीकडील काळात झालेली जवळीक त्या दृष्टीने लक्षणीय मानली जात आहे.